Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Aarogya › तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या

Published On: Nov 09 2017 1:51AM | Last Updated: Nov 08 2017 10:08PM

बुकमार्क करा

डॉ. पोपट सुरवसे

आपल्या शरीराचा 70 टक्केहिस्सा पाण्याने व्यापलेला आहे. यावरून शरीराची पाण्याची गरज लक्षात येते. शरीरात निर्माण झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक रोग लांब राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे सेवन केल्यास असेच आरोग्यलाभांचे प्रमाण अधिक होते. तांब्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म पाण्यातील जीवाणूंचा नाश करून पाणी स्वच्छ करतात. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. त्याशिवाय तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे असतात. त्याविषयी जरूर वाचा.

पचनक्रिया : चुकीच्या आहार सेवनामुळे अनेकदा पचनसंस्था खराब होते. त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी रोज तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास पोट साफ होते आणि पचनक्रियाही चांगली रहाते. 

वजन कमी करणे : स्थूलपणा ही समस्या सर्वत्र आढळून येते. रोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी ते प्यावे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजनही कमी होते. 

पोटाचा अल्सर : काही लोकांमध्ये पोटाच्या अल्सरची समस्या असते त्यामुळे पोटाच्या अंतत्वचेला फोड येतात, साले सुटतात त्यामुळे वेदना होतात. रोज सकाळी अनशापोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास अल्सरचा आजार लवकर बरा होतो. त्याशिवाय शरीराच्या कोणत्याही भागाला जखम झाली तरीही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे जखम लवकर भरून येते. 

संसर्ग दूर होतो : वातावरणातील बदलांमुळे सर्दी-खोकला सुरू होतो. धुळीच्या संसर्गामुळे हा त्रास होतो. अशा वेळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीराचा संसर्गापासून बचाव करू शकतो.