Wed, Feb 20, 2019 14:32होमपेज › Aarogya › बधिरीकरणशास्त्रातील बदलते तंत्रज्ञान

बधिरीकरणशास्त्रातील बदलते तंत्रज्ञान

Published On: Jul 12 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 8:23PMपूर्वीच्या काळी बधिरीकरणशास्त्र फारसे प्रगत नव्हते. त्यामध्ये वापरली जाणारी औषधे, तंत्रे फारशी प्रगत तर नव्हतीच; पण काही अंशी रुग्णाच्या जीविताच्या द‍ृष्टीने सुरक्षितही नव्हती; पण आधुनिक बधिरीकरणशास्त्र खूपच प्रगत आणि सुरक्षित झाले आहे.बधिरीकरणशास्त्रातील एक महत्त्वाचे अंग म्हणजे त्यामध्ये वापरली जाणारी औषधे. हल्‍ली वापरली जाणारी औषधे ही नेमकी हव्या तितक्या सेवेपुरती, हव्या तितक्याच खोलीपर्यंत परिणाम साधतील आणि दुष्परिणाम करणार नाहीत किंवा दुष्परिणाम केला, तरी खूप सौम्य प्रकारे करतील अशी आहेत. त्यामुळे ही औषधेे रुग्णांसाठी खूपच सुरक्षित ठरलेली आहेत. 

बधिरीकरणशास्त्रातील दुसरे अंग म्हणजे त्यामध्ये कराव्या लागणार्‍या तांत्रिक बाबी. यासाठी लागणारी साधने पूर्वीच्या काळी फारशी प्रगत नव्हती; पण आता ती साधने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खूपच प्रगत झालेली आहेत. म्हणजे रेल्वेचा प्रवास आणि विमानाचा प्रवास अशी तुलना केली, तर फार अयोग्य होणार नाही. पूर्वी बधिरीकरणतज्ज्ञांना स्वतःच सर्व काही करावे लागे. म्हणजे अगदी महत्त्वाचे म्हणजे पूर्ण भूल देताना, स्वरयंत्र पाहणे त्यासाठी भूलतज्ञांना अडचणीत खाली वाकून स्वतःच पाहावे लागे; पण आता त्यासाठी व्हिडीओ  उपकरणे उपलब्ध आहेत. म्हणजे उपकरण रुग्णाच्या मुखामध्ये घातल्यानंतर मुखाबाहेर एका छोट्याशा किंवा अगदी टी.व्ही.इतक्या मोठ्या पडद्यावरदेखील स्वरयंत्र लीलया पाहता येते. रुग्णास उलटी झाली तर ती श्‍वासनलिकेकडे जाणार नाही याची दक्षता घेणारी उपकरणे आहेत. याला Video Laryngoscope, LMA, intubating LMA, oesophaeal Blockess अशी विविध तांत्रिक नावे आहेत. 

तसेच शरीराच्या ठराविक थोड्याच भागापुरती भूल  देताना बधिरीकरणतज्ज्ञांना स्वतःचा अनुभव व कौशल्य पणाला लावूनच ठराविक सुईद्वारे त्या त्या भागामध्ये ‘अंदाजे’ भुलेचे औषध द्यावे लागे. ‘अंदाजे’ अशासाठी की, आतील आजूबाजूची महत्त्वाची शरीरातील रचना डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे अंदाज अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे असे; पण हल्‍ली  Ultra Sonographyची मदत घेऊन शरीराची आतील महत्त्वाची रचना दिसू शकते आणि मग नेमक्या जागी भुलेचे औषध ठराविक सुईद्वारे देता येते. 

भूल प्रक्रियेतील तिसरे महत्त्वाचे अंग म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या अगदी जवळ अडचणीत थांबून, रुग्णावर सतत अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे. म्हणजे मिनिटा-मिनिटालासुद्धा नाही, तर सेकंदा-सेकंदाला लक्ष ठेवणे. पूर्वी बधिरीकरणतज्ज्ञांना रुग्णाच्या नाडीचे ठोके स्वतः हाताने मोजावे लागत. रक्‍तदाब स्वतः मोजावा लागे, रुग्णाच्या रक्‍तातील ऑक्सिजनचे प्रमाण त्याची नखे, बोटे, ओठ इ.च्या रंगावरून ठरवावे लागे. नाडीचे ठोके व रक्‍तदाब यावरून रक्‍तातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाचा अंदाज घ्यावा लागे. रुग्णाच्या श्‍वासाच्या वेगावर स्वतःच नियंत्रण ठेवावे लागे. रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये काही बारीकसारीक दोष निर्माण होऊ लागले,तर बधिरीकरणतज्ज्ञांना स्वतः ते शोधून काढून वेळेत त्यावर औषध उपचार द्यावा लागे. रुग्णाच्या शरीराचे तपमान थर्मामीटद्वारे थोड्या थोड्या वेळाने पाहावे लागे. मोठ्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचे तापमान थंड पडत जाते. अशावेळी शस्त्रक्रिया संपल्यानंतर थोडावेळ थांबून ब्लँकेटच्या सहाय्याने रुग्णाच्या शरीराचे तापमान सामान्य केल्यानंतर, बधिरीकरणतज्ज्ञांना भूल उतरविण्यासाठी प्रक्रिया करावी लागे. रुग्णाच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण अचूक आकड्यामध्ये करता येत नसे; पण आता या सर्वामध्ये सुलक्षणीय बदल झालेला आहे.

हल्‍ली Multipara Monitor नावाचे एक उपकरणच बधिरीकरणतज्ज्ञांच्यग दिमतीला असते.  Multiparameter  म्हणजे एकाचवेळी रुग्णाच्या अनेक सार्‍या बाबींवर लक्ष ठेवून असणारे उपकरण. म्हणजे अगदी  मिनी सेकंदापासून ते काही मिनिटांच्या अवधीने लक्ष ठेवणारे उपकरण. यामध्ये मुख्यतः नाडीचे ठोके, रक्‍तदाब, रक्‍तातील ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण, श्‍वासाची गती, शरीराचे तापमान यांचा समावेश असतो. या प्रत्येकाचे आकडे, Pattern,पुढे काही दोष निर्माण होणार असतील तर त्याबाबत पूर्वसूचना इ. सर्व बधिरीकरणतज्ञांना, रुग्णाच्या किंचित दूर थांबूनही Screen  वर ठळकपणे दिसते.

पूर्वसूचना देणारे अलार्म असतात. नाक-कान-घसा, डोळे, डोके, मेंदू, मान, चेहरा इ.च्या शस्त्रक्रियेवेळी सर्जन, त्यांची उपकरणे, ट्रॉली, सहायक सर्जन, नर्स यांच्या गर्दीमुळे बधिरीकरणतज्ज्ञांना इच्छा व आवश्यकता असूनदेखील रुग्णाच्या अगदी जवळ थांबता येत नाही. अशावेळी तर ही Monitors फारच उपयुक्‍त ठरतात.  मोठ्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीराचे तापमान फार थंड पडू नये म्हणून विशेष Warming system वर रुग्णाला झोपविले जाते. हल्‍ली रक्‍तातील साखर, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, क्षार, हिमोग्लोबीन इ.चे प्रमाण अगदी त्वरेने आकड्यात सांगणारी छोटी-छोटी उपकरणे उपलब्ध आहेत. 

भूलप्रक्रियेतील चौथे महत्त्वाचे अंग म्हणजे पूर्णभूल देण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन-बॉईल्स मशीन  आधुनिक तंत्रज्ञानामुळे यामध्ये तर आमूलाग्र बदल झालेला आहे. पूर्वीच बॉईल्स मशीन कृत्रिम श्‍वास स्वतः देत नसे. बधिरीकरणतज्ज्ञांनाच कृत्रिम श्‍वास द्यावा लागे. मशीनमधून जाणार्‍या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आणि भूल देणारे इतर वायू रुग्णाच्या शरीरात जात राहिले, तरी ते मशीन शांत ‘मख्खपणे’ उभे राही. ऑक्सिजनच्या मात्रेकडे भूलतज्ज्ञांनाच डोळ्यात तेल घालून पाहावे लागे व तशी बाका परिस्थिती उद्भवणार नाही याची भूलतज्ज्ञ जीवापाड काटेकोरपणे दक्षता घेत. कृत्रिम श्‍वास देताना काही गणिते-हिशेब ठरवावे लागतात. रुग्णाचे वय व वजन यानुसार एका मिनिटामध्ये कितीवेळा कृत्रिम श्‍वास द्यावा, किती लिटर ऑक्सिजन व किती प्रमाणात भुलेचे वायू द्यावेत,  किती दाबाने कृत्रिम श्‍वास दिला पाहिजे याचा हिशेब, गणित भूलतज्ज्ञांना स्वतःच ठरवावे लागे. भुलेचे वायू सौम्य, मध्यम, तीव्र अशा तीन प्रमाणातच देता येत असत. पुष्कळ वर्षांपूर्वी तर बॉईल्स मशीनविनाच कृत्रिम श्‍वासाच्या Breathing deviceला ऑक्सिजन जोडून भूलतज्ज्ञांनी पूर्ण भूल दिलेली आहे. 

