Wed, Jun 03, 2020 19:01होमपेज › Ahamadnagar › मोदी लाटेला घाबरून पवारांनी मैदान सोडले 

मोदी लाटेला घाबरून पवारांनी मैदान सोडले 

Published On: Apr 21 2019 1:38AM | Last Updated: Apr 22 2019 1:31AM
कर्जत : प्रतिनिधी 

मोदींच्या लाटेला घाबरून पवार साहेबांनी मॅच सुरू होण्यापूर्वीच मैदानातून पळ काढला. मॅच न खेळताच ते आउट झाले आहेत. तेव्हाच देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे, हे सिद्ध झालेले आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

नगर मतदारसंघातील भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची (दि. 20) कर्जत येथील शहाजीनगर मैदानावर सभा झाली. या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ.सुरेश धस, राजेंद्र विखे, बबनराव पाचपुते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, नामदेव राऊत, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, रवींद्र कोठारी, नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, बळीराम यादव, दीपक शहाणे, प्रसाद ढोकरीकर, उमेश जेवरे, अंगद रूपनर, दादासाहेब सोनमाळी, काका धांडे, विनोद दळवी, अमृत काळदाते, अनिल गदादे, मनीषा सोनमाळी, मनीषा वडे, संभाजी दहातोंडे, रामदास हजारे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री म्हणाले,  लोकसभा निवडणूक जाहीर होताच पवार साहेब राज्याचे कॅप्टन बनूून पॅड बांधून मैदानात उतरले खरे. मात्र, मोदी लाट पाहून ते मॅच न खेळताच आउट झाले आहेत. जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे.  काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्वप्नातही मोदीच दिसत असून, ते दचकून उठत आहेत. आम्ही पाच वर्षांमध्ये कर्जमाफी, पीकविमा, कांदा अनुदान, ट्रॅक्टर व इतर शेती अवजारांवर अनुदान, असे जवळपास 80 हजार कोटी रुपये जनतेच्या खात्यांमध्ये जमा केले आहेत. त्यांची भाषणे म्हणजे फक्त मनोरंजन आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व करमाळा या तालुक्यांना त्यांनी 50 वर्षे झाली तरी कुकडीचे पाणी दिले नाही. आम्ही पाच वर्षांत कुकडीसाठी साडेतीन हजार कोटी सुप्रमा करून निधी दिला आहे. माळढोक, तुकाईचारी यांच्यासह शेतकर्‍यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. नगर जिल्ह्यास पूर्वी हजारो टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत होते. मात्र, जलयुक्त शिवार योजनेमुळे आता अवघे 400 टँकर दुष्काळात सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की,  लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबात मोठा कलह होणार असून, ते फुटणार आहे. हे भाकित मी करीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये नेतेच शिल्लक ठेवले नाहीत.  खा. दिलीप गांधी म्हणाले की, मी भाजपमध्येच आहे व भाजपचाच प्रचार करीत आहे. कोणीही माझ्याबाबत खोटा प्रचार करू नका. मोदी यांना पंतप्रधान करावयाचे आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांनाच मते द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

या वेळी आमदार सुरेश धस, बबनराव पाचपुते, सुनील साळवे, अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, अल्लाउद्दीन  काझी, रवींद्र कोठारी यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नामदेव राऊत यांनी केले. आभार विनोद दळवी यांनी मानले.