Sun, Apr 21, 2019 06:15होमपेज › Aarogya › यकृताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको

यकृताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको

Published On: Nov 08 2018 1:29AM | Last Updated: Nov 07 2018 8:26PMडॉ. संजय गायकवाड

यकृत या शरीरातील महत्त्वाच्या भागाकडे आपण लक्ष देतोच, असे नाही. किंबहुना, यकृताचे आरोग्यातील महत्त्वच अनेकांना ठाऊक नसते. यकृताच्या आरोग्याकडे आपल्या खाण्या-पिण्याच्या शैलीद्वारे तसेच घरगुती उपायांद्वारे लक्ष पुरवता येते. यकृताचे कार्य बिघडले, तर अनेक गंभीर व्याधी आपल्या पाठीमागे लागतात. हे ओळखून यकृताच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. 

यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. यकृताद्वारे शरीरातील अन्‍नपचनाचे कार्य केले जाते. या अन्‍नातूनच आपल्याला पौष्टिक भाग शरीराला पुरवला जातो. त्यामुळे यकृताच्या कार्यात जरासा बिघाड झाला, तरी आपली पचनक्रिया बिघडते. त्याचे अनेक अनिष्ट परिणाम आपल्याला वेगवेगळ्या व्याधींच्या रूपाने भोगावे लागतात. यकृताद्वारे पचनासाठी आवश्यक असलेल्या प्‍लाज्मा प्रोटिन्सची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर अन्‍नपदार्थांमधील लोह काढून घेऊन ते शरीरात साठवण्याचे कामही यकृताद्वारे केले जाते. रक्‍तातील अ‍ॅमिनो अ‍ॅसिडची पातळी राखण्याचे काम तसेच ग्लुकोज साठवण्याचे काम यकृतच करत असते. शरीराला वेगवेगळ्या संसर्गांपासून वाचवण्याचे काम यकृताद्वारे केले जाते. आधुनिक जीवनशैलीत जंकफूड, मद्यपान, सिगारेट यांना मोठे स्थान मिळाले आहे. याचा परिणाम यकृतावर ताण पडण्यात होतो आहे. यकृताच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यकृताचे कार्य व्यवस्थित चालू राहावे, यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. 

1) आवळा ः शरीराला व्हिटॅमिन सीचा पुरवठा आवश्यक त्या प्रमाणात होत असेल, तर यकृताचे कार्य सुरळीत चालू राहते. यासाठी आवळ्याचे महत्त्व आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. आवळ्यामध्ये यकृताचे संरक्षण करणारे अनेक घटक आहेत, असे पाश्‍चिमात्यांनाही वैद्यकीय संशोधनात आढळले आहे. आवळा हा पचनासाठी अत्यंत उपयुक्‍त समजला जातो. याचसाठी आवळ्याचा वापर च्यवनप्राशमध्ये केला जातो. शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम आवळ्याद्वारे केले जाते. आवळा हा कच्चा, रस स्वरूपात वा इतर प्रकारे खाऊ शकतो. 

2) ज्येष्ठमध ः आयुर्वेदात ज्येष्ठमधाची महती वर्णिलेली आहे. अनेकदा कफ आणि खोकल्याच्या आजारावर ज्येष्ठमधाचा उपाय करण्यास सांगितले जाते. ज्येष्ठमधाचा वापर यकृताचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदात ज्येष्ठमधाचा वापर यकृताच्या आजारावर करण्यास सांगितले गेले आहे. ज्येष्ठमध हे कांडीच्या स्वरूपात अथवा पावडरच्या स्वरूपात मिळते. गरम पाण्यात ज्येष्ठमधाची पावडर टाकून ते पाणी घेतल्यास किंवा चहात ज्येष्ठमधाची पावडर टाकून घेतल्यास ते यकृतासाठी लाभदायक असते. 

3) गूळवेल ः गूळवेल ही कोठेही उगवणारी वनस्पती आहे. गूळवेलमध्ये यकृतात साठलेली विषद्रव्ये बाहेर काढून फेकण्याची मोठी क्षमता आहे. गूळवेलीचा वापर अनेक दिवस केला, तरी त्याचे शरीरावर अन्य कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र, यकृताचा आजार असणार्‍या रुग्णांनी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गूळवेलीचा वापर करावा. 

4) हळद ः भारतात अन्‍नपदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर पुरातन काळापासून केला जात आहे. हळद ही जंतुनाशक म्हणून वापरली जाते. हळदीमध्ये यकृताचे कार्य सुधारण्याचीही क्षमता आहे. पाश्‍चिमात्य देशांना हळदीमध्ये यकृताचे कार्य चांगले चालण्यासाठी असलेले गुणधर्म अलीकडे ठाऊक झाले आहेत. हिपॅटायटिस बी आणि सी या काविळीच्या आजारांमध्ये हळद अत्यंत उपयुक्‍त ठरल्याचे वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. अन्‍नपदार्थ बनवण्यासाठी आपल्याकडे हळदीचा वापर केला जातोच; त्याशिवाय दुधात एक-दोन चमचे हळद टाकून ते घेण्याची सवय लावली तर त्याचे अनेक फायदे शरीराला होतात.

