Fri, Apr 26, 2019 20:17होमपेज › Aarogya › ‘वीगन डाएट’ची वाढती लोकप्रियता

‘वीगन डाएट’ची वाढती लोकप्रियता

Published On: Nov 08 2018 1:29AM | Last Updated: Nov 07 2018 8:25PMडॉ. संतोष काळे

आपण वीगन डाएट सुरू करीत आहोत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नुकतेच सांगितले. ‘अ‍ॅनिमल प्रोटिन’पासून आपण चार महिन्यांपासून दूर राहिल्याची, तसेच सध्या आपल्या आहारात प्रोटिन शेक, भाज्या आणि सोयाबीनचा वापर अधिक असल्याची माहिती त्याने दिली. वीगन डाएटकडे जगभरातील असंख्य लोकांचा कल वाढताना दिसत आहे. विशेषतः, खेळाडू आपल्या गरजांप्रमाणे या आहाराकडे वळत आहेत. हे वीगन डाएट नेमके काय आहे आणि त्याचे फायदे-तोटे काय आहेत, हे जाणून घेऊया.

तेवीसवेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी टेनिसपटू सेरेना विल्यम्स, चारवेळा फॉर्म्युला वन स्पर्धेतील विश्‍वविजेता लेविस हेमिल्टन, बॉक्सर डेव्हिड हाय आणि आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, ही सारी क्रीडा क्षेत्रातील ठळक नावे आहेत. क्षेत्रे वेगवेगळी असली, तरी या सर्वांमध्ये एक गोष्ट एकसमान आहे. ती म्हणजे, या सर्वांनी वीगन डाएट स्वीकारले आहे. सेरेना विल्यम्सने तर गर्भवती असताना वीगन डाएट स्वीकारले होते. शरीराला पूर्ण पोषण मिळावे, हा या डाएटचा हेतू आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगभरात वीगन डाएटकडे कल वाढत चालल्याचे दिसून येते. या वीगन डाएटची लोकप्रियता वाढण्याची तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, कोणत्याही प्राणिजन्य पदार्थाचा या आहारात समावेश नसतो. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. तिसरे कारण म्हणजे, या आहाराचे आरोग्याच्या द‍ृष्टीने अनेक फायदे आहेत. वीगन डाएट पद्धतीचे योग्य स्वरूपात पालन केले, तर त्याचे अनेक फायदे आहेत. कमरेजवळची चरबी कमी होणे आणि रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होणे, हे त्यातील काही प्रमुख फायदे. या पार्श्‍वभूमीवर हे वीगन डाएट नेमके काय आहे, असा प्रश्‍न सर्वांना पडतो. कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता जे अन्‍नपदार्थ प्राप्‍त करता येऊ शकतात, त्यांचाच समावेश वीगन डाएटमध्ये केला जातो. म्हणूनच वीगन डाएटमध्ये प्राण्यांपासून प्राप्‍त होणारे मांस, अंडी आणि अन्य दुग्धजन्य उत्पादने समाविष्ट नसतात. त्याचप्रमाणे अलीकडील काळात आणखी एक गोष्ट या आहाराशी जोडली गेली आहे. ती म्हणजे, ज्या पदार्थांच्या निर्मितीसाठी पर्यावरणाचे काहीही नुकसान होत नाही, तेच पदार्थ या श्रेणीत समाविष्ट करण्यात येतात.

वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कारणांनी वीगन डाएट स्वीकारतात. काही जण प्राण्यांप्रति असलेल्या प्रेमापोटी या डाएटचा स्वीकार करतात. परंतु, खेळाडू या डाएटचा स्वीकार करतात तो शारीरिक कारणांसाठी. या डाएटमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि शरीर लवचीक, निरोगी राहते. कोणत्याही प्रकारची जखम भरून येण्यासाठीही या डाएटचा फायदा होतो. जेव्हा एखाद्या खेळाडूला जखम होते, तेव्हा शरीर आजारांच्या विषाणूंचा प्रतिकार करते. जखम झालेल्या ठिकाणी सूज येते आणि शरीराचा विषाणूंपासून बचाव होतो. जखम लहान असल्यास सूज येणे चांगलेच. परंतु, जखम मोठी असेल, तर सुजेमुळे ती वाढण्याचीच भीती अधिक असते. त्यामुळे खेळाडूंना अशा आहाराची गरज असते, ज्यात ऑक्सिडेंटस् अधिक प्रमाणात असतील. त्यामुळेच खेळाडू मोठ्या संख्येने वीगन डाएटकडे वळत आहेत, जेणेकरून जखमी होण्याच्या परिस्थितीत शरीराचे अधिक नुकसान होऊ नये.

शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान मेंदू मागील गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून नव्या माहितीसाठी मेंदूतील जागा रिकामी केली जावी. या सर्व संशोधनांमधून मूलतः ही गोष्ट समोर आली आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी विषयातील शास्त्रज्ञ कार्नोलियस यांनी केलेल्या दाव्यानुसार, मेंदूची जुन्या स्मृती विसरण्याची प्रक्रिया शोधून काढण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न आहे. सामान्यतः, नवीन गोष्टी शिकण्यासाठी संपर्क किंवा माहितीची देवाण-घेवाण आवश्यक असते. या सर्व गोष्टी नंतर स्मृतींचा हिस्सा बनतात. संशोधकांनी ‘हिप्पोकॅम्पस’ म्हणजे स्मरणशक्‍तीसाठी कारणीभूत ठरणार्‍या मेंदूच्या भागावर प्रदीर्घ काळ संशोधन केले. या कालावधीतच नवीन स्मृतींना जागा करून देण्यासाठी जुन्या गोष्टी विसरण्याच्या मेंदूतील प्रक्रियेचा छडा संशोधकांना लागला. परंतु, वीगन आहार निवडायचा कसा, हा प्रश्‍न अनेकांना पडतो आणि येथेच आहारतज्ज्ञांची भूमिका सुरू होते. प्रत्येक खेळाडूची किंवा प्रत्येक व्यक्‍तीची आहाराची गरज वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, एखाद्या वेटलिफ्टरला अधिक प्रथिनांची गरज असते. त्याचे स्नायू बळकट असावे लागतात. परंतु, एखाद्या धावपटूला ताकदीबरोबरच ऊर्जेची गरज असते आणि त्याच्यासाठी कार्बोहायड्रेटस्चे महत्त्व अधिक असते. अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या व्यक्‍तींसाठी वीगन आहारही वेगवेगळा असतो. अशा स्थितीत वीगन आहार स्वीकारण्यासाठी चांगल्या आहारतज्ज्ञाचा सल्ला आवश्यक ठरतो.

वीगन आहारातून प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळत असतील; परंतु बाकीचे घटक शरीराला व्यवस्थित मिळत नसतील, तरी असंतुलन होऊ शकते. काही खेळाडू वीगन आहार स्वीकारल्यानंतर अन्य पोषक घटक शरीराला मिळावेत म्हणून औषधे, गोळ्यांचा आधार घेतात. उदाहरणार्थ, वीगन आहारातून शरीराला फाईटोकेमिकल्स मिळतात आणि कर्करोगाशी लढण्यासाठी ती उपयुक्‍त ठरतात. परंतु, प्राणिजन्य पदार्थांमधून मिळणारे बी-12 जीवनसत्त्व शरीराला मिळत नसेल, तर ती गरज कशी पूर्ण करावी, हे ठाऊक असायला हवे. म्हणजेच, वीगन आहार स्वीकारण्यासाठी संतुलन साधणे आवश्यक असते. भावनेच्या भरात वीगन आहार स्वीकारणे आणि शरीराच्या गरजा दुर्लक्षित करणे योग्य ठरत नाही. त्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन मगच हा आहार स्वीकारणे योग्य ठरते. वीगन आहाराचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. तोट्यांविषयी माहिती करून घेतली आणि ते दूर ठेवले, तर वीगन आहार उपयुक्‍त ठरतो. 

जगभरात जेवढ्या व्यक्‍ती वीगन डाएट स्वीकारतात, त्या कोणत्याही दुसर्‍या व्यक्‍तीला माहिती घेतल्याखेरीज वीगन आहार स्वीकारण्याचा  सल्ला देत नाहीत. याखेरीज जे लोक प्राण्यांपासून प्राप्त मांस आणि अन्य पदार्थ खात नसतील; परंतु रिफाईंड अन्‍नधान्ये, साखरयुक्‍त ज्यूस, बटाट्याचे वेफर्स आणि अन्य पदार्थ खातात, त्यांना वीगन आहाराचा विशेष लाभ होत नाही. वीगन हे शिस्तीचे दुसरे नाव आहे आणि हा आहार आपल्या शरीराच्या गरजांबाबत सचेत बनवितो. वनस्पतींपासून प्राप्त अन्‍नपदार्थांवरील अवलंबित्व चांगलेच आहे; परंतु त्यातूनही कोणते पदार्थ निवडायचे, यावर बरेच काही अवलंबून असते. विराट कोहली, सेरेना विल्यम्स किंवा लियोनेल मेसी यांच्यासोबत आहारतज्ज्ञांची मोठी टीम असते आणि ही मंडळी सातत्याने संबंधित व्यक्‍तीच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवून असतात. सामान्य माणसाकडे अशी टीम नसते, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे सामान्य व्यक्‍तीला जर वीगन आहार स्वीकारायचा असेल, तर सुरुवातीच्या काळात पोषक घटकांविषयी तज्ज्ञांशी सातत्याने संवाद साधणे गरजेचे ठरते. वीगन आहाराचे फायदे अनेक आहेत, हे नक्‍की. जर संतुलन साधून हा आहार निवडला, तर शरीरावर त्याचा परिणामही लवकर दिसून येतो. म्हणूनच ज्यांना ऊर्जेची सर्वाधिक गरज असते, असे खेळाडू हा आहार स्वीकारताना दिसत आहेत.

