Thu, May 23, 2019 22:31
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ..तर राष्ट्रवादीवाले देशद्रोही : सुजय विखे

..तर राष्ट्रवादीवाले देशद्रोही : सुजय विखे

Published On: Mar 15 2019 1:44AM | Last Updated: Mar 15 2019 12:04AM
नगर : प्रतिनिधी

‘मी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या इंस्टाग्रामवर माझा भाजपात प्रवेश करणार नाही, असे म्हणत असल्याचा व्हिडीओ टाकला. पुलवामा हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने एअरस्ट्राईक केले. त्यावेळी एक देशभक्त म्हणून माझं मतपरिवर्तन करण्याचा अधिकार मला आहे. माझ्या देशभक्तीची भावना ते समजू शकत नसतील तर, त्यांना विचारा एअरस्ट्राईकची कारवाई योग्य आहे की नाही. त्यांचं म्हणणं हो असेल तर त्यांनी माझ्याबरोबर यावे. नाही म्हणणं असेल तर तुम्ही तिकडंच सुखी राहा, तुम्ही देशद्रोही’, अशा शब्दात डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला.

भाजपात प्रवेश केल्यानंतर नगरमध्ये आलेल्या डॉ. विखे यांनी शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, विक्रम राठोड, संभाजी लोंढे, संभाजी कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विखे यांनी घरी जाऊन राठोड यांचा सत्कार करत आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. विखे बोलत होते.

विखे म्हणाले की, ‘राष्ट्रवादीने माझ्या भाजप प्रवेशानंतर इंस्टाग्रामवर व्हिडीओ टाकला. माझं म्हणणं आहे मी तुमच्या पक्षाचा आहे का? नाही ना. माझी बांधिलकी काँग्रेसशी आहे, राष्ट्रवादीशी नाही. अजून अनेक गोष्टी घडायच्या आहेत. पवार साहेबांनी माझ्या आजोबांचा विषय काढला. वास्तविक पाहता दिवंगत व्यक्तीवर त्यांनी टीका करायला नको होती. यातून पवारांच्या मनात विखे परिवाराविषयी काय मत आहे हे दिसून येते. ते म्हणतात, 1991 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार म्हणून. 1991 सारखी परिस्थिती यावेळी तिकीट देतांना निर्माण झाली. निकाल मात्र 1991 नव्हे तर 1999 प्रमाणे लागणार आहे.’

खा. दिलीप गांधी यांच्याविषयी बोलतांना विखे म्हणाले की, ‘ज्यावेळी मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होतो त्या कालावधीत भाषणात बोललं गेलं. विद्यमान खासदाराच्या विरोधात बोलल्याशिवाय ‘पब्लिक पर्सेप्शन’ होत नाही. आता त्यावेळी मी बोलल्याने ते जर दुखावले गेले असतील तर, गरज पडल्यास खा. गांधींची माफी मागण्यास मी तयार आहे. यापेक्षा जास्त मी तरी काय करू शकतो. अजून पक्षाने माझे तिकीट फायनल केलेले नाही. खा. गांधी यांची भेट घेण्यासाठी मी त्यांना वेळ मागितली आहे. मात्र ते सध्या दिल्लीला असल्याने भेट होऊ शकली नाही. ते नगरमध्ये आल्यावर त्यांची भेट घेणार आहे.’

शिवसैनिकांनी दिल्या विखेंसाठी घोषणा

सुजय विखे माजी आमदार राठोड यांना भेटण्यासाठी शिवालयाजवळ आले. तेथून राठोड व विखे राठोडांच्या घराकडे पायी निघाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘हमारा खासदार कैसा हो, सुजय विखे जैसा हो...’, व अनिल राठोड यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विखे भेटीनंतर जाण्यास निघाले असता राठोड यांनी विखेंना शुभेच्छा दिल्या. यावेळी राठोड यांनी ‘सुजय विखे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...’, अशी घोषणा देण्याची सूचना शिवसैनिकांना केली. यावर राठोड यांचे आभार मानत विखेंनी राठोडांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले.