Mon, Jun 17, 2019 10:18होमपेज › Aarogya › सामना आय हॅमरेजचा

सामना आय हॅमरेजचा

Published On: Oct 11 2018 1:25AM | Last Updated: Oct 11 2018 1:25AMडोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत आजही आपल्याकडे बरीच मोठी अनास्था दिसून येते. त्यामुळेच डोळ्यांच्या अनेक तक्रारींकडे किरकोळ दृष्टीने पाहिले जाते. त्याचबरोबर डोळ्यांच्या व्याधींबाबत आजही अनेकजण अनभिज्ञच असतात. आय हॅमरेजबाबतही अशीच स्थिती आहे. आय हॅमरेज प्रामुख्याने तीन प्रकारचे असते. पहिले सबकन्जेक्टिवा हॅमरेज, दुसरे हायफिमा आणि तिसरे रेटिनल हॅमरेज. या तिन्ही प्रकारांची माहिती, त्यांची लक्षणे, कारणे आणि उपचार पद्धती याविषयी... 

डॉ. मनोज कुंभार

भारतात दरवर्षी आय हॅमरेजमुळे 2 ते 5 टक्के व्यक्तींना अंधत्व येते. सामान्य शब्दांत सांगायचे झाले, तर आय हॅमरेजमुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होतो. अशा स्थितीत हे रक्त रेटिनासारख्या भागात जमा होऊन डोळ्यांच्या दृष्टीसाठी धोका निर्माण होऊ शकतो. उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, योग्यवेळी यावर उपचार केले तर दृष्टी वाचवता येऊ शकते. 

या आजारामध्ये बहुधा उच्च रक्तदाब असणार्‍या व्यक्तींना डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होतो. त्याचा परिणाम एका डोळ्यावर किंवा काही वेळा दोन्ही डोळ्यांवर होऊ शकतो. अशावेळी दृष्टी जाण्याची भीती रुग्णाला वाटू शकते. आय हॅमरेज प्रमुख्याने तीन प्रकारचे असते. पहिले सबकन्जेक्टिवा हॅमरेज, दुसरे हायफिमा आणि तिसरे रेटिनल हॅमरेज. 

सबकन्जेक्टिवा हॅमरेज ः आपल्या डोळ्याच्या पांढर्‍या भागावर एक अदृश्य पृष्ठभाग असणारी त्वचा असते. त्याला कन्जेक्टिवा असे म्हणतात. या पातळ त्वचेच्या खाली लहान रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे रक्तस्राव होऊन ते रक्त कन्जेक्टिवाच्या खाली जमा होत जाते. यामुळे डोळ्याच्या पांढर्‍या भागावर लाल रंगाचा डाग दिसू लागतो. याला वैद्यकीय भाषेत सबकन्जेक्टिवा हॅमरेज असे म्हणतात. 

कारणे ः सबकन्जेक्टिवाचे कारण पूर्णपणे स्पष्ट नसले, तरी रक्तवाहिन्यांद्वारे रक्तस्राव होण्याची अनेक कारणे असू शकतात. जोराने शिंक येणे, खोकणे, डोळे किंवा डोक्याच्या शस्त्रक्रियेनंतर ‘ब’ जीवनसत्त्वाची आणि ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता, तीव्र ताप येणे आदी कारणांमुळे तसेच डोळा जोरात चोळल्यामुळेदेखील रक्तस्राव होण्याची शक्यता असते. 

हायफिमा ः कॅार्निया आणि डोळ्याच्या भिंगांमध्ये असणार्‍या भागात ज्यावेळी रक्त जमा होते, तेव्हा त्याला हायफिमा असे म्हटले जाते. हायफिमा प्रामुख्याने डोळ्याला कुठल्याही प्रकारची जखम झाल्यास, डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर, अंतर्गत प्रणालीद्वारे एखादा रोग झाल्यामुळे किंवा डोळ्याच्या आत दाब पडल्यामुळे होतो. 
लक्षणे ः डोळ्यांच्या त्रासाच्या या प्रकारामध्ये प्रकाशात असल्यानंतर व्यक्तीच्या डोळ्यात टोचल्यासारखे वाटते, डोळ्यात वेदना आणि अस्पष्ट दिसणे आदी लक्षणे दिसतात. हायफिमा छोट्या प्रमाणात असेल, तर डोळ्यात रक्त दिसत नाही. हायफिमा तपासण्यासाठी डोळ्यांची पूर्ण तपासणी केली जाते. विशिष्ट प्रकारच्या मायक्रोस्कोपद्वारे स्लिप लेप टेस्ट केली जाते. 

उपचार ः हायफिमा कमी प्रमाणात असेल, तर तो एका आठवड्यात बरा होतो. अशा स्थितीत अ‍ॅस्प्रीनसारखी औषधे घेण्यास मज्जाव केला जातो. डोळ्यांच्या औषधामुळेदेखील यामध्ये लाभ होतो. त्याचसोबत डोळ्यांना जास्तीत जास्त आराम देण्याचा सल्लाही दिला जातो. 

रेटिनल हॅमरेज ः रेटिनल हॅमरेजची प्रमुख कारणे म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांवर जखम होणे किंवा रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होणे. यामुळे रक्त रेटिनावर जमा होणे सुरू होते. भारतात दरवर्षी दोन ते पाच टक्के लोक रेटिनल हॅमरेजमुळे दृष्टिहीन होतात. रक्तदाब आणि मधुमेह अशा स्थितीत नियमित तापासणी गरजेची असते. 
लक्षणे ः रेटिनल हॅमरेज झालेल्या व्यक्ती सामान्यपणे धुसर दिसत असल्याची तक्रार करतात. मधुमेहामुळे झालेल्या डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते आणि त्या फुटतात. हे रक्त रेटिनाच्या स्तरांमध्ये पसरते. रेटिनल हॅमरेज ही एक गंभीर समस्या असून, अशा स्थितीत त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेटिनल हॅमरेज तपासण्यासाठी ऑप्थॅल्मोस्कोपी केली जाते. रुग्णाच्या स्थितीच्या आधारानुसार अ‍ॅन्जिओग्राफी किंवा ओसिटी स्कॅनदेखील केले जाते. 

या आजारामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीदेखील फायद्याची ठरू शकते. यामध्ये आय हॅमरेजचे कारण शोधणे अधिक महत्त्वाचे असते. त्यानुसार अनुकूल असे औषध आणि खाण्या-पिण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदामध्ये नेत्रतर्पण नावाची एक विशेष प्रक्रिया असते. यामध्ये त्रिफळा, औषधयुक्त तूप, गुलाबपाणी अथवा दुधाची धार डोळ्यांवर विशिष्ट प्रकारे सोडली जाते. रुग्णाच्या स्थितीनुसार दहा ते पंधरा दिवस हा उपचार केला जातो. आय हॅमरेजच्या रुग्णांसाठी हा उपचार बराच फायदेशीर ठरू शकतो.