Mon, Jun 17, 2019 10:30होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादीतून १८ नगरसेवकांची हकालपट्टी

राष्ट्रवादीतून १८ नगरसेवकांची हकालपट्टी

Published On: Jan 13 2019 1:36AM | Last Updated: Jan 13 2019 1:36AM
अहमदनगर : प्रतिनिधी

अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून भाजपाला पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तसेच शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनाही पदावरून काढून टाकण्यात आले आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी कारवाईची घोषणा केली. त्यानंतर येथील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महापौर पदासाठी 28 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे अवघ्या 14 जागा मिळालेल्या भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे नगर दौर्‍यावर आले असता, त्यांनी याची गंभीर दखल घेत पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांवर कडक कारवाईचे संकेत दिले होते.

या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व 18 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी मुंबईला जाऊन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणती कारवाई केली जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लेखी स्वरुपात आदेश काढून या 18 नगरसेवकांची हकालपट्टी केली. “महापौर पदाच्या निवडणुकीसाठी जातीयवादी पक्षांना पाठिंबा देऊ नये अथवा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान करू नये, असे स्पष्ट आदेश पक्षाने दिलेले होते. परंतु, पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपाचे उमेदवार वाकळे यांना महापौरपदासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षादेशाचा भंग झाला आहे. याबाबत खुलासा करण्याबाबत 28 डिसेंबर रोजी सर्वांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबत कोणताही खुलासा न करण्यात आल्याने सर्वांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे”, असे  आदेशात म्हटले आहे.

तसेच पक्षाच्या आदेशाविरुद्ध घडामोडी होत असताना याबाबतची कोणतीही माहिती अथवा कल्पनाही पक्षश्रेष्ठींना न दिल्याने पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष  विधाते यांनाही 29 डिसेंबर रोजी नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनीही कोणताही खुलासा न केल्याने, पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांनाही पदावरून काढून टाकण्यात आले आहे.  

कारवाई झालेल्या नगरसेवकांमध्ये डॉ.सागर बोरूडे,  मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर, विनित पाऊलबुद्धे,  सुनील त्र्यंबके,  समद खान, ज्योती गाडे,  शोभा बोरकर, कुमार वाकळे, रूपाली जोसेफ पारघे, अविनाश घुले, परवीन कुरेशी, शेख नजीर अहमद, प्रकाश भागानगरे, शीतल जगताप, गणेश भोसले, मीना चोपडा यांचा समावेश आहे.