वीगन हा केवळ आहार नसून ती जीवनशैली आहे. ती स्वीकारताना कातडी वस्तू, रेशीम, लोकर यासह जनावरांपासून प्राप्त होणार्‍या सर्वच वस्तूंचा त्याग केला जातो. वीगन आहाराचा प्रमुख हेतू प्राण्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, असा आहार स्वीकारणे; परंतु हा आहार स्वीकारण्याचे काही तोटेही आहेत. बी-12 जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ आणि वीगन आहार स्वीकारल्यामुळे या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होण्याचा धोका असतो. वीगन आहारात बी-12 जीवनसत्त्वयुक्‍त फोर्टिफाईड आहाराचा समावेश करावा लागतो. त्याचप्रमाणे शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते. संत्रे आणि सोयाबीनची विविध उत्पादने हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. वीगन आहार स्वीकारणार्‍यांच्या शरीरात बी-12 जीवनसत्त्व आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होण्याचा धोका संभवतो. त्याचप्रमाणे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळेही काही समस्या उद्भवू शकतात. ही कमतरता दूर करण्यासाठी विशिष्ट पदार्थांचे सेवन करावे लागते.

शाकाहारी पदार्थांमध्ये जे लोह असते, ते शरीरात शोषण्याची प्रक्रिया सहज होत नाही. त्यामुळेच वीगन आहार स्वीकारणार्‍यांना आयर्न आणि झिंकच्या पूर्ततेचाही विचार करावा लागतो. योग्य आहारतज्ज्ञाकडून वीगन आहाराची माहिती घेणे आणि मार्गदर्शनाखालीच स्वीकारणे, एवढा एकच उपयुक्‍त मार्ग असू शकतो. त्याचप्रमाणे ज्या घटकांची शरीरात पूर्तता होणार नाही, ते घटक आहाराव्यतिरिक्‍त अन्य मार्गाने शरीराला पुरवावे लागतात. 

जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे वीगन डाएट प्रचलित आहे. काही जण अखंडित अन्‍नधान्य, फळे, भाज्या, डाळी, सुका मेवा यांचा आहारात समावेश करतात. काही जण फळे, भाज्या, मेवा आणि बिया असे पदार्थ कच्च्या स्वरूपात ग्रहण करतात. भोजन अत्यंत कमी आचेवर खूप कमी वेळ शिजवून खातात. 80/10/10 प्रकारच्या वीगन डाएटमध्ये कच्चे अन्‍नपदार्थ खाण्यावर भर दिला जातो. सुका मेवा आणि फॅटस् मिळतील अशा वनस्पतींचा आहारात समावेश असतो. फळे आणि भाज्या कच्च्या स्वरूपातच खाल्ल्या जातात. 80 टक्के कॅलरी कार्बोहायड्रेट्समधून, 10 टक्के प्रथिनांमधून तर 10 टक्के फॅटस्मधून मिळविणे हा अशा प्रकारच्या आहाराचा उद्देश असतो. स्टार्चयुक्‍त वीगन आहार घेणारे लोक फॅट कमी आणि कार्बोहायड्रेट्स मर्यादित स्वरूपात घेतात. हे लोक फळांऐवजी बटाटा आणि तांदूळ, मका यांसारख्या घटकांचा आहारात समावेश करतात. वीगन आहार घेणारे काहीजण दुपारी चार वाजेपर्यंत कच्चा आहार घेतात. फळे आणि भाज्यांचा त्यात समावेश असतो. रात्रीच्या भोजनात ते शिजलेले अन्‍न खातात.

अशा प्रकारे वीगन डाएटचे अनेक प्रकार असतात. मांसाहारी व्यक्‍तींप्रमाणे अतिरिक्‍त चरबी शरीरात साचण्याचा धोका वीगन आहार घेणार्‍यांना नसतो. वजन कमी करण्यासाठी अनेकजण वीगन आहाराकडे वळत आहेत. वीगन आहारात फायबरची मात्रा अधिक असल्यामुळे व्यक्‍तीला बराच काळ भूक लागत नाही आणि त्यामुळेच तो जंकफूडसारखे घातक पदार्थ खात नाही. रक्‍तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि मधुमेह आटोक्यात राहतो. हा आहार घेणार्‍यांमध्ये हृदयविकाराचा धोका 75 टक्के कमी झाल्याचे दिसून आले आहे. या आहारात पशुजन्य वस्तू, मांस वगैरे निषिद्ध आहे. मासे तसेच जलचरांचे सेवनही करता येत नाही. दूध, दही, पनीर अशी डेअरी उत्पादने वर्ज्य आहेत. तसेच अंडी खाण्यासही मनाई आहे. मधमाशीपासून मिळणारा मध, नैसर्गिक जेली असे पदार्थ मधमाशीने तिच्यासाठी जमविलेले असल्यामुळे तेही खाण्यास मनाई आहे. वीगन आहार ही नवी आहारपद्धती असल्यामुळे याबाबत अधिक संशोधन आणि निष्कर्ष तूर्तास उपलब्ध नाहीत; परंतु येत्या काही वर्षांत आपल्याला या आहारपद्धतीची पूर्ण माहिती मिळू शकेल आणि फायदे-तोटेही अधिक प्रमाणात समजतील.