होमपेज › Aarogya › आव्हान मधुमेहाचे 

आव्हान मधुमेहाचे 

Published On: Jun 14 2018 1:38AM | Last Updated: Jun 13 2018 8:42PMडॉ. संजय गायकवाड

गेल्यावर्षी जागतिक लोकसंख्येपैकी 14 टक्के लोक स्थूलतेने ग्रस्त होते आणि 9 टक्के लोक मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकाराने ग्रस्त होते. जगभरात 22 टक्के लोक स्थूलपणाने ग्रस्त होतील आणि 12 टक्के लोक मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकाराने त्रस्त होतील.

जगभरात अनेक आजारांचा प्रकोप वाढत आहे. काही विषाणूजन्य आजार आहेतच; पण काही आजार मात्र जीवनशैलीमुळे झालेले आहेत. येत्या 27 वर्षांमध्ये जागतिक लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश म्हणजेच 25 टक्के लोक स्थूलपणाने ग्रस्त असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. याबाबतचा अहवाल ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्‍नामध्ये युरोपियन काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला. अहवालानुसार, आठपैकी एक व्यक्‍ती स्थूलतेमुळे मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकाराने ग्रस्त होऊ शकते. गेल्यावर्षी जागतिक लोकसंख्येपैकी 14 टक्के लोक स्थूलतेने ग्रस्त होते आणि 9 टक्के लोक मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकाराने ग्रस्त होते. जगभरात 22 टक्के लोक स्थूलपणाने ग्रस्त होतील आणि 12 टक्के लोक मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकाराने त्रस्त होतील. जागतिक पातळीवर मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकारातील रुग्णांच्या संख्येत वाढ होणे आरोग्यासाठी नक्‍कीच धोक्याचे आहे.

टाईप 2 मधुमेह ः टाईप 2 मधुमेह हा वाईट जीवनशैलीशी निगडित समस्या आहे. त्या व्यक्‍तीच्या रक्‍तात ग्लुकोजची पातळी सामान्य पातळीपेक्षा अधिक असते. शरीरात इन्सुलिन योग्य पातळीत तयार होत नसेल किंवा शरीरातील पेशी इन्सुलिननिर्मितीसाठी योग्य प्रतिक्रिया देत नसतील. उदा., तहान लागणे, जास्त भूक लागणे, तोंड कोरडे पडणे आणि वजन वाढणे किंवा कमी होणे ही मधुमेहाच्या दुसर्‍या प्रकारातील लक्षणे आहेत. 

मधुमेहामुळे हृदयरोग, लकवा, मूत्रपिंड निकामी होणे आणि द‍ृष्टी कमी होणे, यासारख्या समस्या होऊ शकतात. पूर्वी हा आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत होते. आता मात्र लहान वयातच मधुमेह जडताना पाहायला मिळतो. 

शहरानुसार विविध उपाय ः या अभ्यासासाठी नोवो नोर्डिस्क या फार्मास्युटिकल कंपनीने वित्तीय सहाय्य दिले आहे. नोवो डेन्मार्कमध्ये स्टेनो डायबेटिस सेंटर आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांच्याबरोबर मधुमेहाच्या उपचारासाठी औषधे निर्माण करते. नोवो नोर्डिस्कने या दोन संस्थांसमवेत 2014 मध्ये सिटी चेंजिंग डायबेटिस प्रोग्रामची सुरुवात केली होती. जेणेकरून, मधुमेहाशी दोन हात करता येतील. या योजनेची सुरुवात 8 शहरांमध्ये करण्यात आली आहे. कोपेनहेगन, रोम, ह्यूस्टन्स जोहान्सबर्ग, वैंकूवर, मेक्सिको सिटी, टियांजिन आणि शांघायमध्ये योजनेची सुरुवात झाली आहे. 

ब्रिटन आणि अमेरिकेत मधुमेह ः विविध देशांमध्ये स्थूलतेच्या संभावित रुग्णांची गणती संशोधकांनी केली आहे. अमेरिकेतील सद्यपरिस्थितील अंदाजानुसार, 2017 या वर्षात स्थूलतेची टक्केवारी 39 टक्क्यांपेक्षा वाढली असून, 2045 पर्यंत अमेरिकेत मधुमेहाचा दर स्थिर राहण्यासाठी  स्थूलतेचा आजचा दर 28 टक्के असला पाहिजे. ब्रिटनमध्ये 2045 स्थूलतेचा दर 32 टक्क्यांहून वाढून 48 टक्के होईल, तर मधुमेहाची पातळी 10.2 ने वाढून 12.6 होईल, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 28 टक्क्यांनी वाढ होईल. या देशातील मधुमेहाचा दर 10 टक्क्यांवर कायम ठेवायचा असेल, तर स्थूलता 32 टक्क्यांहून 24 टक्क्यांपर्यंत कमी केला पाहिजे.

आर्थिक परिस्थितीवर परिणाम ः यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगात या समस्येने ग्रस्त रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. मधुमेहाची समस्या ही केवळ रुग्णांसाठी त्रासदायक नसते, तर कौटुंबिक आर्थिक स्थितीवरही त्याचा परिणाम होतो. काही लोकांना इन्सुलिन घेण्यात आपली जमा पुंजी खर्च करावी लागते. कारण, इन्सुलिनची किंमत अधिक आहे. जगातील चार मोठ्या आव्हानात्मक रोगांपैकी मधुमेह हा एक महत्त्वाचा रोग मानला जातो. 

कोट्यवधी लोक मधुमेहाने प्रभावित ः या दशकाच्या सुरुवातीला मधुमेहाचे आव्हान पेलण्यासाठी जगभरातील नेत्यांनी कंबर कसली आहे. सातत्यपूर्ण विकासासाठी 2030 या वर्षापर्यंतचा अजेंड्याचा भाग म्हणून हे एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आहे. ज्यामध्ये मुदतपूर्व प्रसूतीमध्ये होणारे मृत्यू कमी करणे याव्यतिरिक्‍त मधुमेहाच्या समस्येत एक तृतीयांश घट आणणे आणि त्यासाठी गरजेची औषधे उपलब्ध करून देणे. जागतिक पातळीवर 2014 या वर्षामध्ये 42.2 कोटी वयस्कर लोक मधुमेहाने ग्रस्त होते. 1980 मध्ये हा आकडा 10.8 कोटी होता. 

गेल्या 34 वर्षांमध्येे जगभरात मधुमेहाच्या आकडेवारीत झालेला बदल टक्केवारीत 
देश    1980    2014
आफ्रिका    3.1    7.1
अमेरिका    5    8.3
पूर्व भू मध्य    5.9    13.7
युरोप    5.3    7.3
द. पूर्व आशिया     4.1    8.6
पश्‍चिम प्रशांत     4.4     8.4

* 1980 सालच्या तुलनेत मधुमेहाचा जागतिक प्रसार 4.7 टक्क्यांहून वाढून तो 8.5 टक्के झाला. गेल्या दशकभरात अल्प आणि मध्यम उत्पन्‍न असणार्‍या देशांच्या तुलनेत मधुमेहाचे रुग्ण अधिक होते. 
* 2012 मध्ये मधुमेहामुळे जगभरात 15 लाख मृत्यू झाले. 
* जागतिक आरोग्य संघटनांनुसार कमी आणि मध्यम वेतन असलेल्या देशांतील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण अधिक आहे. 
* मधुमेहाची सम्यस्या स्थूलतेशी निगडित आहे. त्यासाठी 2025 पर्यंत स्थूलतेच्या समस्येवर लगाम लावण्यासाठी जगभरात अनेक प्रकारचे आरोग्य कार्यक्रम चालवले जात आहेत. 
* 2014 या वर्षात आकडेवारीनुसार जगात 18 वर्षांपेक्षा जास्त वयोमानाच्या तीन व्यक्‍तींपैकी एक व्यक्‍ती अतिवजन असलेली, तर 10 पैकी 1 स्थूलतेने ग्रस्त आहे.