5) आंबाडीच्या बिया ः शरीरात तयार होणार्‍या काही विशिष्ट प्रकारच्या हार्मोन्समुळे यकृताच्या कार्यात बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. ही हार्मोन्स शरीरातून बाहेर काढण्याचे काम आंबाडीच्या बियांद्वारे केले जाते. आंबाडीच्या बिया कच्च्याही खाता येतात किंवा त्याची पावडर करूनही खाता येते. 

6) बीट, गाजर, कोबी, ब्रोकोली, कांदा, लसूण : या भाज्यांमध्ये यकृताचे संरक्षण करण्याचे अनेक गुणधर्म आहेत. ब्रोकोली, कांदा आणि लसणाद्वारे शरीराला सल्फरचा (गंधकाचा) पुरवठा केला जातो. गंधकाद्वारे यकृतातील विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकण्याचे काम केले जाते. 

वरील उपायांबरोबरच खाण्या-पिण्याच्या अन्य सवयींद्वारे आपण आपल्या यकृताच्या आरोग्याचे रक्षण करू शकतो. भरपूर तेलाचा वापर केलेले पदार्थ वारंवार खाल्ल्याने यकृताचे आरोग्य बिघडते. हॉटेलमध्ये तसेच गाड्यांवरचे तेलकट पदार्थ यकृताच्या कार्यात बाधा निर्माण करतात. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवर अनेक प्रक्रिया केल्या जातात. अशा अन्‍नपदार्थांचाही यकृताच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. 

शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्याचे काम यकृत करत असते. यकृताचे कार्य व्यवस्थित चालू असेल तर आपले आरोग्य ठीक-ठाक राहते. मात्र, यकृताकडून आपल्या शरीरातील अशुद्ध घटक, विषद्रव्ये बाहेर काढण्याचे काम मंदावते त्यावेळी हे घटक आपल्या शरीरात साठून राहतात. त्याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेचे कार्य मंदावण्यात होतो. यकृताचे कार्य खराब होऊ लागले आहे, हे ओळखण्याचे लक्षण म्हणजे वारंवार पोट दुखणे, अतिसार होणे. नियमित अंतराने थकवा येऊ लागला की, यकृताच्या कार्यात बिघाड झाला आहे, असे समजावे. तसेच गॅसेसचा त्रास नेहमी होऊ लागला तरी यकृताच्या कार्यात काही तरी बिघाड आहे, असे समजावे. आधुनिक जीवनशैलीत आपण कोणते अन्‍नपदार्थ खातो, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. फक्‍त पोट भरणे हा हेतू ठेवून बाहेरचे अन्‍नपदार्थ सर्रास खाल्ले जातात. याचबरोबर घाईघाईने जेवण करण्यानेही अन्‍नाचे चांगले पचन होण्यास अडथळे निर्माण होतात. यकृताचे कार्य चांगले राहण्यासाठी जेवणाच्या आणि नाश्त्याच्या वेळाही पाळल्या पाहिजेत.

रात्री नऊ, दहा वाजल्यानंतर शक्यतो काहीच खाऊ नये. खारावलेले शेंगदाणे, भरपूर चरबी असलेले पदार्थ, बीफ, डुकराचे मांस या पदार्थांमुळे यकृताच्या कार्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. खाण्यात आणि जेवणात मसाल्यांचा वापर भरपूर केलेला असावा. लसणाचा वापर मुक्‍त हस्ताने करावा. भरपूर पाणी प्यावे. तसेच अधूनमधून उसाचा रसही पिला पाहिजे. खाद्यपदार्थांमध्ये मिठाचा वापर प्रमाणातच असावा. अन्‍नपदार्थांवर वरून मीठ घेण्याची सवय लावून घेऊ नका. मेंदीची पावडर (ग्राऊंड हिना) पाण्याबरोबर दररोज एक किंवा दोन चमचे घेतल्यास यकृताचे कार्य सुरळीत चालू राहते. दालचिनी, वेलदोडे, माक्याच्या रसात मिसळून ते घेतल्यास त्याचाही फायदा होतो. कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यासही यकृतास फायदेशीर ठरू शकतो. काकडी, बीट आणि गाजर यांचा रस नियमित घेणेदेखील यकृतासाठी लाभदायी ठरते. याचबरोबर दीर्घश्‍वसन करण्यानेही यकृताचे कार्य चांगले चालू राहते. पपयांच्या बियांच्या ज्यूसमध्ये लिंबाचा रस टाकून घेतल्यास यकृताच्या व्याधीत उतार मिळू शकतो. हा उपचार सलग 30 दिवस करावा. हे घरगुती उपाय केल्यानंतरही यकृताचे कार्य व्यवस्थित चालू राहत नसेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखाली उपचार घेणे आवश्यक ठरते.