होमपेज › Ahamadnagar › मोदींचा दौरा नगरकरांच्या पथ्थ्यावर

मोदींचा दौरा नगरकरांच्या पथ्थ्यावर

Published On: Apr 11 2019 1:58AM | Last Updated: Apr 10 2019 11:15PM
नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.12) नगर शहरात येत असल्यामुळे रस्त्यांची डागडुजी, स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. उपनगरात खड्डे बुजविले गेल्याने व स्वच्छताही केली जात असल्याने पंतप्रधानांचा दौरा नगरकरांच्या पथ्थ्यावर पडल्याचे चित्र आहे.
नगर शहर व उपनगरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही गेल्या काही महिन्यांपासून बंद होते. स्वच्छतेचा व कचरा संकलनाचा तर अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र होते. मात्र, उद्या (शुक्रवारी) पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर शहरात येत असल्यामुळे स्वच्छतेसाठी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची धावपळ सुरु झाली आहे. सावेडी उपनगरातील तारकपूर, मिस्कीन मळा, प्रोफेसर कॉलनी, लालटाकी रोड आदी विविध भागांत मनपाकडून स्वच्छता केली जात आहे. नेहमीपेक्षा अतिरिक्त कर्मचारी या कामाला जुंपले आहेत. आर्मीच्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर मोदी हे चारचाकी वाहनाने सभास्थळी जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजविले जात आहेत.