Tue, Jul 23, 2019 19:27होमपेज › Ahamadnagar › अण्णा हजारे उपोषणावर ठाम

अण्णा हजारे उपोषणावर ठाम

Published On: Sep 15 2018 1:46AM | Last Updated: Sep 15 2018 8:17AMपारनेर : प्रतिनिधी 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि.14) त्यांची भेट घेऊन केलेली चर्चा निष्फळ ठरली. केंद्र व राज्य सरकार कायम गंभीर व सकारात्मक भूमिका घेत ना. महाजन यांनी सांगितले. मात्र, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचे मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाले पाहिजे, असे सांगत 2 ऑक्टोबरच्या उपोषणावर ठाम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे.  

जलसंपदा मंत्री महाजन यांनी शुक्रवारी दुपारी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने अण्णांनी नमूद केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे व  त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.  स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय झाला असून, येत्या हंगामापासून तसा दर शेतकर्‍यांना निश्‍चितपणे मिळेल, असे ना. महाजन यांनी सांगितले. याशिवाय पाण्याचा प्रश्न लक्षात घेता राज्यात ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर वापरासाठी प्रोत्साहन देण्याचा 
राज्य शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे सामूहिक ठिबकसाठी साडेआठशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अण्णांनी नमूद केलेले काही प्रश्न हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असून, केंद्र शासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केल्याचेही ना. महाजन यांनी अण्णांना सांगितले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही अण्णांना याबाबत कळविले आहे. केंद्रात लोकायुक्त आणि राज्यस्तरावर लोकपाल यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाल्याचेही महाजन यांनी अण्णांच्या निदर्शनास आणून दिले.

शेतकर्‍यांना शेतीसाठी आवश्यक असणार्‍या वस्तूंवर 12 ते 20 टक्के जीएसटी लागू करण्यात आलेला आहे. तो पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याची अण्णांची मागणी आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निश्चितपणे बोलू आणि त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाजन यांनी अण्णांचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे दूरध्वनीवर बोलणे करून दिले. मात्र, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचे मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाले पाहिजे, असे सांगत 2 ऑक्टोबरच्या उपोषणावर ठाम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे.