Sun, Jun 07, 2020 01:59होमपेज › Aarogya › समस्या वजन वाढीची

समस्या वजन वाढीची

Published On: May 16 2019 2:00AM | Last Updated: May 16 2019 2:00AM
डॉ. सौ. सपना गांधी

आपली शरीरयष्टी प्रमाणबद्ध, सुडौल व सुंदर असावी, असे प्रत्येकालाच वाटते व त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. शरीराचे वजन उंचीच्या प्रमाणातच असावे. नाहीतर, दिसायला बोजड तर दिसतेच; शिवाय जडपणा येऊन निरनिराळ्या आजारांना आमंत्रणही देत असते.

हल्लीच्या फास्टफूडच्या जमान्यात सर्वांचेच स्वास्थ्याचे प्रश्‍न गंभीर बनत चालले आहेत. त्यात जाडी हे तरी कसे सुटेल.फास्टफूड, तळलेले पदार्थ इत्यादीमध्ये भरपूर कॉर्बोहायड्रेट्स असतात, की ज्यामुळे चरबी साठायला मदत होते. या नवीन पिढीला यंत्रयुगच म्हणायला पाहिजे. सर्व काही बटण दाबले की, चुटकीसरशी कामे होतात. जरासुद्धा इकडचे तिकडे हलायला नको, की वाकायला नको. सोप्यावर, गादीवर व चेअरवर बसल्या बसल्या कामे होतात. एका हातात बटण, तर दुसर्‍या हातात मोबाईल; मग शरीराला नमते करायला वावच नाही व वेळही नाही.

खाण्यापिण्याच्या सवयी काही जणांना भरपूर असतात. उगीचच येता-जाता हे तोंडात घाल, ते तोंडात घाल, नुकतेच खाऊन झाले तरी परत खा. कारण, आवडीचा पदार्थ आहे किंवा कोणाच्या आग्रहाखातर तरी खावे लागते. खेळकर वयात थोड्याफार हालचाली होऊन ते सहज पचले जाते. जिरवले जाते; पण वय वर्षे 30 ते 45 च्या लोकांमध्ये खाणे अती, वर सांगितल्याप्रमाणे बसणे एवढेच काम राहते. खाल्लेले योग्य रीतीने जिरले जात नाही व Fat deposition सुरू होते; मात्र आपोआपच जाडी वाढलेली, पोट, कंबर घेर वाढलेला दिसतो. अंगात चपळता राहत नाही.

मग Dieting करणे चालू होते. मग 1 वेळ जेवण व तेही अर्धवटच करणे, आठवड्यातून 3/4 वेळा उपवास करणे सुरू होते; पण यातून बर्‍याच लोकांना अशक्तपणा येतो, चक्कर येणे, पित्त इ. तक्रारी सुरू होतात. हॉस्पिटलभरती करण्यापर्यंत वेळ येते. मग सलाईनच्या बाटल्या लावणे, रक्ताच्या बाटल्या लावणे व घरच्यांची, नातेवाईकांची धावपळ करणे हे आलेच.

हे सर्व टाळून आपले शरीर सुडौल व प्रमाणबद्ध करायचे असेल तर योग्य आहार-विहार व व्यायाम, योगासने ही केलीच पाहिजेत. शिवाय, या व्यतिरिक्त आनुवंशिकता, हार्मोनल बदल होऊनही तब्येत वाढते. म्हणजेच, मनावर इफेक्ट होऊन त्याचा शरीरावरही परिणाम दिसतो. बर्‍याच जणींमध्ये पाळीची अनियमितता, बाळांतपणानंतर वात्या राहणे, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यासही चरबी साठते व जाडी वाढल्याची दिसून येते. हार्मोनल पातळीमध्ये बदल हे मानसिक पातळीवरील बदलामुळे होऊ शकतात. तर या प्रकारांमध्येही होमीओपॅथीची उपचार केल्याने हार्मोन व्यवस्थित बॅलन्समध्ये येऊन त्याच्या तक्रारी तर कमी होतातच; पण जाडीवरही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. चरबी जी नको आहे, अती आहे, ती वितळण्यास मदत होते.

