Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Aarogya › फ्रोजन शोल्डरने त्रस्त आहात?

फ्रोजन शोल्डरने त्रस्त आहात?

Published On: Nov 09 2017 1:51AM | Last Updated: Nov 08 2017 10:16PM

बुकमार्क करा

डॉ. महेश बरामदे

आधुनिक धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही बाब नवी नाही. व्यायामाच्या अभावामुळे पाठ, कंबर, मान आणि खांदे यांच्यामध्ये वेदना सुरू होतात. त्यापैकीच एक गंभीर समस्या म्हणजे फ्रोजन शोल्डर. फ्रोजन शोल्डर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉम्प्युटरवर सातत्याने केले जाणारे काम आणि व्यायामाचा अभाव. संपूर्ण दिवस एकाच स्थितीत बसून काम केल्याने सांधे आखडतात.

फ्रोजन शोल्डरमध्ये खांद्याच्या सांध्यांची हालचाल करणे अशक्य होऊन जाते. वैद्यकीय भाषेत या वेदनेला अडेस्विह कॅप्सुलायटिस असे म्हटले जाते. प्रत्येक सांध्याच्या बाहेर एक कॅप्सुल असतो. फ्रोजन शोल्डरमध्ये हाच कॅप्सुल कठीण होतो. मग हळूहळू, पण अचानक वेदना सुरू होतात आणि संपूर्ण खांदा आखडतो. आपल्यापैकी कोणालाही फ्रोजन शोल्डरचा त्रास असेल तर काही नैसर्गिक उपाय यावर उपयोगी पडू शकतात.

योगाभ्यास : फ्रोजन शोल्डरच्या वेदना आणि आखडणे यापासून सुटका मिळण्यासाठी योग हा उत्तम व्यायाम आहे. त्यातील पर्वतासन हे सर्वात उपयुक्त आसन आहे. त्यामुळे खांद्याचे आखडणे दूर करण्याबरोबरच मणक्याच्या सर्व सांध्यांतील ताण कमी होतो. अर्थात, फ्रोजन शोल्डरच्या रुग्णांनी हे आसन करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. कारण, निष्काळजीपणामुळे जोखीम वाढू शकते.

योग्य, पोषक आहार : मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्यास फ्रोजन शोल्डरची समस्या वाढू शकते. त्यामुळे ताजा शिजवलेला प्रक्रियामुक्त आहार घ्यावा. खांद्याची सूज कमी होण्यासाठी आहारात गरम सूप, भाज्या, मसाले तसेच औषधी वनस्पतींचा समावेश करावा. सोडियम आणि फॅटचे प्रमाण अधिक असलेला आहार टाळावा. त्याशिवाय तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ आहारातून टाळावेच. खांद्यातील नैसर्गिक वंगण वाढवण्यासाटी आहारात स्वास्थ्यवर्धक तेलांचा समावेश करावा. 

तेलाने मालिश : फ्रोजन शोल्डरमध्ये खांदेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी खांद्यांची हालचाल योग्य प्रकारे व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यासाठी तेलाने मसाज करणे हा उत्तम उपाय आहे. तेलामुळे नैसर्गिक रीतीने वेदना कमी होण्यास मदत मिळते. फ्रोजन शोल्डरच्या वेदना कमी करण्यासाठी एका पॅनमध्ये मोहरीचे तेल टाकून, त्यात एक-दोन लसूण पाकळ्या टाकून, तेल गरम करावे. लसूण तपकिरी झाल्यावर गॅस बंद करावा. तेल कोमट झाले की खांद्याला मालिश करावी. 

अ‍ॅक्युपंक्चर आणि फिजिओथेरेपी : फ्रोजन शोल्डरच्या वेदनांपासून लवकर आराम मिळवण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सेचा वापर करता येऊ शकतो. फिजिओथेरेपी हा फ्रोजन शोल्डरसाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो. फिजिओथेरेपीमध्ये खांद्यांमधील तन्यता पुन्हा उत्पन्न केली जाते आणि खांदे पुन्हा गतिमान हालचाल करू शकतात. असे केल्याने खांद्याच्या विविध बिंदूंना व्यायाम मिळतो आणि ते हळूहळू सामान्य परिस्थितीत येण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

हीट आणि कोल्ड थेरेपी : वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हीट किंवा कोल्डपैकी कोणती थेरेपी फायदेशीर ठरते ते पाहून निवड करावी. फ्रोजन शोल्डरच्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाने खांद्यावर 15 मिनिटांसाठी शेकावे. आणि गरम शेक घ्यायचा असल्यास गरम हीटिंग पॅडने एका वेळी पंधरा मिनिटे, असे शेकावे. दिवसभरात तीन-चार वेळा शेकावे.