Wed, Feb 20, 2019 14:51होमपेज › Aarogya › मुले खोडकर आहेत की आजारी?

मुले खोडकर आहेत की आजारी?

Published On: Jul 12 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 8:27PMलहान मुले खोडकर असतात. दंगामस्ती करतात, अभ्यास करत नाहीत, कुणाचे ऐकत नाहीत, अशी तक्रार अनेक पालक करत असतात. खूपदा लहान मुलेच ती, त्यांनी दंगामस्ती करायची नाही तर कुणी, असे म्हणून ती तक्रार हसण्यावारी नेली जाते; पण काही लहान मुलांच्या बाबतीत त्यांचा खोडकरपणा, दंगेखोरपणा, कुणाचे न ऐकणे, अभ्यास न करणे हे आजारपण असू शकते आणि त्याकडे पालकांनी वेळीच लक्ष द्यायला पाहिजे. कदाचित तुमचे मूलही त्यात असू शकते. त्याच्याबाबतीत या सगळ्या समस्या म्हणजे मानसिक समस्या असू शकतात. याबाबत 

सविस्तर माहिती देणारा लेख...

लहान मुले खोडकर असतात, अगदी किशोरवयात आल्यावरही त्यांचा खोडकरपणा संपत नाही; पण काहीवेळा हा खोडकरपणा, मोठ्यांचे न ऐकणे, अभ्यास न करणे, चिडचिडेपण करणे हे सगळे घरातील शांतता भंग करणारे आणि घरात तणाव निर्माण करणारेही असते आणि अशावेळी पालक काळजीत पडतात आणि सुचेल ते उपाय करू लागतात; पण त्यावेळी वैद्यकीय किंवा मानसोपचार घेण्याचे त्यांना सुचत नाही. वास्तविक पाहता, मुलांच्या वागण्यात अशा प्रकारचा बदल दिसू लागला की, ती अशी का वागत आहेत याची कारणे जाणून घेणे आवश्यक असते. तसे होत नाही आणि मुलांची समस्या वाढत जाते. कधी कधी यातून मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. म्हणूनच आपली मुलगी किंवा मुलगा असे काही विचित्र वागत असेल, तर संयमाने वागून त्याच्या वागण्याचे कारण शोधून काढा आणि मगच त्यावर प्रतिक्रिया द्या. 

तुमचे मूल तणाव किंवा दबावाखाली दिसत असेल तर...

भीती किंवा चिंतेचे हे लक्षण आहे. ढोबळ मानाने याला चिंता, अस्वस्थता असे आपण म्हणू शकतो. ही एक प्रक्रिया आहे, त्याला बायॉलॉजिकल मेनिजम असे म्हणतात, याद्वारे आपले शरीर तणावाच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तयार होत असते. या स्थितीत ते मूल एखादी व्यक्‍ती, वस्तू किंवा परिस्थितीला स्वत:साठी धोकादायक मानू लागते. त्याचा मेंदू अशावेळी त्याच्या मज्जासंस्थेला याबद्दल संदेश पाठवतो. या संदेशाद्वारे शरीरात ‘लढा किंवा पलायन करा’ (फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स) प्रतिसाद तयार होतो. म्हणजे त्या परिस्थितीचा तो मुकाबला करेल किंवा पलायन करेल. ही भीती खरी असते किंवा काल्पनिक. अशावेळी शरीरावर, मनावर परिणाम होतो आणि मूल चिडचिडे होते, काही विचारले, बोलले तर उलट उत्तर देऊ लागते. एकटे राहू लागते. मित्र -मैत्रिणींशीही व्यवस्थित बोलत नाही, त्यांच्यात मिसळत नाही, सतत अस्वस्थ असते. या सगळ्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर आणि दैनंदिन व्यवहारावर होऊ लागतो. आजकाल शाळा आणि घरात मुलांवर इतका दबाव असतो की, सहा वर्षांच्या मुलांमध्येही तणाव आणि नैराश्याची लक्षणे दिसू लागली आहेत. अर्थात, ही लक्षणे इतरही कोणत्या आजाराची असू शकतात; पण अशी लक्षणे दिसू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपले मूल चिंताग्रस्त आहे ते कसे ओळखायचे? मूल चिंताग्रस्त असेल तर त्याच्यात खालील लक्षणे आढळून येतात. 

- मूल अस्वस्थ किंवा भयग्रस्त होते. 

- मूल गप्प गप्प राहते. 

- खेळायला जात नाही.

- त्याच्या हृदयाची धडधड वाढते. 

- श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागतो. 

- तोंडाला कोरड पडते.

- मूल तोतरे किंवा अडखळत बोलू लागते. 

- थरथर कापत राहते. 

- उलटी होते किंवा मळमळणे.

- वारंवार लघवीला किंवा शौचास जाणे.

- थकवा येणे, डोकेदुखी, पोटदुखी होणे वगैरे. 

- अभ्यासावर लक्ष केंद्रित न होणे, एका जागी बसून अभ्यास न करू शकणे.

- परीक्षेत मार्क्स कमी पडतात.

- शाळेत जायला घाबरू लागते. 

- कारणाशिवाय चिडचिड करत राहते.

- लहानसहान निर्णयही घेता येत नाहीत. 

- मित्र-मैत्रिणींत मिसळत नाही.

- एकटे राहू लागते. 

- खूप झोपते किंवा कमी झोपते. 

- खूप खाते किंवा अगदी कमी खाते. 

पालकांनी काय करावे?

