Wed, Oct 24, 2018 01:33होमपेज › Aarogya › हिवाळ्यातील काळजी

हिवाळ्यातील काळजी

Published On: Dec 07 2017 12:38AM | Last Updated: Dec 06 2017 9:35PM

बुकमार्क करा

डॉ. अविनाश भोंडवे

हिवाळा चांगलाच जाणवू लागला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे सृष्टीच्या आवर्तनातून निर्माण होणारे ऋतूचक्र. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि निम्मा फेब्रुवारी हे साधारणपणे हिवाळ्याचे महिने असतात. याकाळात हवेचे तापमान बर्‍यापैकी थंड असते. या बदललेल्या हवेचे आपल्या आरोग्यावर अनेक भले-बुरे परिणाम होत असतात. थंडीच्या या अपेक्षित हल्ल्याची आणि त्याच्या परिणामांची जाणीव दैनंदिन जीवनात बाळगली आणि रोजच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल केले, तर आरोग्य सांभाळणे सोपे जाईल. हवेचे उतरलेले तापमान काहींना चांगलेच बाधते. थंड हवेचे ज्यांना वावडे असते, अशांची नाके गळू लागतात, खोकला सुरू होतो. 

उपाय ः सकाळी लवकर आणि रात्री उशिरा, जेंव्हा गारठा जास्त असतो अशा वेळेस बाहेर थंड हवेत जाणे टाळावे. अगदी आवश्यक असलेल्या कामांनाच बाहेर पडावे. बाहेर जाताना स्वेटर, शाल, मफलर यांचा वापर करावा. मुख्य म्हणजे नाक आणि कान झाकून घेणारी माकडटोपी जरूर वापरावी. आजच्या तरुणांना ती आवडत नाही; पण थंड हवा नाका-तोंडातून जाण्यास त्यामुळे मज्जाव होतो आणि शिंका येणे, नाक गळणे हे प्रकार कमी होतात.

ज्या घरात लहान मुले असतील, त्यांनी घराची दारे, खिडक्या, सूर्यास्तानंतर बंद करून घ्यावी. छोट्या मुलांना पायात मोजे घालावेत, गार फरशीपासून त्यांना होणारा त्रास वाचू शकतो.
एक वर्षाखालील बाळांची तर खास काळजी घेणे आवश्यक असते. स्वेटर आणि गरम कपडे याचबरोबर त्यांची छाती, पाठ, कपाळ, कानशिले जर सकाळी आणि रात्री हलक्या गरम कापडाने शेकली तर त्यांना सर्दी होण्याचे प्रमाण कमी होते.

थंड हवेपासून जशी काळजी घ्यायची असते, तशीच हात वरचेवर धुण्याचीही दक्षता घ्यावी. सर्दीचे विषाणू हातांवाटे श्‍वासात जाऊन सर्दी होते. हात धुतल्यास हे प्रमाण बरेच कमी होते. 
गरम पाण्याची वाफ घेणे, कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, या गोष्टींचादेखील सर्दी-खोकला आटोक्यात आणायला उपयोग होतो. सर्दीमुळे डोके खूप दुखू लागले, ताप आला, खोकल्यातून पिवळा किंवा हिरवा कफ पडू लागला तर मात्र त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तदाब-हृदयविकार : या विकारांच्या रुग्णांनी बाहेर जाताना विशेष गरम कपडे वापरणे आवश्यक असते. कारण, थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढू शकतो. मात्र, अशा रुग्णांनी केवळ अंथरुणात पडून राहू नये, दिवसा शारीरिक हालचाल, सपाटीवर चालण्याचा व्यायाम, पीटीचे व्यायाम यांच्यावर भर द्यावा. या व्यायामांनी त्यांचे रक्त व्यवस्थित खेळायला लागते आणि शरीरात उब निर्माण होते.

त्वचा-चेहरा : आपल्या शरीरातील उष्णता बाहेर पडू नये यासाठी, नैसर्गिकपणे थंडीत त्वचेवरील घर्मरंध्रे बंद होतात; पण त्यामुळे त्वचेवरील तैलग्रंथींचा स्राव कमी पडून त्वचा कोरडी पडू लागते. याकरीता अंघोळीला खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. वासाचा साबण वापरू नये, त्यामुळे त्वचा जास्त कोरडी पडू लागते. कोरड्या त्वचेला भेगा पडतात आणि खाजही खूप येऊ लागते. त्याकरिता मॉइश्‍चरायझिंग साबण किंवा तेल नसलेला ग्लिसरीन साबण वापरावा.

