Sun, Apr 21, 2019 06:20होमपेज › Ahamadnagar › स्मशानभूमीअभावी थेट रस्त्यावरच केला अंत्यविधी

स्मशानभूमीअभावी थेट रस्त्यावरच केला अंत्यविधी

Published On: Nov 08 2018 1:23AM | Last Updated: Nov 08 2018 1:23AMनेवासा : प्रतिनिधी 

हयातभर गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा व स्वतःच्याच अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसावी, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे. याचाच प्रत्यय पुनतगाव येथील विठ्ठल रामभाऊ गंधारे यांच्या कुटुंबीयांना आला. गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी गंधारे यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबीयांवर आली. त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मयताला  अखेरच्या क्षणी देखील फरफटत झाली. 

तालुक्यातील  पुनतगावमध्ये  स्मशानभूमी व्हावी, यासाठी अखेरपर्यंत लढा देणारे विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचे सोमवारी निधन झाले. आत्तापर्यंत येथील ग्रामस्थ नदीतच अंत्यविधी करत होते. मात्र, जायकवाडी धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी वाहत आहे. स्मशानभूमीच नसल्याने गंधारे यांचा अंत्यविधी पुनतगाव -खुपटी या मुख्य रस्त्यावरच करावा लागला.

पुनतगाव हे नेवासा-श्रीरामपूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सीमेवरील गाव. येथे सर्व जाती-धर्मातील लोक असून गाव जरी छोटे असले तरी राजकीयदृष्ट्या महत्वाचे आहे. या गावातील पुढार्‍यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाची राजकीय पदे भोगली आहेत. तरीही हे गाव विकासापासून वंचित आहे. प्रवरानदीच्या काठावर वसलेल्या या गावची लोकसंख्या 3000 ते 3500 हजार आहे. प्रवरा नदीला पाणी असल्यास येथील नागरिकांना नदीच्या काठावर व रस्त्याच्या कडे, काठावर अंत्यविधी करण्याची वेळ येते. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.