पण, आता हे सर्व पार बदलले आहे. ‘रोबोद्वारे सर्जरी’ हे आपण ऐकले-वाचले असेल. तसे हल्‍ली बॉईल्स मशीनच्या रूपाने भूल देणारा रोबोच आला आहे की काय असे वाटते, इतकी तांत्रिकद‍ृष्ट्या प्रगत मशीन्स उपलब्ध आहेत. ही मशीन्स रंगरूपाने मोहक झालेली आहेत. वर सांगितलेले Multipara Monitors यामध्ये असतात, ऑक्सिजन आणि इतर भुलेचे वायू यांचे प्रमाण रुग्णाच्या आवश्यकतेनुसार अचूक  (Digital)  या मशीनद्वारे देता येते. जोपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात रुग्णास पोहोचत नाही, तोपर्यंत ही मशीन्स भुलेच्या इतर वायूंचा प्रवाह सुरूच होऊ देत नाहीत. सर्व वायूंचे रुग्णावरील दाब सुरक्षित प्रमाणात ठरलेलेच असतात.  ऑक्सिजनच्या मात्रेमध्ये थोडासा जरी फरक पडला, तर ही मशीन्स शांत उभी न राहता ‘दंगा’ करतात म्हणजे अलार्म देतात. सर्व धोक्यांची पूर्वसूचना अलार्मद्वारे आधीच देतात. यापुढे जाऊन अवाक् करणारे त्यांचे काम म्हणजे ते स्वतः कृत्रिम श्‍वास देतात. 

रुग्णाचे वय आणि वजन एवढी माहिती त्यांना दिली की, बधिरीकरणतज्ज्ञांचा हिशेब पूर्ण होण्यापूर्वीच, ही मशीन्स कृत्रिम श्‍वासासंबंधी वर सांगितलेले सर्व हिशेब एका सेकंदात पूर्ण करतात आणि रुग्णावर कृत्रिम श्‍वास सुरूही करतात. आता आणखीन काय हवे? म्हणून की काय? मशीनने रुग्णाला ऑक्सिजन, भुलेचे इतर वायू रुग्णाला दिले किती, रुग्णाने घेतले किती याचे आकडेच ही मशीन्स दाखवितात. भूल उतरल्यानंतर रुग्णाच्या शरीरात भुलेच्या वायूंचे प्रमाण शून्य आहे, असेही ही मशीन्स अगदी प्रामाणिकपणे सांगतात. म्हणून या मशीन्सना रोबा म्हणावेसे वाटते. 

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी, तरी ते मानवी मेंदूला हद्दपार करू शकत नाही; पण इतके नक्‍की खरे की, तंत्रज्ञानामुळे बधिरीकरणतज्ज्ञांचे काम आता खूपच सुखकर, सुलभ आणि सुरक्षित झाले आहे.
या लेखाद्वारे ईश्‍वरचरणी प्रार्थना की, सर्वांना निरोगी आनंदी आयुष्य लाभो; पण जर चुकून कोणावर शस्त्रक्रियेची वेळ आलीच, तर हा लेख आठवा आणि दवाखान्यात जाताना पोटात गोळा न आणता, हसत-खेळत आनंदाने जा. कारण, आता तुम्हाला माहितीच आहे, सर्व काही सोप्पं, सुरक्षित आहे, कठीण काहीच नाही!

प्रा. डॉ. आरती घोरपडे