Thu, Nov 14, 2019 07:37होमपेज › Aarogya › व्याधी हर्पीसची

व्याधी हर्पीसची

Published On: Jul 11 2019 1:20AM | Last Updated: Jul 11 2019 1:20AM
डॉ. संजय गायकवाड

अनेकदा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर लहान लहान पुरळ येतात. आपल्याला वाटते अ‍ॅलर्जी किंवा फंगल इन्फेक्शन आहे. आपण काही तरी थातूरमातूर उपचार करतो, तेवढ्यापुरते बरे वाटते; मग आपण त्याकडे लक्षच देत नाही. असे करणे धोकादायक ठरू शकते. शरीरावर उठणारे हे लहान लहान पुरळ पुढे हर्पीस (नागीण) या वकाराचे लक्षणही असू शकतात. 

हर्पीस हा एक असा आजार आहे, ज्यात अंगावर लहान लहान पाणी भरलेले पुरळ उठतात आणि मग ते नंतर संपूर्ण शरीरावर पसरतात. तसेच त्यांचा आकारही वाढत जातो. हर्पीस या आजाराबद्दल जाणून घेऊ...

एका संशोधनानुसार हर्पीस (नागीण) हा आजार वयाच्या 40 वर्षांनंतर बहुतांश करून होतो. हर्पीस वेरिसेला जोस्टर नावाच्या विषाणूपासून हा आजार होतो. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे यात अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. हा आजार वयाच्या चाळिशीनंतर कुणालाही आणि केव्हाही होऊ शकतो; पण ज्यांना कांजिण्या येऊन गेल्या असतील, त्यांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते, असे म्हटले जाते. कांजिण्याचा विषाणू म्हणजेच वेरिसेला जोस्टर शरीरात आधीपासूनच असेल, तर हर्पीस होण्याचा धोका जास्त असतो. 

हर्पीसचे प्रकार आणि लक्षणे 

हर्पीस दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे एचएसव्ही-1 म्हणजे हर्पीस टाईप 1 किंवा ओरल हर्पीस आणि दुसरा एचएसव्ही-2 म्हणजे जिनायटल हर्पीस किंवा हर्पीस टाईप 2. या आजाराच्या लक्षणांबाबत बोलायचे, तर काही लोकांमध्ये या आजाराची लक्षणे अगदी काही महिन्यांपर्यंत दिसून येत नाहीत. तर काहींच्या बाबतीत दहा दिवसांमध्येच ती दिसतात. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हर्पीसमध्ये जननेंद्रिये आणि शरीराच्या अन्य भागांवर पाण्याने भरलेले पुरळ उठतात. जसे ते मोठे होतात, तसे ते फुटतात आणि त्यातून जे पाणी बाहेर पडते ते शरीराच्या अन्य भागांना लागते आणि तेथे संसर्ग होतो. म्हणूनच, असे फोड किंवा पुरळ उठले, तर ते फोडू नका किंवा त्यांना हातही लावू नका. कारण, ते फोडले तर ते पाणी शरीरावर इतरत्र लागते किंवा कपड्यांना लागते आणि त्यातून संसर्ग वाढतो. अशा रुग्णालाही अन्य लोकांपासून लांब ठेवले पाहिजे. त्याचे कपडे, भांडी इतकेच नव्हे, तर तो वापरत असलेल्या सर्व वस्तूही वेगळ्या ठेवल्या पाहिजेत आणि त्या सर्व वस्तू स्वच्छ असल्या पाहिजेत. 

अन्य लक्षणे 

-हर्पीस असेल तर जननेंद्रिये आणि शरीराच्या अन्य भागांवर पाण्याने भरलेले फोड उठतात. ते मोठे झाल्यावर फुटतात आणि त्यातील पाणी शरीराच्या अन्य भागांना लागते आणि त्यातून संसर्ग पसरतो. 
-संपूर्ण शरीरात वेदना आणि खाज सुटते. तोंडात तसेच शरीरातील अन्य भागांवरही व्रण उठतात. 
-सारखा ताप येतो आणि लिंफ नोड्स मोठे होतात. 
-शरीरावर सर्वत्र लाल चट्टे उठतात.
-हे फोड उठण्यापूर्वी रुग्णाला वेदना होतात. 
-वेदना झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्या जागेवरील त्वचेवर लाल रंगाचे पुरळ उठायला सुरुवात होते आणि हळूहळू या फोडांमध्ये पाणी होते. 
-याशिवाय सांधेदुखी, डोकेदुखी आणि थकवा येऊ लागतो. फोडांमध्ये वेदना होणे हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. अनेक रुग्णांमध्ये या वेदना असह्य असतात. 

पावसाळ्यात हा आजार होण्याचा धोका जास्त

वास्तविक पाहता, हर्पीसचा विषाणू कायमच वातावरणात असतो; पण हिवाळा आणि पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण जास्त आढळून येतात. शरीराच्या कोणत्याही भागात हा आजार दिसतो. अनेक वेळा लोक याकडे गंभीरपणे पाहत नाहीत आणि वेळेवर लक्ष न दिल्यामुळे त्याचा संसर्ग डोळे आणि नाकाकडेही पसरू लागतो. सर्वसाधारणपणे याच्या संसर्गाची सर्वाधिक सुरुवात चेहरा आणि छातीवर दिसून येते. या आजाराबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे या आजारातील संसर्ग किंवा इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट करता येत नाही. वारंवार त्याची लक्षणे दिसून आल्यावर ते केवळ बरे केले जाऊ शकतात.

हर्पीसवर उपचार

या आजारावर काही घरगुती उपायही केले जातात. उदाहरणार्थ, गरम पाण्यात थोडे मीठ टाकून त्या पाण्याने स्नान केल्याने फायदा होतो. प्रभावित भागावर पेट्रोलियम जेली लावल्यानेही आराम मिळतो. याशिवाय, हर्पीस पूर्णपणे बरा होत नाही, तोपर्यंत लैंगिक संबंध न ठेवणे चांगले. या आजारावर काही घरगुती उपचार असले, तरी डॉक्टरी उपचार घेणेही आवश्यक आहे, नाहीतर हा आजार गंभीर स्वरूप धारण करेल, हे लक्षात ठेवायला हवे. हर्पीसपासून बचाव करायचा असेल, तर सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे गरजेचे आहे. सेक्सच्या वेळी कन्डोमचा वापर करा. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीबरोबर लैंगिक संबंध ठेवू नका. याशिवाय, पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्या. त्वचेवर कुठेही वेदना होऊन फोड आलेले दिसले, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. दुखणे अंगावर काढू नका.