Thu, Apr 25, 2019 11:32होमपेज › Aarogya › एक मच्छर...

एक मच्छर...

Published On: Aug 09 2018 1:38AM | Last Updated: Aug 09 2018 1:38AMजगातील सर्वात धोकादायक प्राणी कोणता, असे विचारल्यास काय सांगाल? शार्क, मगर की अणुकुचीदार दात असलेले शिकारी प्राणी? पण जगातील धोकादायक प्राणी अगदी लहानसा आहे. ऐकून अचंबित व्हाल; पण डास चावल्याने जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा हा डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचा काळ. त्यामुळेच या काळात डासांपासून बचाव करण्यासाठी अत्यंत दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यासाठी डासांमुळे कोणते प्राणघातक आजार होऊ शकतात हे जाणून घेऊ... 

मलेरिया : डासांच्या अ‍ॅनाफिलिस प्रकारातील मादी डास चावल्याने होतो. मलेरियाचे जीवाणू डास चावल्यानंतर लाल रक्‍त पेशींमध्ये शिरतात. त्यामुळे रक्‍ताल्पता किंवा अ‍ॅनिमिया होतो. तसेच चक्‍कर येणे, दम लागणे इत्यादी लक्षणेही दिसतात. त्याशिवाय काही सर्वसाधारण लक्षणेही दिसतात जसे ताप, सर्दी, मळमळ यासारखा त्रास होतो. गंभीर परिस्थितीत रुग्णाला चक्‍करही येऊ शकते. या लक्षणांची वारंवारिता वाढते तसे व्यक्‍तीला थंडी, उकडा आणि घाम या सर्वच गोष्टी एकावेळी घडतात. सर्वसाधारणपणे वस्त्यांमध्ये, दाटीवाटीच्या वस्तीत, ग्रामीण भागात आणि महानगरांमध्येही साफसफाई, सांडपणी व्यवस्थापनाचा अभाव आणि कचरा निर्मूलन सारख्या महत्त्वपूर्ण सोयीसुविधांच्या अभावामुळे मलेरिया पसरू शकतो. मलेरियाचा ताप आल्यास शरीराचे तापमान वेगाने घटते, वाढते. त्यामुळे सातत्याने रक्‍ताची तपासणी करावी लागते. 

डेंग्यू : डेंग्यू संक्रमित इडिस इजिप्‍ती या डासांच्या चावण्यामुळे होतो. हा आजार खूप वेदनादायी आणि अशक्‍तपणा आणणारा आहे. या आजाराची लक्षणे डास चावल्यानंतर 4-10 दिवसांनंतर दिसतात. या लक्षणांमध्ये व्यक्‍तीला खूप ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, स्नायू आणि सांधे यांचे दुखणे, तसेच शरीरावर पुरळ येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डेंग्यू झाल्यावर रक्‍तामध्ये वेगाने संसर्ग होतो. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे आजारावर लवकर नियंत्रण मिळवता येते. डेंग्यूवर विशेष कोणतेही इंजेक्शन किंवा औषध नाही. यामध्ये तापासाठी दिले जाणारे औषधच सर्वसामान्यपणे रुग्णाला दिले जाते आणि जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय, व्यक्‍तीला जास्त पाणी पिण्याचा सल्लाही दिला जातो. 

चिकुनगुनिया : एडिस डासाच्या डंखातून हा जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. यामध्येही डेंग्यूप्रमाणेच लक्षणे दिसतात; पण हा आजार हा वेदनादायक आहे. त्यात तीव्र ताप आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. चिकुनगुनियामुळे शरीर अशक्‍त होते. चिकुनगुनियामध्ये होणारी सांधेदुखी अनेक आठवडे राहते किंवा संसर्गामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. या आजारावरही कोणतेही इंजेक्शन किंवा विशेष औषध नाही. हा आजार होऊ नये, यासाठी डासांपासून बचाव हा एकमात्र प्रतिबंधक उपाय आहे. एकच गोष्ट चांगली आहे ती म्हणजे एकदा हा आजारा झाल्यास शरीरात त्याची प्रतिकारक्षमता विकसित होते आणि परत याचा संसर्ग होण्याची शंका राहत नाही.  

झिका व्हायरस : झिका व्हायरस हा एडीस इजिप्टी नावाच्या डासामुळे फैलावतो. ज्या डासामुळे डेंगू, चिकुन गुनिया, पीत ज्वर होतात त्या विषाणुमुळे झिका व्हायरस फैलावतो. संक्रमित आईमुळे तो नवजात बालकांत पसरतो. रक्‍त चढवणे, लैंगिक संबंधातूनही हा व्हायरसचा फैलाव होतो. अर्थात लैंगिक संबंधातून या विषाणूचा प्रसार झाल्याचे एकच प्रकरण समोर आले आहे. झिका विषाणू ओळखणे खूप मुश्कील आहे कारण त्याची काही विशेष लक्षणे दिसत नाहीत. पण, डास चावल्यानंतर 3 ते 12 दिवसांत चार पैकी 3 व्यक्‍तींमध्ये खूप तीव्र ताप, पुरळ, डोकेदुखी आणि सांधेदुखीची लक्षणे दिसतात. 

पीत ज्वर : पीत ज्वर किंवा यलो फीव्हर हा संसर्गजन्य रोग आहे. हा देखील एडिस इजिप्टी नावाच्या डासांमुळे होतो. त्याने पीडित व्यक्‍तीमध्ये काविळीची लक्षणे दिसतात. यकृताच्या कार्यात बिघाड झाल्याने डोळे आणि त्वचा पिवळी पडते. कोणत्याही व्यक्‍तीमध्ये विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांनीच त्याविषयी कळते. पीत ज्वराने होणार्‍या मृत्यूंची आकडेवारी 50 टक्के आहे. पीत ज्वरासाठी विशेष औषधे आणि लसही निर्माण झाली आहे. मात्र, तरीही हा आजार बरा होण्यासाठी काही कालावधी लागतोच. हा आजार विशेषतः कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान असणार्‍या आफ्रिकी आणि अमेरिकन देशात होत असल्याचे पहायला मिळते. 

जपानी इन्सेफलायटिस : विषाणूंचे संक्रमण झालेल्या डासांच्या डंखामुळे हा आजार मनुष्याला होतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा आजार आढळून येतो. मुलांमध्ये एन्सेफलायटिस किंवा मेंदूला येणारी सूज येण्यास कारणीभूत ठरते. ज्या लोकांना याचा संसर्ग होतो त्यांना थंडी, ताप, घशात वेदना, डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि उलटी सारखी काही लक्षणे दिसतात. पण, मेंदूमध्ये या रोगाची पातळी वाढू शकते त्या परिस्थितीत हृदयविकाराचा झटका, कोमा आणि लकवा होऊ शकतो..


डॉ. संतोष काळे