Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Aarogya › आरोग्य : धूम्रपानाइतक्याच घातक सवयी 

आरोग्य : धूम्रपानाइतक्याच घातक सवयी 

Published On: Nov 09 2017 1:51AM | Last Updated: Nov 09 2017 1:51AM

बुकमार्क करा

डॉ. संजय गायकवाड

धूम्रपान ही अनारोग्यकारी सवय आहे. त्याचे प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होतातच; मात्र धूम्रपान करत नसलात तरीही प्रतिकारशक्तीच्या कमतरतेअभावी होणारे आजार जडू शकतात. हल्लीच्या काळात व्यक्तीला जडणार्‍या काही सवयींमुळे धूम्रपानाने होणार्‍या त्रासांसारखे त्रास होऊ शकतात. 

गेल्या दशकाच्या तुलनेत जगभरातच धूम्रपानाचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र तितकेच जीवघेणे ठरतील इतक्या वाईट सवयींनी व्यक्तीच्या आयुष्यात शिरकाव केला आहे. बैठ्या कामाच्या सवयी, एकटे जगण्याची शैली यांच्या वाढत्या प्रभावामुळे धूम्रपानापेक्षाही घातक परिणाम आयुष्यावर होत आहेत. सतत प्रक्रिया केलेले सॅच्युरेटेड फॅटस आणि साखरेचे अतिप्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने काही आजारांना आमंत्रण मिळते जे धूम्रपानामुळे होणार्‍या आजारांइतकेच घातक ठरू शकतात. 

एकटेपणा : इंटरनेट क्रांतीनंतर समाजमाध्यमे संपर्काचे नवे जाळे विणू लागल्या. त्यामुळे दोन टोकांवर असलेल्या लोकांमध्ये सहज संपर्क होऊ लागला; पण समाजमाध्यमांच्या वापराच्या अतिरेकामुळे प्रत्यक्षात एकटेपणा वाढीस लागला. प्रत्यक्ष भेटीपेक्षा समाजमाध्यमांच्या मदतीनेच लोकांशी संवाद होऊ लागतो. तज्ज्ञ आणि डॉक्टर्स यांच्या मते जगभरात एकटेपणा वाढीस लागला आहे. मानसशास्त्रातील एका अभ्यासानुसार दिवसभरात एका व्यक्तीने पंधरा सिगरेट ओढल्यामुळे जितके आयुष्य कमी होते तितकेच आयुष्य एकटेपणामुळे कमी होते. 

बैठी जीवनशैली : सतत बैठ्या जीवनशैलीचा अंगिकारही व्यक्तीसाठी धोक्याचाच आहे. दिवसभर बसून राहिल्यास विविध कर्करोगांसाठी पाया ठरू शकतो. संशोधकांनी टीव्ही पाहाण्यासाठी, कामासाठी किंवा प्रवास यापैकी कोणत्याही कारणासाठी बैठी जीवनशैली असणार्‍या 40 लाख लोकांचा अभ्यास केला. त्यातून काही गोष्टी समोर आल्या. या व्यक्ती जरी व्यायाम करत असल्या तरी  त्यांना फुफ्फुस, मोठे आतडे आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो. 

अनिद्रा : जगभरातच बहुतेक लोकांना झोपेच्या संदर्भात अनिद्रा, अपुरी झोप यासारखे त्रास होतात. ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने हे निरीक्षण नोंदवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार अनिद्रेमुळे हृदयविकाराचा झटका येणे आणि लकवा होणे याचा धोका वाढतो आहे. हा धोका नियमित सिगरेट ओढल्याने होणार्‍या धोक्याइतकाच आहे. 

टॅनिंग : टॅनिंग हा त्वचेशी निगडीत त्रास आहे जो सूर्यप्रकाशाचा त्वचेवर होणारा परिणाम म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे त्वचा काळवंडल्यावर आपण ती टॅन झाली आहे असे म्हणतो; पण सिगरेट ओढण्याइतके सूर्यप्रकाशाने टॅन होणारी त्वचेचे गंभीर परिणाम असू शकतात. वास्तविक सिगरेट ओढून होणार्‍या फुफ्फुसाच्या कर्करोगापेक्षा टॅन झालेली त्वचा ही त्वचेच्या कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळेच टॅन झालेल्या त्वचेची सुरक्षा हादेखील सार्वजनिक आरोग्यातील एक महत्त्वाचा भाग असू शकतो. 

स्वयंपाकाचा गॅस : स्वयंपाकाच्या गॅसमुळे स्वयंपाक घरात प्रदूषणकारी कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन डायाऑक्साईड आणि फॉर्माल्डिहाईड तयार होतात. हल्ली प्रत्येक घरात गॅसची शेगडीच वापरली जाते. त्यामुळे स्वयंपाक करताना निर्माण होणारे हे वायू सिगरेटच्या धुराइतकेच धोकादायक आहेत. गॅसशेगडीचा वापर बंद करणे तर शक्य होणार नाही त्यामुळे गॅसशेगडीवर लावण्याचे व्हेंट हूड बसवून घ्यावे. ज्याच्या आतील मेकॅनिकल फॅन स्वयंपाकघरातील प्रदूषण रोखण्यास मदत करेल.

निकृष्ट आहार : प्रक्रिया केलेल्या पदार्थात साखर आणि अनसॅच्युरेटेड चरबीचे प्रमाण अधिक असते. याचे अतिरिक्त सेवन केल्याने काही आजार जडू शकतात. धूम्रपानाइतके गंभीर नसले तरीही त्याच पातळीचे आजार होऊ शकतात. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मद्यपान, अमली पदार्थ आणि तंबाखू सेवन यापेक्षा निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे.