Sun, Dec 08, 2019 06:29होमपेज › Aarogya › आरोग्यवर्धक तिळाचे तेल

आरोग्यवर्धक तिळाचे तेल

Published On: Aug 01 2019 1:22AM | Last Updated: Aug 01 2019 1:22AM
डॉ. मनोज शिंगाडे

तेलबियांमधील तीळ हे पौष्टिक म्हणून ओळखले जाते. भाजीतही तीळ घातले जातात. भाकरीला लावतात. कारण, तिळापासून ऊर्जा मिळतेच; पण ते पौष्टिकही असतात.   तिळामध्ये अनेक घटक असतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. विशेष म्हणजे, मुलांच्या मेंदूच्या विकासासाठीही तीळ उपयुक्त असतात. 

तिळामध्ये अनेक प्रकारची प्रथिने, कॅल्शियम, ब जीवनसत्त्व आणि कार्बोहायड्रेट इत्यादी घटक असतात. तिळामध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडही असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तिळामध्ये सेसमीन नावाचे विशेष अँटीऑक्सिडंट असते. ते कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास अटकाव करते. या सर्वाव्यतिरिक्त तीळ मेंदूसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे मोठ्यांबरोबर मुलांनाही तिळाचे खूप फायदे होतात. 

तणाव निवारण ः मानसिक दुबळेपणा येण्यास तणाव कारणीभूत असतो. तीळ हा तणाव दूर करण्याचे काम करते. तिळाचे तेल बुद्धिवर्धक असल्याचेही सांगितले जाते. तिळामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण खूप अधिक असते. त्यामुळे तिळाचे सेवन केल्याने मानसिक कमजोरी दूर होते. तिळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तिळाचे सेवन केल्याने मानसिक अस्वास्थ्य दूर होते. मुलांची कॅल्शियमची गरज यामुळे पूर्ण होते. 

रक्तवाढीसाठी उपयुक्त ः तिळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत होते. त्याव्यतिरिक्त तिळातील लेसिथिन नावाचा घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतो. रक्ताभिसरण चांगले होते. तिळाचे सेवन केल्याने लहान मुले आणि महिला यांना अ‍ॅनिमियाची तक्रार जाणवत नाही. हिमोग्लोबिनचे प्रमाणही योग्य राहते. नियमितपणे तिळाचे सेवन अवश्य करावे. 

रक्ताभिसरणासाठी उपयुक्त ः तिळाचे तेल दाट असल्याने मालिशसाठी तिळाचे तेल वापरावे. कारण, ते त्वचेमध्ये सहजपणे मिसळले जाते. त्वचेला आतून पोषण मिळण्यास तीळ तेल उपयुक्त असते. त्यामुळे रक्ताभिसरणही व्यवस्थित होते, तसेच ज्या पेशींना इजा झालेली आहे, त्यादेखील दुरुस्त होतात. 

त्वचेच्या समस्यांसाठी योग्य ः तिळामध्ये जीवाणूरोधक गुण असतात. त्यामुळे कोणतीही इजा लवकर बरी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच सूज आल्यास तिळाचे तेल लावल्यास फायदा होतो. सोरायसिस आणि एक्झिमा यासारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही मदत होते. त्याव्यतिरिक्त तिळाचा वापर करू शकतो. पोळले असेल तर तीळ तेल, तूप आणि कापूर एकत्र करून लावल्यास उपयोग होतो.