थंडीत केसदेखील कोरडे पडून राठ होत असल्याने, शाम्पूचा वापर टाळावा. केसांना रात्री झोपताना तेल लावावे अथवा अंघोळीनंतर केसांचे क्रीम वापरावे. थंडीत ओठ फुटण्याचा त्रास अनेकांना होतो. अशा लोकांनी ओठ चावू नयेत. त्यामुळे ओठांना भेगा पडून त्यातून रक्त येऊ शकते. ओठांना दुधाची साय, लोणी, ग्लिसरीन किंवा व्हॅसलीन लावावे. काही व्यक्तींना थंडीत पायांना भेगा पडतात. अशांनी पायात बूट-मोजे वापरावेत. रोज रात्री पायांना तेल किंवा व्हॅसलीन लावावे. ज्यांना मधुमेह आहे अशांनी पायाला भेगा पडू न देण्याकडे विशेष लक्ष पुरवावे.

कान ः  कानात गार हवा गेल्याने सर्दी होते अशी जी समजूत आहे ती धादांतपणे चुकीची आहे आणि यासाठी अनेकजण कानात कापसाचे बोळे घालतात, ही पद्धत पूर्ण अशास्त्रीय आहे. थंडीत कानांना गारवा लागल्याने त्रास नक्कीच होतो; पण त्यासाठी कानांवर मफलर बांधणे, कानटोपी वापरणे किंवा फारच भीती वाटत असेल तर पोहताना कानात पाणी जाऊ नये म्हणून जे वापरतात, ते इअर प्लग्ज वापरावेत; पण कापूस कानात घालू नये. कापसाचे तंतू कानाच्या आत जमा होऊन ते कुजू शकतात आणि कानांना त्रास होऊ शकतो. 

डोळे ः थंडीत नाकाला जसे पाणी येते तसेच डोळ्यांनासुद्धा येते. डोळे लाल होतात, सुजतात; पण त्याकरिता प्रवास करताना चष्मा वापरावा, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. डोळे लाल झाल्यास दिवसातून  पाच-सहा वेळा साध्या किंवा किंचित कोमट पाण्याने धुवावेत आणि स्वच्छ रुमालाने पुसावेत. दमा-जुना खोकला : थंडीच्या दिवसात दम्याच्या आणि जुना खोकला म्हणजे सीओपीडीच्या  काही रुग्णांचे दुखणे डोके वर काढते. सुरुवात सर्दीपासून होते आणि दम लागतो. दम्याच्या रुग्णांचा बर्‍याचदा हा दम कोरडा असतो; पण जुन्या खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात कफ पडू लागतो. अशा रुग्णांनी थंडीपासून बचाव करावाच; पण आपले इनहेलर्स न चुकता वापरावेत. जास्त काळ दम लागल्यास किंवा खोकल्यातून पिवळा कफ पडू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला लगोलग घ्यावा. वेळेवर उपचार न केल्यास अशा रुग्णांना प्रसंगी इस्पितळात भरती करावे लागते.

सांधेदुखी ः संधिवात, सांध्यांच्या दुखण्याचे काही आजार असलेल्या व्यक्तींचे सांधे थंडी वाढत गेली तर जास्त वेदना देऊ लागतात. मोठी हाडे फ्रॅक्चर होऊन बरी झालेली असली, तरी हाडे जिथे मोडली होती त्या जागी वेदना होतात. अशा रुग्णांना गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेतल्यास बरे वाटू शकते. जास्त वेदना होत असल्यास किंवा सांधे सुजल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. 
मलावरोध ः थंडीमध्ये फारशी तहान लागत नाही, सबब पाणी कमी प्यायले जाते. त्यात या दिवसात मांसाहाराचे, तळलेल्या पदार्थांचे, तेलातुपाचे खाण्यातले प्रमाण वाढते. याचा परिणाम शौचाला घट्ट होण्यात होतो. यालाच मलावरोध म्हणतात.

या व्यक्ती शौचाला जोर करतात, त्यामुळे त्यांना फिशर, पाइल्स अशा मूळव्याधीच्या तक्रारी सुरू होतात. आधीपासूनच ज्यांना हे त्रास असतात, त्यांना पुन्हा हे विकार जाणवू लागतात. यासाठी तहान नसली तरी थोडे थोडे पाणी दिवसभर घेत राहिले पाहिजे. सर्वसाधारणपणे दोन ते तीन लिटर पाणी दिवसभरात जायला हरकत नसते. त्याचप्रमाणे चोथायुक्त अन्न म्हणजे पालेभाज्या, फळे आहारात वाढवावी.  हातपाय गार पडणे ः थंडीमध्ये काही व्यक्तींचे पाय इतरांपेक्षा खूप गार पडतात. अशा व्यक्तींनी डॉक्टरी सल्ला नक्की घ्यावा. याशिवाय पायात लोकरीचे मोजे वापरावेत, रात्री झोपताना कोमात पाण्यात पाय बुडवून  10-15 मिनिटे बसावे. शीत प्रदेशात पायांची नखे जर काळी किंवा जांभळी पडत असतील तर त्यांनी त्वरित वैद्यकीय तपासणी करून योग्य ते उपचार घ्यावेत.   
आहार ः थंडीमध्ये शरीर उबदार राखण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे आहारात पिष्टमय पदार्थ व चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. मात्र यालाही काही मर्यादा असतात. कारण, हे पदार्थ गरजेपेक्षा जास्त खाल्ले गेल्यास वजन वाढते. थंडीमध्ये अनेकांचे गाल आणि एकूणच शरीर गोलमटोल होऊ लागते.

