Sun, Dec 08, 2019 06:34होमपेज › Aarogya › पावसाळा आणि लहानग्यांचे आरोग्य

पावसाळा आणि लहानग्यांचे आरोग्य

Published On: Aug 01 2019 1:22AM | Last Updated: Aug 01 2019 1:22AM
डॉ. मनोज कुंभार

उन्हाळ्याच्या काहिलीनंतर येणारा पावसाळा आल्हाददायक असला, तरीही काही प्रमाणात तो आजारांना आमंत्रण देणारा असतो. सध्याच्या बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत तर अनेक आजार पावसाळ्यात डोके वर काढतात. त्या सर्वांचा अधिक धोका असतो तो बाळांना. लहान बाळे, मुले पावसाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात लहानग्यांची नुसती काळजी घेऊन उपयोग नाही, तर आजारांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्षच द्यावे लागते.

पावसाळ्यात लहान बाळे, मुले लवकर आणि जास्त वेळा आजारी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात बाळांकडे अधिक लक्ष द्यावे लागते. अतिउन्हानंतर येणार्‍या पावसामध्ये तापमान कमी-जास्त होत राहते आणि वातावरणातच ओलसरपणा किंवा दमटपणा असतो. त्यामुळे लहान बाळांमध्ये ताप, सर्दी, खोकला, कफ होणे, जीवाणूजन्य संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग, खाज येणे, पुरळ येणे, हे सर्व त्रास वाढतात. पावसाळ्यात लहानग्यांची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. पावसामुळे वातावरणच ओलसर झालेले असते. त्यात तापमानात होणारे चढ-उतार बाळ सहन करू शकतेच, असे नाही. म्हणून बाळांना काही ना काही त्रास होत असतो.

बाळाचे अंग कोरडे ठेवा ः पावसाळ्यात कितीही काळजी घेतली, तरी जीवाणू, विषाणू यांचे प्रमाण वाढत असते. या काळात हे सर्व अधिक कृतिशील होतात किंवा अ‍ॅक्टिव्ह होतात. त्यामुळे त्यांना काही कारण मिळाले, की ते संसर्ग पसरवण्याचे काम सुरू करतात. म्हणूनच, बाळांचे अंग कायम कोरडे राहील याकडे लक्ष द्यावे. पावसाळ्यात भिजणे सर्वांना आवडत असले, तरी बाळाला पावसात भिजू देऊ नका. तसेच घरीही शक्य तितके कोरडे ठेवावे. गाद्या, उशा, पांघरूणे ओली होऊ नयेत, याची काळजी घ्यावी. थोड्या थोड्या वेळाने बाळाचे लंगोट किंवा नॅपी तपासावी. बाळाने शू केल्यानंतर जीवाणू लगेचच अ‍ॅक्टिव्ह होतात. बाळाच्या नाजूक त्वचेवर पुरळ येण्यास सुरुवात होते. काही वेळा लंगोट ओला झाल्याने बाळांना सर्दी, तापदेखील येऊ शकतो. मूल थोडे मोठे असेल, तर त्याला पावसात भिजायचे असते; पण मुलांना फार पाण्यात खेळणे, कपडे ओले करणे, डोके-पाय ओले करण्यापासून अटकाव करावा. या हवेत शक्यतो मुलाचे अंग कोरडे कसे राहील याकडे लक्ष द्यावे. 

डासांपासून सुरक्षा ः पावसाळ्यात पाऊस पडला असो किंवा नसो जशी संध्याकाळ होते तसे डास चावायला सुरुवात होते. बाळांचा डासांपासून बचाव करण्यासाठी दुपार सरत आली, की घराचे खिडकी-दरवाजे बंद करून टाकावे, जेणेकरून डास घरात येण्यास अटकाव होईल. तसेच घरात किंवा आसपासही पाणी साठू देऊ नये. घराच्या आसपास डास असतील, तर झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. लहान मुलांच्या खोलीत डासांची अगरबत्ती किंवा गुडनाईटसारखी उपकरणे वापरू नयेत. कारण, त्याच्या धुराची आणि वासाची मुलांना अ‍ॅलर्जी होऊ शकते. मुलांच्या श्वसनसंस्थेसाठी हा धूर त्रासदायक ठरू शकतो. या उत्पादनांचा वापर करण्याची वेळ आली, तर मुलांना शक्य तितके दूर ठेवावे. हा धूर थेट बाळाच्या नाकात किंवा तोंडात जाणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी. 

बाळाच्या आसपासची स्वच्छता ः बाळांना संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांचे अंग कोरडे ठेवण्याबरोबरच आसपास स्वच्छता ठेवण्याचीही गरज असते. पावसाळा हा ऋतू जीवाणूंच्या वाढीचा काळ असल्याने थोडासा ओलसरपणा मिळाला, तरी जीवाणूंची वाढ वेगाने होते. म्हणून, जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी घराची स्वच्छताही खूप आवश्यक आहे. बाळाच्या खोलीतील दिवसातून 2-3 वेळा फरशी पुसावी. जेणेकरून पावसाळी चिलटं, माश्या, डास इतर कीटक खोलीत येणार नाहीत. तसेच कचर्‍याचे डबे, कूलर, स्वयंपाकघरातील सिंक, गॅस या गोष्टींचीही स्वच्छता करावी. त्याव्यतिरिक्त उरलेले शिळे अन्न घरात साठवू नये, ते घराबाहेर टाकून द्यावे किंवा प्राण्यांना खायला घालावे. घरात तसेच घराच्या आसपास पाणी साठू देऊ नये. कारण, स्वच्छ पाण्यातच डेंगू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचे डास निर्माण होतात. 

वरील सर्व गोष्टींची काळजी घ्यावीच; परंतु बाळाला सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास वैद्यकीय सल्लाही जरूर घ्यावा. जेणेकरून बाळाला आवश्यक तो औषधोपचार करता येतो. पावसाळा हा ऋतू नवनिर्मितीचा असला, तरी बाळांच्या काळजीपोटी पालकांना थोडा काळजी करायला लावणाराही असतो. पावसाळ्यात बाळ खूश असेल, तर पालकही निर्धास्त असतात. वरील गोष्टींची काळजी घेतल्यास बाळाला संसर्गापासूनही दूर ठेवणे शक्य होईल.