Mon, Sep 16, 2019 11:33होमपेज › Ahamadnagar › ‘मुहूर्ता’आधीच इच्छुकांची ‘लगीनघाई’!

‘मुहूर्ता’आधीच इच्छुकांची ‘लगीनघाई’!

Published On: Oct 07 2018 1:10AM | Last Updated: Oct 07 2018 12:17AMनगर : प्रतिनिधी

ना अजून निवडणुकीची तारीख जाहीर झाली, ना राजकीय पक्षांकडून उमेदवारी. पण, ‘मुहूर्ता’आधीच इच्छुकांची ‘लगीनघाई’ सुरू झालीय. चक्‍क राजकीय पक्षांच्या नेत्यांची अन् स्वत:ची छबी असलेली पॅम्प्लेट छापून घेत, अनेक इच्छुकांनी आपल्याला सोयीस्कर असलेल्या नव्या प्रभागात थेट जाहीर प्रचारालाही सुरुवात केलीय. चार सदस्यांच्या विस्तीर्ण झालेल्या प्रभागरचनेमुळं आता वेळ गमवायला नको, म्हणून हा आटापिटा सुरू झालेला दिसतोय. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून थंडावलेलं निवडणुकीचं वातावरण आता हळूहळू जाणवायला लागलयं.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलीय. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यापासूनच इच्छुकांची सोयीस्कर असलेल्या आपापल्या प्रभागात लगबग सुरू झाली होती. मात्र, प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी होऊन, अंतिम प्रभागरचना जाहीर होईपर्यंत इच्छुकांच्या हालचाली काहीशा थंडावल्या होत्या. पण, आता अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, मतदारयादीही कोणत्याही क्षणी जाहीर केली जाईल. त्यामुळं इच्छुकांनी लगेच तयारीला सुरुवात केल्याचं दिसतयं. पितृपंधरवड्यामुळं राजकीय पक्षांच्या पातळीवर अजूनतरी हालचाली थंडच आहेत. दोन्ही काँगे्रसची आघाडी होण्याची शक्यता असलीतरी, त्यांच्या चर्चेला अद्याप सुरुवात झालेली नाही. शिवसेना व भाजपचे स्वबळाचे नारे अजूनही घुमत असून, त्यांची युती होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. असे असलेतरी उमेदवारी मिळण्याची शक्यता गृहीत धरून अनेक इच्छुक जोरदार तयारीला लागलेले दिसत आहेत. 

अनेकांनी अद्याप पक्षांकडून उमेदवारी जाहीर झालेली नसताना, पक्षनेत्यांसह आपली छबी असलेली पॅम्प्लेट छापून, थेट मतदारांशी संपर्क साधत ‘लक्ष’ ठेवण्यासाठी साकडं घालण्यास सुरुवात केलीय. तर काहींना पक्षांकडून अद्याप उमेदवारीचे संकेत नसल्याने त्यांनी फक्‍त आपल्याच छबीसह पॅम्लेट छापलीयेत. विशेष म्हणजे एका प्रभागात दोन महिला अन् दोन पुरूष अशा जागा असल्याने, अनेक इच्छुकांनी ‘डबल धमाका’ साधत आरक्षणाच्या सोयीनुसार आपली सौभाग्यवती किंवा मातोश्री यांनाही पॅम्प्लेटवर स्थान दिलंय. पॅम्प्लेटवर नवीन प्रभागाचा नकाशाही हद्दीसह छापून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न इच्छुकांनी सुरू केलाय. विद्यमान नगरसेवकांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा तर नव्या इच्छुकांनी आपल्या सामाजिक कामांचा उहापोह पॅम्प्लेटमध्ये केलाय. एवढंच नाहीतर, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा जमाना असल्यानं अनेक इच्छुकांनी व्हॉटस् अ‍ॅप अन् फेसबुकवर आपली छबी झळकावत ‘मी इच्छुक’ असल्याचं दाखवत प्रचाराला सुरुवात केलीय. कदाचित आचारसंहिता लागू झाल्यानंतर ‘सोशल मीडिया’वरही बंधने येणार असल्यानं, आताच बार उडवून देऊया, असा इच्छुकांचा होरा असावा. काहीही असो, इच्छुकांच्या या प्री-प्रचारामुळं शहरात निवडणुकीचं वातावरण हळूहळू तयार होऊ लागलंय, हे मात्र तितकंच खरं!

शिवसेनेचा ‘शिबीर’ धमाका..!

तर दुसरीकडं शिवसेनेनं आरोग्य चिकित्सा, नेत्रतपासणी, चष्मा व औषध वाटप शिबिरांच्या माध्यमातून धमाका उडवून देण्यास सुरुवात केलीय. विद्यमान नगरसेवकांसह अन्य इच्छुकांकडून आपापल्या प्रभागात ठिकठिकाणी या शिबिरांचं आयोजन केलं जातंय. त्यामध्ये सामाजिक सेवेचा उपक्रम असल्याचं सांगतानाच, नेत्यांकडून चक्‍क मनपा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांची नावे ‘प्रोजेक्ट’ केली जात असल्यानं, त्यांचा शिबिरामागील राजकीय हेतूही लपून राहिलेला नाही, हेही खरं.