Thu, Nov 14, 2019 06:52होमपेज › Aarogya › आरोग्य संजीवनी त्रिफळा

आरोग्य संजीवनी त्रिफळा

Published On: Jul 11 2019 1:20AM | Last Updated: Jul 11 2019 1:20AM
डॉ. संतोष काळे

त्रिफळाचूर्णाचे नाव न ऐकलेली व्यक्‍ती सहसा आढळत नाही. कारण, कोणत्या ना कारणाने याचा उल्लेख होत राहतो. सहसा अपचनासाठी या चूर्णाचा हमखास वापर केला जातो; परंतु त्याचे इतरही अनेक गुणधर्म आहेत. त्यानुसार या बहुगुणी औषधी वनस्पतीचे अनेक उपयोग आहेत. चवीने अत्यंत कडू; परंतु गुणांनी अत्यंत श्रेष्ठ असलेल्या त्रिफळाच्या उपयुक्‍ततेवर टाकलेला एक दृष्टिक्षेप...

अनेक कारणांमुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाली, की आयुर्वेदिक औषधे देणारे डॉक्टर तातडीने त्रिफळ्याकडे वळतात. कारण, ही बहुगुणी औषधी कित्येक प्रकारच्या आजारांमध्ये प्रभावी गुणकारी ठरते. खरे तर, ती शरीराचा कायाकल्पच घडवून आणते, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. तिच्या नियमित सेवनाने शरीराला तजेला येण्यापासून रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यापर्यंत कित्येक प्रकारचे लाभ होतात. बद्धकोष्ठता झाली, तर त्यावर त्रिफळा लागू पडतो. 

जंतांचे निर्मूलन ः पोटात जंत झाले तर त्यांना मारण्यासाठी त्रिफळा उपयुक्‍त ठरतो. एवढेच नव्हे, तर चपटकृमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या टेपवर्मच्या निर्मूलनासाठीही त्रिफळा उपयुक्‍त ठरतो. 

श्‍वसनाचे आजार ः श्‍वसनाच्या आजारात किंवा श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्रिफळा चूर्णाचा वापर केल्यास आराम पडतो. 

डोकेदुखीवरचा प्रभावी इलाज ः डोकेदुखीवरचा प्रभावी इलाज म्हणून त्रिफळाचूर्णाकडे पाहिले जाते. डोकेदुखीवरच्या कित्येक गोळ्यांच्या दुष्परिणामांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना यामुळे नक्‍कीच दिलासा मिळतो. सहसा पचनक्रिया बिघडल्यामुळे डोकेदुखी उद्भवते. त्रिफळाचूर्ण यावरचा रामबाण उपाय ठरते. 

मधुमेहींसाठी वरदान ः पचनक्रियेतील बिघाडामुळे उद्भवणारा भयावह आजार म्हणजे मधुमेह. या आजारात त्रिफळा खाल्ल्यामुळे पचनक्रियेला गती मिळते. स्वादुपिंडातील बीटा पेशींमधून इन्श्युलिन स्रवते. या पेशींना उत्तेजना देऊन इन्श्युलिन स्रवण्याच्या क्रियेस प्रोत्साहित करण्याचे काम त्रिफळा करते. 

पचनाच्या तक्रारी दूर ः त्रिफळ्याच्या सेवनाने अपचनाच्या तक्रारी दूर होतात. आतड्यांशी संबंधित आजारांमध्येही ते उपयुक्‍त ठरते. पचनमार्गाचा ‘पीएच’ योग्य तेवढा राखण्यासाठी त्रिफळ्याचा मोठाच उपयोग होतो.

अ‍ॅनिमिया हटवण्यात वाकबगार ः पंडुरोग किंवा अ‍ॅनिमिया हा रक्‍तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्यामुळे होतो. तांबड्या रक्‍तपेशींमध्ये हिमोग्लोबीन असते. रक्‍तक्षय, पंडुरोग किंवा अ‍ॅनिमिया या नावांनी ओळखल्या जाणार्‍या या आजारात हिमोग्लोबीनचे प्रमाण  वाढवण्यासाठी त्रिफळ्याचा वापर केला जातो.

वजन कमी करण्यासाठी योग्य  ः वजनवाढीने त्रस्त असलेल्या लोकांना त्रिफळ्याच्या नियमित सेवनाने मोठाच फायदा होतो. शरीरातील चरबी थेट कमी होत असल्यामुळे वजन कमी होतेच; शिवाय शरीर सुडौल आणि आकारबद्धही बनते. 

त्वचारोगांना उपकारक  ः कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगांमध्ये त्रिफळा चूर्ण उपकारक ठरते. शरीरात साठलेले दूषित पदार्थ बाहेर टाकून ते शरीर शुद्ध करते आणि साहजिकच त्वचाही तजेलदार बनवते. 

तारुण्य टिकवण्यात उपयुक्‍त ः त्रिफळा चूर्णामुळे दीर्घ काळापर्यंत तारुण्य टिकून राहते. वृद्धत्वाची प्रक्रिया लांबवण्याची क्षमता या चूर्णात असते. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. वय वाढवणार्‍या घटकांचे प्रमाण कमी होते. मायटोकाँड्रीया, गॉल्जी बॉडीज या पेशीतील घटक पदार्थांची कार्यशक्‍ती वाढवून ते पेशींची ताकद वाढवण्याचे कार्य करते. 

शरीराचा कायाकल्प ः आयुर्वेदात त्रिफळा चूर्णाला शरीराचा कायाकल्प करणारी औषधी असेच म्हटले जाते. हे चूर्ण रोगप्रतिकारशक्‍ती वाढवते. शरीरात अँटिबॉडीजच्या निर्मितीला ते उत्तेजन देते. अँटिबॉडीज अँटिजीन्सच्या विरोधात लढा देतात. 

सेवन करण्याचे प्रमाण ः रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा एवढे त्रिफळाचूर्ण खावे आणि त्यावर कोमट दूध प्यावे. अर्थातच विविध आजारांवर हे औषध काम करत असल्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार आणि आजारानुसार त्याचे नेमके प्रमाण ठरवण्यासाठी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.