Sun, Aug 18, 2019 06:50होमपेज › Aarogya › अतितणाव हृदयाला मारक

अतितणाव हृदयाला मारक

Published On: Feb 07 2019 1:24AM | Last Updated: Feb 07 2019 1:24AM
डॉ. महेश बरामदे

एकदा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यापुढील 10 वर्षांत पुन्हा दुसर्‍यांदा झटका येण्याची शक्यता 90-95 टक्के असते. मात्र, ही शक्यता कमी करणे व्यक्तीला शक्य असते. अर्थात, त्यासाठी जीवनशैलीतील बदल करणे अपरिहार्य असतेच; पण ते बदल सातत्याने टिकवून ठेवणेही गरजेचे असते. बहुतांश व्यक्ती पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर नैराश्याच्या गर्तेत जातात; मात्र या स्थितीपासून बचाव करणे आवश्यक असते. कारण, याच स्थितीमुळे दुसर्‍यांदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त पटीने वाढतो. त्यामुळे चिंताग्रस्त होण्यापेक्षा दुसर्‍यांदा झटका येण्यापासून बचाव करणे हाच उपाय आहे. 

हृदयविकाराचा झटका येण्याचे वय कमी झाले आहेच; मात्र हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांपैकी 20 टक्के लोकांना एका वर्षाच्या आतच दुसर्‍यांदा ‘हार्ट अ‍ॅटॅक’ येतो. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य मासिक ‘नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या एका माहितीपर लेखानुसार हृदयविकाराच्या पहिल्या झटक्यानंतर व्यक्तीवर तणाव वाढतो. त्यामुळे सूज वाढवणार्‍या पेशींची निर्मिती वाढते. त्यामुळे अ‍ॅथरोक्लेरोटिक प्लॉक अस्थिर किंवा डिस्टेबलाईज होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अ‍ॅथेरोक्लेरोटिक प्लॉक म्हणजे धमन्यांमध्ये कॅल्शियम आणि कोलेस्ट्रॉल जमा होतो. तणावाव्यतिरिक्त आहारविहाराच्या चुकीच्या सवयी, निष्क्रिय जीवनशैली आणि धूम्रपानदेखील दुसर्‍यांदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवते. 

 दुसर्‍या ‘हार्ट अ‍ॅटॅक’पासून बचाव कसा?  

पहिल्या अ‍ॅटॅकनंतर लोकांमध्ये निराशा उत्पन्न होते. अशा वेळी थोडासा जास्त तणावही त्यांच्यासाठी घातक असतो; मात्र समजूतदारपणा आणि कुटुंबातील लोकांनी योग्य आणि संपूर्ण काळजी घेतली, तर आयुष्य सुरक्षित राहू शकते. त्यामुळे दुसर्‍यांदा ‘हार्ट अ‍ॅटॅक’ येऊ नये, यासाठी जीवनशैलीमध्ये काही बदल करावे आणि थोडी सावधगिरी बाळगावी. कोलेस्ट्रॉलचे उच्चतम प्रमाण ‘हार्ट अ‍ॅटॅक’ येण्याचे प्रमुख कारण आहे. मग हा ‘हार्ट अ‍ॅटॅक’ पहिला असो किंवा दुसरा. त्यामुळेच कोलेस्ट्रॉलची पातळी 130 एमजी प्रतिडीएलपर्यंतच असली पाहिजे. आहार तक्त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश जास्त असावा. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. फळे, भाज्या, अख्खी धान्ये आणि मासे यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. शारीरिक हालचाल जास्त प्रमाणात करावी. मद्यपान, धूम्रपान आणि इतर अमली पदार्थांचे सेवन बिलकुल करू नये. 

आहारविहार कसा असावा? 

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पोषक आणि संतुलित आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. सॅच्युरेटेड मेद असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे. कारण, त्यामुळे धमन्या ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हिरव्या पालेभाज्या, सॅलड किंवा कच्च्या फळभाज्या, फळे, अख्खी धान्ये यांचे सेवन अधिकाधिक करावे. एक दिवसात दोन किंवा तीन चहाचे चमचे तेल सेवन करावे. मेदविरहित दूध आणि दुधाचे पदार्थ सेवन करावेत. लाल मांसाचे सेवन बिलकुल बंद करावे. मासे, ग्रिल केलेले चिकन, भाजलेले किंवा रोस्टेड चिकन खावे. तळलेले, तेलकट जेवण, पेस्ट्री, केक, मिठाया, पापड आणि लोणचे हे पदार्थ टाळावेत. मीठ, साखर, कॅफीन इत्यादींचे सेवन कमी करावे. डबाबंद आणि जंकफूड मात्र पूर्णपणे बंद करावे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांबरहुकूम आहार आणि जीवनशैली राखावी. •

शारीरिक सक्रियता असावी 
आठवड्यातून पाच दिवस 30 मिनिटांपर्यंत शारीरिक हालचाल आवश्यक करावी. व्यायाम आवडत नसेल तर बागकाम, चालणे आणि पोहणे या गोष्टी कराव्यात. जिन्याचा वापर करावा. 

तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा
अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे, की हृदयाच्या समस्यांचे सर्वात मोठे कारण आहे ते तणाव. त्यामुळे वेदना आणि त्रास होऊ शकतो. चिंता आणि नैराश्य या भावना त्यामुळे निर्माण होतात आणि उत्साह, ऊर्जा कमी होते. बदलत्या मनोवस्थांविषयी डॉक्टर आणि कुटुंबीयांशी स्पष्टपणे बोला आणि त्यांची मदत घेण्यात वावगे वाटून घेऊ नका. भावनिक चढउतार होत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञाची भेट घ्या. रोजच्या कामाव्यतिरिक्त इतर काही गोष्टी कराव्यात. दैनंदिनीपेक्षा वेगळ्या गोष्टी केल्यामुळे तणावाची पातळी कमी राहण्यास मदत होते. एखादा छंद जोपासावा किंवा सकारात्मक आत्मचर्चा करावी. गाणी ऐकावी किंवा चांगली पुस्तके वाचावीत, ध्यानधारणा करावी. त्यामुळे तणाव कमी होतो; नाडीचे ठोकेही नियंत्रणात राहतात. 

रक्तदाब नियंत्रित ठेवा
रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हा हृदयविकारापासून बचाव करण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. जेव्हा रक्तदाब वाढतो, तेव्हा हृदयाला शरीरात रक्त ढकलण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयाचा आकार वाढतो आणि धमन्यांमध्ये चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. रक्तदाब नेहमीच 120-80 एमएमएचजीच्या आसपास असावा. वाढलेला रक्तदाब 130-90 च्या वर असेल, तर ब्लॉकेजेस दुप्पट वेगाने वाढतात. तणावात कमतरता, ध्यानधारणा, मीठ कमी करणे; एवढेच नव्हे तर कमी औषधे घेऊनही रक्तदाब कमी करता येतो. 

नियमित चेकअप
पहिल्या ‘हार्ट अ‍ॅटॅक’नंतर दुसर्‍यांदा अ‍ॅटॅक येऊ नये, यासाठी जरूर ते सर्व उपाय करावेत. डॉक्टरांनी जी औषधे दिली आहेत, त्याचे सेवन वेळच्या वेळी करावे. नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी. 

 तातडीने हे उपाय सुरू करावेत
दोन्ही प्रकारच्या मधुमेहात प्रकार 1 आणि प्रकार 2 हे इन्सुलिन या हार्मोन्सच्या पातळीशी निगडित आहेत. हृदयरोग आणि स्ट्रोक किंवा लकवा यांचा धोका त्यामुळे वाढतो. मधुमेहाचे रुग्ण असाल, तर शर्करेची पातळी नियंत्रित ठेवावी. फास्टिंगची शुगर 100 एमजी प्रतिडीएलपेक्षा कमी असावी. आणि जेवल्यानंतर दोन तासांनी असणारी शुगर ही 140 एमजी प्रतिडीएलपेक्षा कमी असावी. 
हृदयरोग्यांनी बिनतेलाचे भोजन सेवन करावे. म्हणजे झीरो ऑईलचा वापर करावा. मसाल्यांचा वापर बंद न करता कमी प्रमाणात करावा. तेल हे ट्रायग्लिसराईड्स असतात आणि रक्तातील त्याची पातळी 130 एमजी प्रतिडीएलपेक्षा कमी असावी. 
तणाव 50 टक्के कमी करावा. त्यामुळे हृदयरोग थोपवण्यास मदत मिळते. कारण, मानसिक तणाव हृदयाच्या आजारांचे मुख्य कारण असते. 
स्थूलता कार्डियोव्हॅसक्युलर आजार आणि ‘हार्ट अ‍ॅटॅक’चे प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवावे. 

 धोकादायक घटक
निष्क्रिय जीवनशैली
जास्त वजन किंवा स्थूलता
कोलेस्ट्रॉलची अधिक पातळी
ब्लड शुगरची जास्त पातळी (जर मधुमेही असाल)
उच्च रक्तदाब, अत्याधिक तणाव.