Mon, Jan 20, 2020 09:21होमपेज › Aarogya › ‘ड’ जीवनसत्त्व आणि आरोग्य

‘ड’ जीवनसत्त्व आणि आरोग्य

Published On: Sep 05 2019 1:44AM | Last Updated: Sep 04 2019 10:12PM
डॉ. महेश बरामदे

शरीर निरोगी राहण्यासाठी अनेक घटकांची आवश्यकता भासते, त्यात जीवनसत्त्वे महत्त्वाची असतात. एखाद्या जीवनसत्त्वाची कमतरता भासत असेल, तर शरीर त्याची लक्षणे दाखवते. शरीरातील हाडांसाठी आणि प्रतिकार क्षमतेसाठी महत्त्वाचे असणारे एक जीवनसत्त्व म्हणजे डी जीवनसत्त्व. डी जीवनसत्त्वाची कमतरता असेल तेव्हा शरीर त्या विषयीची लक्षणे दाखवते. ही लक्षणे कोणती आहेत, ते समजून घेतले पाहिजे.

चरबीमध्ये विरघळणारे डी जीवनसत्त्व हाडांमधली कॅल्शियमची पातळी वाढवतेच; शिवाय प्रतिकार क्षमताही वाढवते. त्यामुळेच डी जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास शरीर काही लक्षणे दर्शवते. डी जीवनसत्त्व आपल्याला जेवणातून, पूरक आहारातून आणि मुख्य म्हणजे सूर्यप्रकाशातून मिळते; मात्र या प्रक्रियेत काही अडचणी आल्या, तर शरीराला डी जीवनसत्त्वाची कमतरता भासते आणि सर्वच शरीराची व्यवस्थेत गडबड होते. 

डी जीवनसत्त्वाची कमतरता भासल्यास काही लक्षणे शरीर जरूर दाखवत असते. शरीराच्या तुलनेत डी जीवनसत्त्वाची कमतरता भासल्यास इतर सर्व शरीराच्या तुलनेत डोक्यातून खूप जास्त घाम येऊ लागतो. प्रौढांमध्ये दिसणारा हा अजब संकेत आहे. डोक्यातून खूप जास्त घाम येत असेल, तर शरीराला डी जीवनसत्त्वाची कमतरता भासते आहे, असे समजू शकतो. अर्थात, थेट स्वतःच औषधे घ्यायला सुरुवात न करता डॉक्टरांशी सल्ला जरूर घ्यावा. 
डी जीवनसत्त्वाची कमतरता असेल, तर शरीरात पुढील लक्षणे दिसतात. 

हाडांमध्ये वेदना ः डी जीवनसत्त्व हाडांना कॅल्शियम पुरवण्याचे काम करते. शरीरात डी जीवनसत्त्वाची कमतरता असेल, तर हाडांना कॅल्शियमचे योग्य प्रमाण मिळत नाही. त्यामुळे हाडांमध्ये वेदनांची समस्या निर्माण होते. डी जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास विविध मस्कुलोस्केलेटल किंवा स्नायूंशी निगडित वेदनाही भेडसावतात. हाडांच्या वेदना, हाड मोडणे, आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी डी जीवनसत्त्वाचे योग्य प्रमाण शरीरात असणे आवश्यक असते. डी जीवनसत्त्वाचा मुख्य स्रोत आहे सूर्यप्रकाश आणि काही खाद्यपदार्थ. 

स्नायूंच्या वेदना ः डी जीवनसत्त्वामुळे हाडांबरोबर स्नायूंवरही प्रभाव पडतो. जीवनसत्त्वाची कमतरता असेल, तर शारीरिक हालचाली करताना स्नायूंमध्ये वेदना होतात. जसे व्यायाम करणे, क्रीडा प्रकार तसेच मेहनतीची कामे करताना स्नायूंमध्ये वेदना होतात. तसेच अशक्तपणाही जाणवतो. डी जीवनसत्त्वाची पातळी कमी असेल, तर शरीराला खूप वेदना होतात. हे फायब्रोमायल्जियाचे मुख्य लक्षण आहे. 

रोगप्रतिकारक्षमता कमी ः डी जीवनसत्त्व हे प्रतिकार क्षमतेसाठी अत्यावश्यक असते. प्रतिजैविकांचा शोध लावण्यापूर्वी संसर्गावर उपचार करण्यासाठी जीवनसत्त्वांचा वापर डॉक्टरांनी करायला सुरुवात केली होती. क्षयरोगाच्या रोग्यांना रुग्णालायात पाठवले जाई, जिथे या रुग्णांना सूर्यप्रकाशात बसवले जात असे. त्यामुळे संसर्ग कमी होत असे. त्यामुळे ज्या व्यक्तींना सतत विषाणूजन्य संसर्ग होत असेल, त्यांच्यामध्ये डी जीवनसत्त्वाची कमतरता भेडसावत असते. त्याचेच हे लक्षण आहे. 

थकवा आणि सुस्ती ः व्यग्र जीवनशैलीमुळे म्हणा किंवा अपुर्‍या झोपेमुळे थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. संशोधनातून डी जीवनसत्त्व आणि थकवा, सुस्तपणा यांचा थेट संबंध स्पष्ट झाला आहे. थकवा आणि डी जीवनसत्त्वाच्या पूरक आहाराचा होणारा प्रभाव याविषयी अभ्यास केला गेला, तेव्हा डी जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य असेल तर थकव्याची लक्षणे कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

केस गळणे ः डी जीवनसत्त्वाची कमतरता ही केस गळण्यास कारणीभूत ठरते. डी जीवनसत्त्व कमी असल्यास केस उगवण्याची प्रक्रिया मंदावतेच; परंतु केस तुटण्यावरही त्याचा प्रभाव पडतो. त्याशिवाय, केस पातळ होणे, केस गळणे आदी त्रासही डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जाणवतात. डी जीवनसत्त्व हे केसासाठी आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. डी जीवनसत्त्वाची कमतरता असेल, तर काही पूरक आहार, औषधोपचाराने ही कमतरता भरून काढता येते. त्याचा काही त्रासही होत नाही. 

शरीरात एखाद्या घटकाची कमतरता असल्यास शरीर त्याची लक्षणे जरूर दर्शवत असते. त्यासाठी शरीराची भाषा कळून घेतली पाहिजे. त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर वेळीच योग्य उपचार केले पाहिजेत. जेणेकरून शरीर निरोगी आणि सुदृढ राहाण्यास मदत होते.