Sat, Sep 21, 2019 07:22होमपेज › Aarogya › हसा आणि निरोगी राहा!

हसा आणि निरोगी राहा!

Published On: Jun 13 2019 1:28AM | Last Updated: Jun 13 2019 1:28AM
डॉ. संतोष काळे
 

हल्लीचे आयुष्य धावपळीतच जाते. सततचा तणाव, यामुळे लोकांचे  हसणेच कमी झाले आहे. परिणामी, आजारांचे प्रमाण वाढते आहे. आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि व्यक्‍तिमत्त्व चांगले ठेवण्यासाठी खळखळून हसले पाहिजे. 

मेरीलँड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, खळखळून हसणार्‍यांचा रक्‍तप्रवाह चांगला राहतो. 10 मिनिटे खळखळून हसल्याने 2 तास तरी वेदनांपासून मुक्‍ती मिळते. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. तज्ज्ञांच्या मते, जे लोक जास्त वेळ हसतात ते दीर्घ काळ तरुण दिसतात. कारण, आपण जेव्हा हसतो तेव्हा आपले मन हलके होते. हसल्याने आनंद वाटतो. मनाला आराम मिळतो. त्यामुळे हसणे ही एक क्रिया नसून, अनेक विकारांवरील औषध आहे. हसल्यामुळे शरीराचे स्नायू, डोळे, जबडा आणि हृदयाचे स्नायू यांना आराम मिळतो. हसणे हा एकप्रकारे योगाभ्यासही आहे. त्यामुळेच त्याला हास्ययोग असेही म्हणतात. त्याचे फायदेही होतात. जेव्हा आपण मनमोकळे हसतो तेव्हा शरीराची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. मनमोकळे हसल्याने शरीर हलके होते आणि दिवसभर उत्साही वाटते. 

तज्ज्ञांच्या मते, मनमोकळे हसल्याने रक्‍तप्रवाहाची प्रक्रिया योग्यप्रकारे सुरू राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होतो. मनमोकळे हसल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्‍त चरबी कमी होण्यास मदत मिळते. हसण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण तणावग्रस्त होत नाही. तणाव अनेक गंभीर विकारांना आमंत्रण देतो. तणावामुळेच हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आदींचे नुकसान होते. बेचैनी, चिडचिड, सतत राग येणे आदी त्रास होतात. पण व्यक्ती सतत हसत राहिल्यास ही समस्या उद्भवत नाही. हास्ययोग केल्याने रक्तदाबाच्या समस्येचे निर्मूलन होते. हसल्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. मनमोकळे हसल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते.

आपण हसतो तेव्हा शरीराला ऑक्सिजनचा जास्त पुरवठा होतो. त्यामुळे  हृदयाचे ठोके योग्य राहाण्यास मदत होते. हसल्यामुळे हृदयाचा पंपिग रेट योग्य राखण्यास मदत होते. हसल्यामुळे आपली प्रतिकारक्षमता चांगली राहाते. त्यामुळे रोगांशी लढण्यास फायदा होतो. रात्री नीट झोप  लागत नसेल तर हसण्याची सवय करा. हसल्यामुळे शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन स्रवते. त्यामुळे आरामशीर झोप लागण्यास मदत होते. हसल्यामुळे हृदय चांगल्या प्रकारे काम करते. 

तरूण आणि सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही. त्यासाठी हसणे खूप गरजेचे आहे. आपण हसतो तेव्हा चे़हर्‍यावरील स्नायू चांगल्या प्रकारे काम करतात त्यामुळे चेहर्‍याच्या चारही बाजूस रक्ताभिसरण होते त्यामुळे व्यक्ती तरूण आणि सुंदर दिसते. आपण हसतो तेव्हा फुफ्फुसातून वेगाने हवा बाहेर पडते त्यामुळे दीर्घ श्‍वास घेण्यास मदत मिळते. शरीरालाही ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होतो. हसल्याने आपल्याला उर्जा मिळते थकवा आणि सुस्ती दूर होते.