Wed, Feb 26, 2020 19:23होमपेज › Aarogya › हात, पाय थंड पडताहेत...

हात, पाय थंड पडताहेत...

Last Updated: Jan 23 2020 1:50AM
डॉ. प्राजक्‍ता पाटील

हिवाळ्यात हात, पाय थंड पडणे, हेदेखील स्वाभाविक आहे; मात्र थंडीचा काळ नसतानाही हात, पाय थंड पडत असतील, तर मात्र काही तरी गडबड आहे, असे मानण्यास हरकत नाही. अर्थात, केवळ हात, पाय थंड पडणे, हे काही खूप मोठ्या विकाराचे पूर्वलक्षण नाही. कदाचित, मेंदूमधील संवेदना पेशींकडून शरीराचे तापमान संतुलित करण्यासाठी वापरण्यात आलेली ही पद्धती असावी; मात्र सातत्याने हात, पाय थंड पडत असतील किंवा हात, पाय थंड पडणे अगदी सहनशीलतेच्या बाहेर जात असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. 

हात, पाय थंड पडण्याची अनेक कारणे आहेत. थंडीच्या दिवसांत हात, पाय गार पडणे, ही अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे; मात्र त्या व्यतिरिक्‍तही काही कारणे आहेत, ज्यामुळे हात, पाय थंड पडू शकतात. डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हिवाळ्यात हात, पाय थंड पडू शकतात. एखाद्या व्यक्‍तीच्या उंचीच्या तुलनेत वजन नसेल तर त्याला थंडी वाजण्याची शक्यता अधिक असते. शरीरात मेद किंवा चरबी कमी प्रमाणात असेल आणि शरीर उष्ण राहू शकत नसेल तर आपल्याला थंडी वाजू शकते. अशा परिस्थितीत आहारामध्ये योग्य बदल करून शरीरात उष्णता निर्माण करू शकतो. 

थंडी सहन न होणे, पाणी कमी पिणे आणि लघू रक्‍तदाब असलेल्या लोकांनाही थंडीचा अधिक त्रास होतो. रक्‍ताचा पुरवठा सुरळीत होत नसेल किंवा त्यात काही अडथळा येत असेल तरीही हात, पाय थंड पडू शकतात. खूप जास्त गारठा असणार्‍या प्रदेशांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात जाणवते. त्याचबरोबर अतितणाव असेल, तरीही व्यक्‍तीचे हात, पाय गार पडू शकतात. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही; परंतु जर हात पायाचा रंग बदलून ते निळे, जांभळे किंवा पांढरे पडत असतील तर मात्र या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नये. 

असा काही बदल जाणवल्यास त्वरेने हात पायाला उष्णता कशी मिळेल, याचे उपाय सुरू करावेत. 90 टक्के रुग्णांना या उपायाने आराम मिळतो. हृदयविकाराने ग्रस्त लोकांना थंडी जास्त वाजते. रक्‍तवाहिन्या संकुचित झाल्यामुळेही थंडी वाजू शकते. हात, पाय यांच्या बोटांपर्यंत रक्‍ताचा प्रवाह योग्य प्रकारे पोहोचत नाही. त्यामुळे थंडी वाजण्याचे प्रमाण अधिक असते. 

ज्या व्यक्‍तींना संधिवाताचा त्रास असतो, त्यांनाही गारवा जाणवतो, त्यांचे हात, पाय थंड पडतात. शरीरात लोहाची कमतरता असेल तरीही या समस्येला सामोरे जावे लागते. शरीरात लोह कमी असेल तर अवयवांपर्यंत पुरेसा रक्‍तपुरवठा होत नाही. सर्वसाधारणपणे त्यामुळे हाता-पायांची बोटे बधीर होतात, थंड पडतात. 

लोहाच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथींच्या स्रावावरही परिणाम होतो. त्यामुळेही थंडी जाणवू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनाही जास्त थंडी वाजते, खूप जास्त वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्यास पाय थंड पडतात.

जर आपले हात, पाय सातत्याने थंड पडत असतील आणि त्यांचा रंग बदलत असेल तर मात्र ही गोष्ट गभीर आहे. एखाद्या मोठ्या समस्येचे हे लक्षण असू शकते. खूप जास्त गारवा किंवा थंडी असेल तर फ्रॉस्टबाईट म्हणजे हिमबाधा होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामध्ये हात, पाय यांच्यामध्ये रक्‍त साठते किंवा साकळते आणि त्वचा आणि पेशी नष्ट होऊ लागतात. या परिस्थितीत अनेक वेळा त्वचा संकुचित होते आणि फाटू लागते. अशा वेळी त्वचेला स्पर्श केला तरीही काहीच संवेदना जाणवत नाहीत. या परिस्थिती दिरंगाई न करता डॉक्टरांकडे जावे. 

ल्युपस किंवा त्वचाक्षय झालेल्या व्यक्‍तीलाही हात, पाय थंड पडत असल्याची समस्या जाणवू शकते. सिस्टमिक ल्युपसमध्ये रक्‍तवाहिन्या नष्ट होतात. त्यामुळेच हात, पाय थंड पडतात. खूप जास्त थंड वातावरणात हात, पाय आखडतात. त्याला रेनॉड रोग असे म्हणतात. रेनॉड रोगामध्ये रक्‍तवाहिन्या संकुचित होतात. त्यातून वाहणारे रक्‍त कमी होते. या विकारामध्ये हाता-पायांच्या बोटांचा रंग सावळा किंवा काळसर दिसू लागतो. थायरॉईड, रक्‍ताभिसरण, मज्जासंस्थेशी निगडित विकार यामुळेही हात, पाय थंड पडू शकतात. 

हिवाळ्यातील तापमान कमी झाल्याने हवेतील गारवा वाढतो. त्यामुळे हात, पाय थंड पडणे, आखडणे हे सर्वसाधारण त्रास होतातच; पण थंडीव्यतिरिक्‍तही जर हात, पाय थंड पडत असतील, त्यांचा रंग बदलत असेल, तर दुर्लक्ष न करता, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते. 

थंडीच्या महिन्यांत अशी घ्या काळजी 
हातामध्ये लोकरी हातमोजे घालावेत. 
हाता-पायांत घट्ट मोजे किंवा बूट घालू नयेत. 
हात, पाय थंड पडल्यास गरम ऊबदारस्थानी जावे, तसेच गरम पाण्याने शेकावे.
थंड पाण्यापासून बचाव करण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी पुरेसे ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे. 
थंडी खूप जास्त वाजत असेल तर गरम पाण्यात पाय घालून बसावे. 
अतिथंड वातावरणात रक्‍तप्रवाह थांबू नये, यासाठी हात, पाय हलवत राहावेत. 
हिवाळ्यात भूक चांगली लागते; मात्र आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.