Wed, Oct 16, 2019 09:47होमपेज › Ahamadnagar › बेलापूर, दहिगाव महसुली मंडळेही दुष्काळी जाहीर

बेलापूर, दहिगाव महसुली मंडळेही दुष्काळी जाहीर

Published On: Nov 08 2018 1:23AM | Last Updated: Nov 08 2018 1:23AMनगर : प्रतिनिधी

शासनाने जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत यापूवींच दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांव्यतिरिक्त श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर व कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका या दोन महसुली मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या दोन महसुली मंडळांतील गावांना आता दुष्काळी सवलती लागू होणार आहेत.

जिल्हाभरात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर होण्यापूर्वीच शासनाने राज्यभरातील 151 तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर केलेला आहे. यामध्ये अकोले, कोपरगाव व श्रीरामपूर हे तीन तालुके वगळता उर्वरित अकरा तालुक्यांचा समावेश आहे. अकरा तालुक्यांना दुष्काळी सवलती देखील लागू केल्या गेल्या आहेत. दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांत जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्ज्यन्याच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण पावसाच्या 750 पेक्षा कमी झाला असेल, अशा राज्यभरातील एकूण 268 महसुली मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील बेलापूर व दहिगाव बोलका या दोन महसुली मंडळांचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण चार महसूल मंडळे असून, बेलापूर मंडळात सर्वांत कमी 316 मि.मी. पावसाची नोंद झाली.  कोपरगाव तालुक्यात एकूण पाच मंडळे असून, दहिगाव बोलका मंडळात सर्वात कमी एकूण 233 मि.मी. पाऊस झाला आहे.

या दोन्ही मंडळांतील सर्वच गावांना आता जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात 33,5 टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडीत न करणे आदी विविध आठ सवलती लागू केल्या असल्याचा अध्यादेश शासनाने 6 नोव्हेंबर 2018 रोजी जारी केला आहे.