अस्थमा किंवा दमा एकदा कुणाला झाला, तर तो आयुष्यभर त्याची साथ देतो. अर्थात, वेळेवर उपचार केले आणि पुढे योग्य काळजी घेतली, योग्य पथ्यपाणी केले, तर हा आजार नियंत्रणात राहतो. या आजाराची कारणे, उपचार आणि तो कसा सांभाळायचा याविषयी माहिती देणारा लेख...
अस्थमा (दमा) हा श्वसनाशी निगडित आजार आहे. यात श्वास घेताना त्रास होतो. या आजारात श्वासनलिकेला सूज येते किंवा श्वासनलिका बारीक होते. यामुळे फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव पडतो. मग श्वास घेताना धाप लागते, खोकला येतो आणि छातीत आवळल्यासारखे होऊन घर्र घर्र असा आवाज येऊ लागतो. अस्थमा कोणत्याही वयात होऊ शकतो.
लक्षणांचा विचार केला, तर अस्थमा दोन प्रकारचा असतो : बाहेरचा आणि आंतरिक अस्थमा.
बाहेरचा अस्थमा हा परागकण, प्राणी, धूळ, अस्वच्छता, झुरळे अशा कारणांनी होऊ शकतो, तर आंतरिक अस्थमा हा काही रासायनिक पदार्थ शरीरात जाण्याने होतो. प्रदूषण, सिगारेटचा धूर अशा कारणांनी हे रासायनिक पदार्थ शरीरात जाऊ शकतात. सर्वसाधारणपणे हा आजार हवामान बदलल्यावर जास्त बळावतो.
अस्थम्याची लक्षणे
- श्वास लागणे
- सतत खोकला येणे
- छातीतून आवाज येणे
- छातीत कफ होणे
- श्वास घेण्यात अचानक अडथळा येणे
अस्थमा कधी वाढतो?
- रात्री किंवा पहाटे
- थंड हवेत किंवा धुक्यात
- जास्त व्यायाम केल्यानंतर
- पावसाळ्यात किंवा थंडीच्या वातावरणात
आजाराची कारणे
अनुवंशिक : अस्थमाचा आजार जेनेटिक किंवा अनुवंशिक कारणांमुळे होऊ शकतो. आई-वडिलांपैकी कुणाला अस्थमा असेल, तर मुलांना हा आजार होण्याची शक्यता असते. आई-वडील दोघांनाही हा आजार असेल, तर मुलांना तो होण्याची शक्यता 50 ते 70 टक्के असते आणि एकाला असेल तर 30 ते 40 टक्के शक्यता असते.
वायू प्रदूषण : अस्थमाचा विकार जडण्याचे वायू प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. धूम्रपान, धूळ, कारखान्यांतून बाहेर पडणारा धूर, धूप-अगरबत्ती आणि कॉस्मेटिकसारख्या सुगंधी गोष्टींमुळे हा आजार बळावतो.
खाण्या-पिण्याच्या गोष्टी : एखादा पदार्थ खाण्यामुळे जर शारीरिक समस्या येत असेल, तर तो पदार्थ खाणे टाळले पाहिजे. सर्वसाधारणपणे अंडी, मासे, सोयाबीन, गहू यामुळे जर अॅलर्जी होत असेल, तर अस्थमाचा विकार जडण्याची शक्यता असते.
धूम्रपान : सिगारेट ओढण्याने अस्थमाचा विकार जडण्याचा संभव असतो. एका सिगारेटमुळेही हा आजार जडू शकतो.
औषधे : रक्तदाबाच्या विकारात देण्यात येणारी बीटा ब्लॉकर्स, काही वेदनाशामक औषधे आणि काही अँटिबायोटिक औषधांमुळे दम्याचा आजार होऊ शकतो.
तणाव : चिंता, भीती, धोका यासारख्या भावनिक उतार-चढावांमुळे मनावरचा ताण वाढतो. यामुळे श्वासनलिकेत अडथळा निर्माण होतो आणि अस्थमाचा झटका येतो.
अस्थमा आणि अॅलर्जी यातील फरक
अस्थमा आणि अॅलर्जी यात बर्याचदा गल्लत केली जाते. अर्थात, या दोन्हीत अनेक गोष्टी समान आहेत; पण तरीही हे दोन्ही आजार वेगवेगळे आहेत. अनेक दिवस सर्दी, खोकला किंवा श्वास घेताना त्रास होत असेल, तर यामागे संसर्ग किंवा इन्फेक्शन हे कारण असू शकते. तर अस्थमात श्वास घेताना त्रास होतोच, याशिवाय रात्री झोपताना खोकला येणे, छातीत जखडल्यासारखे वाटणे, व्यायाम करताना किंवा जिना चढताना धाप लागणे किंवा खोकला येणे, अधिक थंडी किंवा उकाडा असल्यास श्वास घेण्यात त्रास होणे, अशी लक्षणे दिसतात.
मात्र, तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, अस्थमा हा एक प्रकारची अॅलर्जीच आहे. शरीर अॅलर्जी असलेल्या पदार्थांच्या संपर्कात आले की, अस्थमाचा झटका येतो. याला अॅलर्जिक अस्थमा असे म्हणतात. अॅलर्जी आणि अस्थमा यांच्यात आणखी एक संबंध आहे, तो म्हणजे कुणाला अॅलर्जिक अस्थमा नसेल आणि केवळ अॅलर्जी असेल, तर त्याला अस्थमा होण्याचा धोका 40 टक्क्यांपर्यंत वाढतो. अस्थमाचे निदान करण्यासाठी स्पायरोमेट्री, पीक फ्लो, लंग्स फंक्शन टेस्ट, रक्त तपासणी अशा काही चाचण्या केल्या जातात.
अस्थमाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी
- औषधे नियमितपणे घ्यावीत.