* आहारामध्ये सर्वसाधारणपणे एकदल आणि द्विदल धान्य यांचे प्रमाण वाढवावे. यात एकदल धान्यातील बाजरी, नाचणी, जव आणि द्विदल प्रकारातील मसूर, वाल, वाटाणे, चणे, कुळीथ या धान्यांचा आहारात मर्यादित स्वरूपात वाढवावेत. भाज्यांमध्ये सुकी मेथी, कारली, वांगी, सूर्यफुलांचे देठ, शेवग्याच्या शेंगा व शेवग्याचा पाला आणि इतर हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
* मांसाहारी व्यक्तींनी या काळात रावस, पापलेट असे मोठे मासे खावेत. तर भाज्यांमध्ये कंद वर्गातील मुळा, लसूण, नवलकोल या पदार्थाचे प्रमाण कमी करावे.

* दुग्धजन्य पदार्थांपैकी दही थंडीच्या दिवसात फार प्रमाणात घेऊ नये. दही खावयाचे असल्यास कढीच्या रूपात खाता येऊ शकते. याशिवाय दह्याचे ताक आणि ताकावरील येणारे लोणी खाणे योग्य दह्यापासून बनविले जाणारे लोणी, ताक, तूप हे पदार्थ उपकारक ठरतात. परंतु जमवलेले दही अधिक खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. ताक किंवा कमी प्रमाणात दही खाण्याची इच्छा असल्यास दुपारच्या वेळी कमी प्रमाणात सेवन केले तरी चालते.

* थंड पाणी किंवा थंड पेय यांचे सेवन करू नये. खसखस, लाल मिरची, दालचिनी, राई किंवा राईचे तेल यांचा आहारात समावेश करताना काळजी घ्यावी आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवावे.
व्यायाम ः थंडीत घाम कमी येतो, हवा सुसह्य असते म्हणून या दिवसांत व्यायाम सुरू करणे उत्तम असते. व्यायामाने शरीराची आणि स्नायूंची क्षमता वाढते, ‘स्टॅमिना’ सुधारतो, शरीराला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळण्यास मदत होते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित व्यायामामुळे कोणताही आजार वा अपघात यांना तोंड देण्याची शरीराची क्षमता वाढते आणि एकूणच आरोग्य सुधारते.
अगोदर व्यायामाची सवय नसेल, तर थंडीत व्यायामाला सुरुवात करून व्यायामाचा वेळ आणि आवर्तने हळूहळू वाढवत नेणे योग्य असते. शरीराला सवय नसताना अतिरेकी ताण दिल्यास इजा होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे आधी ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग, सूर्यनमस्कार असे सोपे व्यायाम करावेत.

स्नायूंची क्षमता वाढवण्याचे वजन उचलण्यासारखे जिममधले वेत ट्रेनिंगचे व्यायाम, लवचिकता वाढवण्याचे योगासने, सूर्यनमस्कार आणि शरीराचा स्टॅमिना वाढवणारे जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग हे व्यायाम, असे व्यायामांचे तीन प्रमुख प्रकार करावेत... पण नुसताच वजने उचलण्याचा व्यायाम केल्यास स्नायू व सांध्यांना कडकपणा येईल, शरीराची ढबही बिघडू शकेल किंवा नुसतीच लवचिकता वाढवण्याचे व्यायाम केल्यास शरीराचा एंड्युरन्स आणि स्नायूंची ताकद तितकी वाढणार नाही. त्यामुळे आपल्या व्यायामाच्या आराखड्यात आपल्या प्रकृतीनुसार या व्यायाम प्रकारांचा योग्य मेळ हवा. यासाठी आवश्यक वाटल्यास व शक्य असल्यास प्रशिक्षित जिम ट्रेनरचे साह्य घ्यावे. आजारांना वेळीच ओळखून त्याचा प्रतिबंध, योग्य आहार, नियमित व्यायाम घेतल्यास हिवाळा हा आरोग्यऋतू नक्कीच बनू शकतो.