Wed, Oct 16, 2019 09:48होमपेज › Aarogya › मॅग्नेशियमही गरजेचेच!

मॅग्नेशियमही गरजेचेच!

Published On: Feb 07 2019 1:24AM | Last Updated: Feb 07 2019 1:24AM
डॉ. भारत लुणावत
 

चांगल्या आरोग्यासाठी मॅग्नेशियम योग्य प्रमाणात शरीरात गेले पाहिजे; पण तज्ज्ञांच्या मते आपल्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांची कमतरता आहे. त्यामुळे आपल्या शरीराला योग्य त्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळत नाही. शरीरातील मॅग्नेशियमचे कमी प्रमाण अनेक रोगांना आमंत्रण ठरू शकते. जे लोक मॅग्नेशियम आणि इतर खनिजांचा समावेश असलेले पदार्थ आहारात घेतात, त्यांचा रक्तदाब नियंत्रित राहतो, असा ब्रिटनमध्ये प्रसिद्ध होणार्‍या जर्नलमधल्या निबंधात म्हटले आहे. 

रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी आणि मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकारात मॅग्नेशियम उपयोगी पडू शकते का, याविषयी अधिक संशोधन सुरू आहे. गर्भवती महिलेला जर दम्याचा आणि आकडीचा जोरदार झटका आल्यास मॅग्नेशियमचे इंजेक्शन दिले जाते. शरीरात मॅग्नेेशियमची कमतरता, ही दुर्मीळ बाब आहे; मात्र काही आजारांत जसे मूत्रपिंडाचे आजार, पचनशक्तीचे आजार, पॅराथायरॉईडची समस्या, मधुमेह किंवा कॅन्सरमध्ये घेतली जाणारी प्रतिजैविके किंवा अतिमद्यपान करणार्‍या व्यक्तीत मॅग्नेशियमची कमतरता जाणवू शकते. 

गरज किती? : सगळ्यांना मॅग्नेशियमची आवश्यकता असते. महिलांना 270 मिलिग्रॅम प्रतिदिन आणि पुरुषांना 300 मिलिग्रॅम प्रतिदिन इतक्या प्रमाणात मॅग्नेशियमची गरज असते; पण तेच प्रमाण जर 400 मिलिग्रॅमपेक्षा जास्त झाले, तर जुलाब होण्याची शक्यता असते. मॅग्नेशियम जास्त सेवनही धोकादायक ठरते. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास उलट्या, जुलाब, कमी रक्तदाब, स्नायूंचा थकवा यासारखी लक्षणे दिसतात आणि अतिप्रमाण झाल्यास जीवाला धोकाही उत्पन्न होऊ शकतो. 
दुष्परिणाम : 
वर सांगितलेले दुष्परिणाम वगळता जे लोक मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार यासारख्या आजारांसाठी प्रतिजैविके घेत असतील, त्यांना मॅग्नेशियमचे पूरक औषध घेणे धोक्याचे असते. त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, हृदयविकाराच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मॅग्नेशियमचा पूरक डोस घेऊ नये. 
शांत झोप : झोपण्याआधी मॅग्नेशियमचे पूरक औषध घेतल्यास आराम मिळतो. ते घेणार्‍या व्यक्तीला शांत झोप लागते. रात्री आठ वाजण्याआधी जर याचे पूरक औषध घेतले, तर दिवसभर याचा फायदा जाणवतो. 
मॅग्नेशियम असलेले पदार्थ 
पालक - 157 मिलिग्रॅम/एक कप 
रसपालक - 154 मिलिग्रॅम/एक कप 
भोपळ्याच्या बिया - एक कप बियांचा आठवा भाग - 92 मिलिग्रॅम
दही - 50 मिलिग्रॅम/एक कप 
बदाम - 80 मिलिग्रॅम/एक कप
काळा घेवडा - 120 मिलिग्रॅम/एक कप
एव्हाकॅडो - एक मध्यम आकाराचे फळ 58 मिलिग्रॅम
अंजीर - 100 मिलिग्रॅम/एक कप
डार्क चॉकलेट - एक तुकड्यातून 95 मिलिग्रॅम
केळे - एक मध्यम आकाराचे 32 मिलिग्रॅम
या सगळ्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला शरीराच्या गरजेइतके मॅग्नेशियम नक्कीच मिळेल. त्याच्या कमतरतेमुळे होणारे रोगही टाळता येतील.