- झाडूने साफसफाई करणे टाळावे. असे करत असाल तर तोंड आणि नाक कापडाने झाकून घ्या. व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करणे जास्त चांगले. ओल्या फडक्याने किंवा पाण्याने फरशी धुणे हाही एक चांगला पर्याय आहे.
- बेडशीट, सोफा, गाद्या यांची स्वच्छता नियमितपणे करा, विशेषत: उशांची. कारण, अॅलर्जीचे सगळे घटक यात असतात. आठवड्यातून एकदा बेडशीट आणि उशांची कवर बदला आणि पडदे दोन महिन्यांनी धुवायला काढा.
- कारपेटचा वापर करू नका किंवा कमीत कमी सहा महिन्यांतून एकदा ते ड्रायक्लिनिंगला द्या.
- घरात झुरळे, उंदीर, घुशी यांना थारा देऊ नका.
- ऋतू बदलत असताना काळजी घ्या. खूप थंडीतून खूप गरम ठिकाणी अचानक जाऊ नका आणि खूप थंड तसेच खूप गरम काही खाऊ नका.
- तुमचे दैनंदिन काम, रूटीन व्यवस्थित ठेवा. वेळेवर झोपा, भरपूर झोप घ्या आणि कोणताही ताण घेऊ नका.
आहाराची काळजी घ्या
- जो पदार्थ खाण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, तो पदार्थ खाऊ नका. अनेकदा डॉक्टर थंड पदार्थ खाण्यास मनाई करतात. डॉक्टर जे पदार्थ खाऊ नका म्हणून सांगतात, तेवढेच खाऊ नका. बाकी सगळे खा. मात्र, जंक फूड खाण्याने अस्थमाचा धोका वाढतो.
- एकाच वेळी जास्त खाऊ नका. त्यामुळे छातीवर दबाव वाढतो.
- जीवनसत्त्व अ (पालक, पपई, आंबे, अंडे, दूध, चीज, बेरी वगैरे), क (टोमॅटो, संत्रे, लिंबू, ब्रोकली, लाल-पिवळी ढब्बू मिरची) आणि ई (पालक, रताळे, बदाम, सूर्यफुलाचे बी वगैरे) आणि अँटिऑक्सिडंट असलेली फळे आणि भाज्या म्हणजे बदाम, आक्रोड, राजमा, शेंगदाणे, रताळी वगैरे खाण्याने फायदा होतो.
- आले, लसूण, हळद आणि मिरी या मसाल्याच्या पदार्थांचाही गुण येतो.
- ज्वारी, बाजरी, ब्राऊन राईस, डाळी, ब्रोकली वगैरे तंतुमय पदार्थही अस्थम्यावर गुणकारी आहेत.
- फळे आणि हिरव्या भाज्या भरपूर खा.
- रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्याच्या दोन तास आधी व्हायला पाहिजे. काय खाऊ नये?
- प्रोटिनयुक्त पदार्थ जास्त खाऊ नका.
- रिफाईन कार्बोहायड्रेट म्हणजे तांदूळ, मैदा, साखर यासारखे पदार्थ आणि फॅट असलेले पदार्थ कमीत कमी खा.
- लोणची आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका.
- थंड आणि आंबट पदार्थ खाऊ नका. आहारात याचा समावेश करा
- ओमेगा-3 फॅटी अॅसिड
हे साल्मन, टूना या माशांत आणि सुका मेवा, तसेच जवसात असते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड फुफ्फुसांसाठी जास्त लाभदायक आहे. हे श्वासनाचा त्रास आणि घरघर अशा लक्षणांपासून आराम देते.
फोलिक अॅसिड
- पालक, ब्रोकली, बीट, शतावरी, मसूर डाळ यात फोलेट असते. आपले शरीर फोलेटचे रूपांतर फोलिक अॅसिडमध्ये करते. फोलेट फुफ्फुसांतून कर्करोग निर्माण करणारे घटक हटवतो.
जीवनसत्व क
- संत्री, लिंबू, टोमॅटो, किवी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे आणि अननस यात जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असते. श्वास घेताना शरीराला ऑक्सिजन देण्यात आणि फुफ्फुसांतून विषारी पदार्थ बाहेर काढण्यात क जीवनसत्त्व मदत करते.
लसूण
- लसणात अॅलिसिन नावाचा घटक असतो. हा घटक फुफ्फुसांतून घातक घटकांना बाहेर काढतो. याशिवाय लसूण संसर्गाशी लढतो, फुफ्फुसांची सूज कमी करतो.
योगासने आणि घरगुती उपचार
अस्थमाच्या आजारातून पूर्णपणे बरे होता येत नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योगशास्त्र किंवा आयुर्वेदातही दम्यावर कोणताही कायमस्वरूपी उपचार नाही. तो नियंत्रित करता येतो. योगासनांच्या मदतीने तुम्ही तणावरहित जीवन जगू शकता. यामुळे प्रतिकारकशक्ती वाढायला मदत होते. योगासने प्रशिक्षित योगगुरूंच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखालीच करा. या आजारात त्रिकोणासन, कोणासन, ताडासन, भुजंगासन, धनुरासन, उष्ट्रासन, वक्रासन, अर्ध मत्स्येंद्रासन, पर्वतासन, गोमुखासन आणि शवासन लाभदायक होतात. याशिवाय कपालभाती, भ्रस्त्रिका, उज्जायी प्राणायाम ओमकारचे उच्चारण याचाही फायदा होतो. जलनेती, सूत्र नेलि, वमन, धौती, दंड धौती, वस्त्र धौती या क्रियांमुळे आराम मिळतो; पण हे सर्व तज्ज्ञांकडून शिकून घेऊनच करावे.
डॉ. संजय गायकवाड