Mon, Jun 17, 2019 11:14होमपेज › Aarogya › फ्रीजमधील अन्न खाताय?

फ्रीजमधील अन्न खाताय?

Published On: Oct 11 2018 1:25AM | Last Updated: Oct 11 2018 1:25AMशहरी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रीज. अर्थात, आता खेड्यापाड्यांतही फ्रीज पोहोचला आहे. अनेकदा जेवून उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवले जाते. मग गरजेनुसार त्याचा वापर केला जातो. असे करताना आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये किती काळ ठेवावा आणि त्याच्या वापराचा काळ हा निश्‍चित असतो. हे वाचल्यानंतर एक प्रश्‍न नक्कीच पडतो तो म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचा योग्य वापर कसा करावा? फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचा योग्य वापर किती काळ करू शकतो, याविषयीच्या काही प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करूया. अर्थात, आरोग्यासाठी नेहमी ताजे अन्नच अधिक पोषक, फलदायी आणि उपकारक असते, हे विसरू नका! 

बहुतांश घरांमधील आरोग्यसजग महिलांना एक प्रश्‍न नेहमी कायम पडतो की सकाळी तयार केलेला स्वयंपाक फ्रीजमध्ये ठेवून रात्री गरम करून खाणे योग्य की अयोग्य? त्याविषयी सांगायचे तर सकाळी केलेला भात रात्री खाल्ला तर काही अडचण नाही; पण हिरव्या भाज्या किंवा वरण, आमटी पुन्हा रात्री गरम केली तर त्यातील पोषक घटक जसे ‘सी’ जीवनसत्त्व, ‘बी’ कॉम्प्लेक्स नष्ट होतात. काही लोक वेळ वाचण्यासाठी सलाडही कापून फ्रीजमध्ये ठेवतात; पण असे केल्यास त्यातील जीवनसत्त्वांंचे हवेतील ऑक्सिजनबरोबर संपर्क होऊन ते नष्ट होतात. त्यामुळे आरोग्यासाठी ते अपायकारक ठरू शकते. 

रात्री भिजवलेली कणीक सकाळी दहा तासांंनी वापरणे योग्य आहे का?

कणकेतील जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ फ्रीजमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहतात. मात्र, कणीक थोडी कडक होते. ताज्या कणकेच्या पोळ्यांइतक्या पोळ्या मऊसूत होत नाहीत; पण त्यामुळे त्याच्या पोषक मूल्यांंमध्ये काहीही बदल होत नाही. 

सुका मेवा, दाणे फ्रीजमध्ये किती दिवस साठवून ठेवले जाऊ शकतात? 

दाणे आणि सुका मेवा यातील अनसॅच्युरेटेड फॅटस् लवकर खराब होतात. त्याचा आरोग्यावर काहीच परिणाम होत नसला, तरीही चवीत मात्र नक्कीच बदल होतो. त्यामुळे सुका मेवा थंड जागी साठवण्याचा सल्ला दिला जातो. कारण, ते दीर्घकाळ टिकू शकतात. हवाबंद डब्यात फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये कोणत्याही जागी सुका मेवा साठवला जाऊ शकतो. सुका मेवा फ्रीजमध्ये साठवत असाल, तरीही तो 2 महिन्यांच्या आत वापरून टाकावा. 

प्रक्रिया केलेला मांंसाहार फ्रीजरमध्ये ठेवून मग बाहेर काढून वापरण्याची योग्य पद्धती कोणती?

मांसाहार बनवताना त्यात तेलाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मांसाहाराला मीठ चोळले जाते. त्यामुळे मांसाहारात आयोडिनचे प्रमाण जास्त होते. असा मांसाहार जास्त वेळा गरम केल्यास आरोग्याला अपायकारक असतो. एकदा गरम केल्यानंतर पुन्हा तो गरम करून खाणे अयोग्य आहे. हल्ली बाजारात फ्रोजन मीट मिळते. फ्रोजन मांसातही आयोडिनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचा वापर करण्यापासून बचाव केला पाहिजे. विशेषतः, मटण असेल तर पुन्हा पुन्हा गरम करणे टाळावे. 

- डॉ. महेश बरामदे