काही होमिओपॅथिक औषधे आहेत, ती त्या विशेष तज्ज्ञांकडूनच घ्यावीत. कारण, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ती औषधे बदलत असतात. प्रत्येकाला एकच औषध लागू पडेल, असे नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म, शारीरिक तक्रारींचे स्वरूप, खाण्यापिण्यातील आवडीनिवडी, झोप-स्वप्न, थंड-उष्ण प्रकृती, आनुवंशिकता व मानसिक स्थिती, स्वास्थ्य कशा पद्धतीचे आहे, यावर त्या औषधाची योग्य मात्रेमध्ये निवड केली जाते व योग्य कालावधीमध्ये दिले जाते.

ग्राफाईटिस : हे औषध रजोनिवृत्ती कालावधीमध्ये वापरले जाते. ज्या महिलांमध्ये पाळीची अनियमितता आहे, पाळीतील कंबर/पोट दुखावा आहे. अशा वेळी हे औषध चांगले उपयोगी पडते. पाळी लांबण्याचे कारण मानसिक अशांतता व त्याचमुळे हार्मोनल चेंजेस होतात व स्थूलपणाकडे झुकले जाते. ग्राफायटिस प्रकारातील स्त्रिया जाड असून त्यांना कातडीचेही आजार उद्भवतात. यात थंड प्रकारची प्रकृती असते.

कलकेरिया कार्ब : हे औषध थंड प्रकृतीची मुले व व्यक्तींसाठी उपयोगी आहे. कलकेरिया कार्बची मुले स्थूल होण्याचे कारण म्हणजे खाण्यापिण्यातील अनियमितता व हार्मोनल (पिच्युटरी व थायरॉईड)  ग्रंथीतील बिघाड. लहान मुले त्यांच्या वयाच्या तुलनेत स्थूल असतात. कॅल्शियमचे चयापचय व रक्तात शोषण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सर्व्हायकल व मेसेन्ट्रिक ग्लँडच्या पोषणावरही परिणाम होतो. त्यामुळे रक्तातील लोह हे कमी होते व अ‍ॅनिमिया होतो. थोड्या स्वरूपात आळशी असतात. मुले धम्म एका जागी तासन्तास बसून असतात. त्यांना बैठे खेळच जास्त आवडतात. महिलांमध्ये वजन पटकन वाढण्याची टेंडन्सी असते. अशा वेळी हे औषध खूप प्रभावी ठरेल.

फायटोलॅका बेरी : वजन कमी करून आटोक्यात आणण्यासाठी हे औषध जालीम आहे. या औषधाचे काम ग्लँड्सवर आहे. विशेष करून, स्तनावर त्याचे कार्य चांगले होते. स्तन घट्ट, टणक व दुखावा असणारे होतात. स्तनपान करणार्‍या मातांमध्ये स्तनातील पसही होतो. त्यावर हे औषध फार उपयोगी पडते. मनावर टेन्शन येऊन डिप्रेशनमध्ये रुग्ण जातो व वजन वाढीस करणीभूत ठरतात.

लॅक-डी-फ्लोरॅटम : जाडी, चरबी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खाण्यावरचा ताबा, संयम नसणे. अशा वेळी जर चरबी वितळवायची झाल्यास हे औषध वापरावे.

कॅपसिकम : या प्रकारातील व्यक्ती अतिशय आळशी असतात. घरातून लवकर बाहेर पडत नाहीत (आवडतच नाही). जरी भरपूर जाडी वाढली तरी व्यायाम करायला मनाची तयारी नसते व आवडही नसते. जरी कुठे बाहेर गेलेले असतील, तर कधी एकदा घरी येतो असे होते. पोटाच्या तक्रारी असतात.
वरील औषधे होमीओपॅथिकतज्ज्ञांच्या सल्ल्यांनीच घ्यावीत.