होमपेज › Aarogya › कडधान्य आणि आरोग्य

कडधान्य आणि आरोग्य

Published On: Jun 14 2018 1:38AM | Last Updated: Jun 13 2018 8:37PMडाळींमध्ये उडीदडाळ व हरभराडाळ या वजन वाढवणार्‍या घटकांमध्ये मोडतात. वजन वाढवण्यासाठी हे पदार्थ फायदेशीर आहेत. उडीदला आयुर्वेदाने मांसवर्धक म्हटले आहे. उडदापासून केलेले निरनिराळे साऊथ इंडियन पदार्थ हे चविष्ट तर आहेतच, शिवाय पौष्टिकदेखील आहेत. वजनवाढीसाठी इडली किंवा साधा डोसा न घेता उत्तप्पा, मसाला डोसा, मेदुवडा हे पदार्थ खावेत. 2 इडल्यांमध्ये निव्वळ 102 उष्मांक व 0.2 ग्रॅम फॅटस् असतात, तर 2 मेदुवड्यात 276, एका उत्तपात 337 व एका मसाला डोशात 359 उष्मांक असतात. हरभराडाळदेखील वजनवाढीसाठी योग्य आहे. यात इतर डाळींपेक्षा चरबीचे प्रमाण थोडे जास्त आहे. ही डाळ मधुमेहींसाठी उपयुक्‍त आहे. बारीक मधुमेहींनी हरभराडाळीच्या पिठापासून केलेले पिठले, घावण, सांडगे इत्यादी पदार्थ नियमितपणे खावेत. उडीद व हरभराडाळ या दोन्ही डाळी पचण्यासाठी  शारीरिक हालचाल हवी, हे मात्र लक्षात ठेवा. 

कडधान्यांमध्ये हरभरा, वाटाणा, छोले व सोयाबीन हे वजनवाढीस मदत करतात. कडधान्ये हे नेहमी मोड आणूनच वापरावीत. उसळ करताना वाटणासाठी सुक्या खोबर्‍याचा वापर करावा. ज्यायोगे उष्मांकामध्ये वाढ होते. शाकाहारी व्यक्‍तींना डाळी, कडधान्ये हे मांसाहाराला उत्तम पर्याय आहेत. सोयाबीनमधील प्रोटिन्सचे प्रमाण मांसाहारी पदार्थांइतकेच आहे. म्हणून त्याला शाकाहारी मांस असे म्हणतात. 5 किलो गव्हाच्या पिठात अर्धा किलो सोयाबीन घालावे. यामुळे चपाती पौष्टिक होते. बारीक व वयात येणार्‍या मुलींसाठी सोयाबीन फायदेशीर ठरते.   

- मेघना ठक्‍कर