Fri, Jun 05, 2020 01:14होमपेज › Aarogya › निमुळत्या रक्तवाहिन्या आणि हृदयविकार

निमुळत्या रक्तवाहिन्या आणि हृदयविकार

Published On: May 16 2019 2:00AM | Last Updated: May 16 2019 2:00AM
डॉ बिपिनचंद्र भामरे

आपली बैठी जीवनशैली आणि चुकीच्या आहार सवयींमुळे आपण या प्रक्रियेचा वेग वाढवत असतो. रक्तवाहिन्यांमध्ये विविध आकारांचे प्लाक आढळून येतात. प्लाकभोवती रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि ही समस्या अधिक गंभीर करतात. या अशारीराबाहेरील घटकांच्या अस्तित्वामुळे या अवयवाला सूज येण्यास सुरुवात होते. या सगळ्या समस्या मिळून हृदयविकाराची सुरुवात होते. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे तर आरोग्यासंबंधी विविध तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. 

व्यायामाचा अभाव, वेळी-अवेळी खाणे, जंक फूडवर ताव मारणे, यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, शरीराला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांवरही या सार्‍याचा परिणाम होत असून हृदयविकाराचे प्रमाण वाढते. निमुळत्या रक्तवाहिन्यांमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

निमुळत्या रक्तवाहिनीची लक्षणे

ही लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत; पण धाप लागणे आणि थकवा जाणवणे ही रक्तवाहिन्या निमुळत्या झाल्याची लक्षणे आहेत. काहींना छाती, बाहू, खांदे इत्यादी ठिकाणी ताठरता आल्याचेही जाणवू शकेल. रक्तवाहिन्या खूपच निमुळत्या झाल्या असतील आणि रक्तवाहिन्यांमध्ये खूपच अडथळा निर्माण झाला असेल तर ती व्यक्ती बेशुद्धही बडू शकते.

उपचार

या आजाराचे वेळेवर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. सुरुवातीच्या टप्प्यातील आजाराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असल्याने दर वर्षी आरोग्य चाचणी करून घेणे हितावह असते. जेणेकरून रक्तवाहिनीतील अडथळे वेळीच समजू शकतात आणि त्यावर लगेच उपचार करता येऊ शकतात. अडथळे काढून टाकण्यासाठी आणि रक्तवाहिन्या खुल्या करण्यासाठी स्टेंट या लवचीक नळ्यांचा वापर करतात; पण सगळ्याच रुग्णांमध्ये स्टेंट लावण्याची शस्त्रक्रिया/अँजिओप्लास्टी करणे हितावह नसते. ज्या रुग्णांची रक्तवाहिनी 70 टक्क्यांहून अधिक ब्लॉक झालेली असेल, त्यांच्यासाठीच हृदयविकारतज्ज्ञ या शस्त्रक्रियांची शिफारस करतात. बहुधा, रुग्णांना रक्त पातळ करण्याच्या, गुठळी विरघळवणारी औषधे आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारी औषधे देण्यात येतात. प्लाक वाढू न देणे आणि हृदयविकाराच्या झटक्याला प्रतिबंध करणे हे औषध व्यवस्थापनाचे उद्दिष्ट असते.

प्रतिबंध

 योग्य वजन राखणे
 सकस आहार घेणे

 व्यायाम हा दिनचर्येचा अविभाज्य घटक असला पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी आठवड्यातून किमान पाच दिवस 30 मिनिटे व्यायाम करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटना करते.
 धुम्रपान टाळा आणि मद्यसेवन मर्यादित करा.

असे असले तरी वजन कमी करणे, व्यायाम अधिक करणे किंवा चरबीयुक्त आहार कमी करणे, यामुळे प्लाक निर्माण होण्याची शक्यता कमी होते; पण सध्या असलेले प्लाक निघून जात नाहीत. तुमच्या रक्तवाहिन्या निमुळत्या झाल्या असतील किंवा त्यात अडथळा निर्माण झाला असेल, तरी निराश होऊ नका. परिस्थिती सुधारण्यासाठी वेळीच वैद्यकीय/सर्जिकल उपचारांसह हृदयस्नेही आहार आणि व्यायामामुळे तुम्हाला नुकसान भरून काढता येईल.

हृदयस्नेही आहारात चांगले फॅट्स (अनसॅच्युरेडेड फॅट्स चणे, मासे, अ‍ॅव्होकाडो इत्यादीमध्ये असतात) समाविष्ट असलेले पदार्थ आणि अपायकारक फॅट्स कमी असलेल्या (प्रक्रिया केलेले/पॅकेज्ड पदार्थ, चरबीयुक्त मांस इत्यादी) पदार्थांचा समावेश असावा. भाज्या, फळे, शेंगा इत्यादींचा समावेश असावा आणि आहारातून साखर कमी करावी! आपल्या शरीराला आवश्यक असलेली साखर फळांमधून मिळते. त्यामुळे सोडा पेये, आइस्क्रीम यासारखे पोषक मूल्य नसलेल्या पदार्थांचे सेवन करून त्यात भर घालण्याची गरज नाही.

व्यायामाचा विचार करता, अचानक जास्त व्यायाम करू नका. चालण्याने सुरुवात करा आणि त्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता वाढवा. लवचीकतेसाठी आणि शरीराचा बांधा व्यवस्थित ठेवण्यासाठी योगही उपयोगी आहे. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा हितकारक असतो, असे म्हणतात. त्यामुळे हे आजार दूर ठेवण्यासाठी शिस्तशीर जीवनशैलीचा अवलंब करावा.