Sun, Feb 24, 2019 02:09होमपेज › Aarogya › ६ महिन्यांतून एकदा हवी जंत प्रतिबंधक गोळी

६ महिन्यांतून एकदा हवी जंत प्रतिबंधक गोळी

Published On: Feb 10 2018 11:43AM | Last Updated: Feb 10 2018 11:43AM10 फेब्रुवारी हा राष्ट्रीय जंत दिवस. तो 2015 पासून साजरा केला जातो. यंदाच्या जंत दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी देशातील 1 ते 19 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना जंताची गोळी मोफत दिली जाणार
आहे. त्यामध्ये सर्व शासकीय/ सरकारी मदत मिळणार्‍या शाळा आणि अंगणवाड्यांचा समावेश आहे. सरकारी आरोग्य खाते व खासगी छॠज मार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा या मोहिमेच्या पहिल्याच फेरीत देशभरातील 14 कोटी बालकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामध्ये आसाम, बिहार, छत्‍तीसगढ, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, त्रिपुरा, दादरा व नगर हवेली या राज्यांतील मुलांचा समावेश आहे.

जंतांमुळे होणारा उपद्रव
पोट दुखणे, वाढ नीट न होणे, अंगातील रक्‍त कमी होणे, अशक्‍तपणा वाटणे, गुदव्दाराजवळ प्रचंड खाज येणे, भूक मंदावणे इत्यादी सामान्य लक्षणे जंताच्या प्रादुर्भावात दिसतात. परंतु जंताचा आजार बळावला तर आतड्याला सूज येणे, आतड्यात भोक पडणे, आतड्याचा मार्ग बंद होणे, खोकला लवकर बरा न होणे, अंगातील रक्‍त कमी होणे, आतडी येणे, मेंदूला सूज येणे इत्यादी उपद्रव उद्भवू शकतात.

जंतावर विविध औषधे

पूर्वी Antipar हे एकच औषध जास्त वापरात होते. आता स्वस्त, कमी अपायकारक व जास्त परिणामकारक अशी मेबंडाझोल व अलबेंडाझोल सारखी नवीन ओषधे मिळतात. अलबेंडाझोल या औषधामुळे गोलकृमी जिवंत बाहेर न येता जंताचे विघटन होवून ते कुठलाही त्रास न होता नकळत बाहेर फेकले जातात. हे औषध सूक्ष्म कृमी, हूक कृमी, ट्रायचुरीस इत्यादी जंतांवरदेखील परिणामकारक आहे.
जनेरिक नावाने उपलब्ध असणारे अलबेंडाझोल हे 3 ते 4 रुपये प्रति गोळी या भावाने उपलब्ध आहे. तर, Zentel Bendex या ब्रँन्डेड गोळ्या 10 ते 15 रुपयांत उपलब्ध आहेत.

जंत गोळी केव्हा घ्यावी?

जंताच्या लाईफ सायकलचा विचार केल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सहा महिन्यातून एक आलबेंडाझोलची गोळी घ्यावी. ही गोळी चावूनदेखील खाता येते. 2 वर्षांवरील मुलांना अर्धी गोळी दिली जाते. सहा महिन्याच्याआधी गोळी परत घेतल्यास कोणताही अपाय नाही.

जंत गोळीबाबत काही
1) सहा महिन्यांतून एकदाच एक गोळी द्यावी. स्वस्त आहे व सहज उपलब्ध आहे म्हणून जास्त गोळ्या घेऊ नयेत.
2) या गोळीचे सहसा साईडइफेक्ट होत नाहीत. पण उलट्या, मळमळणे, ड ोकेदुखी इत्यादी लक्षणे आढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्‍ला घ्यावा.
3) जंत गोळी दिलेल्या मुलांची तारखेवार व्यवस्थित नोंदणी असावी. 6 महिन्यांनी दुसरा प्रतिबंधक डोस योग्य वेळी घ्यावा.

मुलांमधील वाईट सवयी
जेवतांना हात न धुणे, धुळीत, मैदानात अनवाणी खेळणे, फळे स्वच्छ न धुता खाणे, बाहेरचे व माशा बसणारे पदार्थ खाणे, उघड्यावर विष्टा करणे आदी वाईट सवयी शालेय वयातील मुलां मध्ये जंतास कारणीभूत ठरतात. नखे वाढविल्यास त्यात धूळ जमा होवून जंत होण्याची शक्यताही असते.

डॉ. मिलिंद शेजवळ