Sat, Sep 21, 2019 06:40होमपेज › Aarogya › सायकलमित्र व्हा, फिट राहा!

सायकलमित्र व्हा, फिट राहा!

Published On: Jun 13 2019 1:28AM | Last Updated: Jun 13 2019 1:28AM
डॉ. महेश बरामदे
 

अगदी कमीत कमी अंतरासाठीही पटकन गाडी काढून जाण्याची आपल्याला सवयच लागली आहे. गाडीमुळे पटकन पोहोचता येते खरे; पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू पाहत आहे. त्यामुळे आरोग्य टिकवायचे असेल, तर सायकलशी दोस्ती करणे फायद्याचे ठरेल.  सायकल चालवल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, तसेच हृदयाशी निगडित आजार आणि कर्करोगाचा धोकाही कमी होत जातो. सायकल चालवणे हा एक सोपा व्यायाम आहे.

तंदुरुस्ती, व्यायाम हे शब्द आता बहुतेकांच्या कानात रुळले आहेत आणि प्रत्येकजण स्वतःला तंदुरुस्त राखण्याच्या प्रयत्नात असतोच. त्यासाठी काही लोक जिममध्ये जातात. अर्थात, जिममध्ये हजारो रुपये खर्चावे लागतात; पण तेच सहज-सोप्या तंदुरुस्तीच्या साधनांकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. त्यापैकीच एक म्हणजे सायकल. सायकल चालवल्याने आपण तंदुरुस्त राहतो. त्यामुळे आजारपणापासून बचाव होतो. सायकलिंग एक उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे शरीरातील स्नायूंना लाभ होतो. सायकल चालवल्याने हृदयाचे विकार टाळले जातातच; पण अवेळी होणार्‍या मृत्यूपासूनही बचाव होतो.

एका संशोधनानुसार, सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका 46 टक्क्यांपर्यंत कमी होतो. तर पायी चालल्याने हृदयविकार होण्याचा धोका 27 टक्क्यांपर्यंत कमी होतो. सायकलिंग कर्करोगासारख्या समस्येपासूनही बचाव करते. नियमित सायकल चालवल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो, असे एका संशोधनात आढळले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये ते प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी सांगितले की, ऑफिसपर्यंत सायकलने जाणे हे पायी जाण्यापेक्षाही फायदेशीर आहे. नियमित सायकल चालवल्यास कर्करोग होण्याचा धोका 45 टक्क्यांपर्यंत कमी होतो. या संशोधनासाठी 2 लाख 64 हजार 377 लोकांच्या आकडेवारीचा अभ्यास केला गेला. त्यात सरासरी वय होते 53 वर्षे. संशोधनाचा विचार करता वजन कमी करण्यासाठी व्यायामाच्या माध्यमातून आठवड्याला कमीत कमी 2 हजार कॅलरीज् जाळायला पाहिजेत. 

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, नियमितपणे सायकल चालवल्यास प्रतितास 300 कॅलरीज् जळतात. त्यामुळे जितकी जास्त सायकल चालवाल तितक्या कॅलरी जळतील आणि शरीरातील चरबी कमी होईल. अर्थात, फक्‍त सायकल चालवली आणि वजन कमी झाले असे होत नाही, तर त्यासाठी आरोग्यदायी आहार सेवन करावा लागतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सायकल चालवल्याने केवळ हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढत नाही, तर कॅलरीज्ही जळतात. नियमितपणे सायकल चालवल्यास शरीराच्या सर्व भागांतील चरबी वितळू लागते. त्यात पोटाची चरबीदेखील कमी होते. 

नियमित सायकल चालवत असाल, तर त्यामुळे रक्‍तपेशी आणि त्वचा यांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे त्वचा चमकदार आणि तरुण दिसते. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात झालेल्या संशोधनातील निष्कर्षांचा विचार करता सायकल चालवल्याने वाढत्या वयाचा परिणाम कमी होतो. चेहर्‍यावर सुरकुत्या पडत नाहीत. त्वचा तेजस्वी, चमकदार राहते. सकाळी सकाळी काही काळ सायकलिंग केल्यास रात्री उत्तम झोप लागते, म्हणजे झोप लागण्याची समस्या पूर्णपणे संपते. सकाळी लवकर उठून सायकल चालवणे थकवणारे असले, तरीही ही अवस्था काही काळच राहते; पण त्याचा भरपूर फायदा होतो. 

कॅरोलिना विद्यापीठातील एका संशोधनानुसार व्यायाम न करणार्‍या व्यक्‍तींच्या तुलनेत जे लोक आठवड्यातून पाच दिवस कमीत कमी अर्धा तास सायकल चालवतात त्यांच्या शरीरातील प्रतिकारक क्षमतेच्या पेशी अधिक कार्यशील असतात. सायकलिंग करणार्‍यांची मेमरी किंवा ब्रेन पॉवर व्यायाम न करणार्‍यांच्या तुलनेत 15 टक्के जास्त असते. 

अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांना एका संशोधनानंतर असे निष्कर्ष आढळून आले की, सायकल चालवल्याने हृदय मजबूत होते. त्याचबरोबर मेंदूच्या नव्या पेशीही तयार होतात. म्हणजेच असे म्हणता येईल की, सायकल चालवा आणि स्मरणशक्‍ती वाढवा.