- मुलांशी बोलून त्याच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा

- मुलाशी बोलताना असे बसा की, तुमच्या दोघांच्या डोळ्यांचा स्तर समान असेल. त्यामुळे तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात हा गंड त्याच्या मनातून कमी व्हायला मदत मिळेल. 

- मुलाशी खेळा, त्याचे मित्र बना. त्याला विनोद, गोष्टी सांगा. यातून तुम्ही त्याचा विश्‍वास जिंकालच; पण त्याचबरोबर त्याचे दडपण दूर व्हायलाही मदत होईल. 

- त्याला काय वाटते ते विचारा. त्याला कसली भीती वाटते का? त्याला कुणी धमकी दिली आहे का? कसले टेन्शन आहे का? कुणावर नाराज आहे का? त्याला कुणाचा राग आला आहे का? वगैरे. 

- तुमचे मूल जे काही बोलू पाहत आहे, ते न ऐकताच त्याच्याविषयी कोणतेही मत बनवू नका. एखादा प्रश्‍न ते वारंवार विचारत असेल किंवा काहीच बोलत नसेल, तरी संयम बाळगा. तुमचे मूल हळूहळू आपले मन मोकळे करेल. 

- एखाद्या बाबतीत मुलाचे वागणे, बोलणे आवडले नाही, तरी त्याबाबत त्याला धारेवर धरू नका किंवा त्याच्याशी वाद घालू नका. त्याला हे करू नको, ते करू नको किंवा असे वागू नको, तसे वागू नको, असे सांगू नका. 

- मूल बोलत असेल तेव्हा त्याला बोलू द्या, मध्येच अडवू नका. 

- तुमचे मूल जर आपल्यातील कमतरतेवर बोलत असेल, काही चुकले असेल त्यावर बोलत असेल तर त्याला सांगा की, माझ्यातही कमतरता आहे आणि लहानपणी माझ्याकडूनही चुका झाल्या होत्या. त्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास वाढेल. 

- त्याला कसली चिंता आहे हे शोधून काढा. त्याला शाळेत, घरात किंवा रस्त्यात काही समस्या आहे का ते पाहा. कोणत्याही समस्येवर उपाय असतो हे त्याला समजावून सांगा. त्याची भीती खरी असेल तर त्यातून तो बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. भीती काल्पनिक असेल, तर त्याबाबत त्याच्याशी सतत बोलून, त्याची समजूत काढून ही भीती कशी निरर्थक आहे हे त्याला पटवून द्या. 

जेव्हा मूल संशयी किंवा सणकी होते तेव्हा...

बारा वर्षांच्या अमनला स्वच्छता खूप आवडते. आपली प्रत्येक गोष्ट त्याला स्वच्छ ठेवायला आवडते. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर तो आपले हात धुतो. आपले हात स्वच्छ नाहीत असे त्याला सारखे वाटत असते. मग तो पुन्हा पुन्हा साबण लावून हात स्वच्छ धुतो. तरीही हात स्वच्छ नाहीत असेच त्याला वाटत राहते. हात धुतल्यानंतरही नळाची चावी किंवा अन्य कशालाही तो हात लावत नाही. कारण, त्यामुळे आपले हात पुन्हा घाण होतील, अशी भीती त्याला वाटते. आई-वडिलांनी बरेच समजावूनही काही उपयोग झाला नाही, तेव्हा मानसोपचारतज्ज्ञाकडे अमनला नेण्यात आले. या आजाराला ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर किंवा ओसीडी असे म्हणतात. यात दोन प्रकार असतात. 

ऑब्सेशन : विशिष्ट प्रकारचा विचार मुलाच्या मनात वारंवार आणि सतत येतो तेव्हा त्याला ऑब्सेशन म्हणतात. हे खालील प्रकारचे असू शकते. 

- आपण किंवा स्वत:च्या वस्तू जीवाणू किंवा घाणीच्या संपर्कात येतील ही चिंता.

- आपल्याकडून कुणाला तरी इजा होईल ही भीती वाटणे.

- प्रत्येक गोष्ट दरवेळी नीट आणि व्यवस्थितच ठेवली पाहिजे असा दुराग्रह.

- एखादी गोष्टी भाग्याची आणि एखादी दुर्भाग्याची मानण्याची अंधश्रद्धा.

- धर्म किंवा नैतिकतेच्या गोष्टींकडे अतिरेकी लक्ष देणे.

- स्वत:वर आणि इतरांवर संशय व्यक्‍त करणे. 

कंपल्शन : हे असे वर्तन असते, जे वारंवार केले जाते. एखादी गोष्ट सतत करत राहणे, हे या प्रकारात होत असते. म्हणजे मुलाला जर अस्वच्छतेचा तिटकारा असेल, अस्वच्छतेला घाणीला तो घाबरत असेल, तर तो सतत स्वच्छता करत राहील. सतत हात-पाय धुवत राहील, जीवाणू नष्ट होतील, या भावनेतून हे कृत्य वारंवार होत असते. यावेळी नाही पुढच्या वेळी ते नष्ट होतील, या विचारातून सतत स्वच्छता करत राहण्याचे काम होत राहते. 

या आजाराचा परिणाम मुलाच्या एकूणच व्यक्‍तिमत्त्वावर होतो. त्याच्या दैनंदिन जगण्यावर त्याचा परिणाम होतोच; पण त्याचबरोबर त्याचा आत्मविश्‍वास डळमळीत होतो. अशावेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होते. त्यांनी आपल्या मुलात आत्मविश्‍वास वाढवण्यास मदत केली पाजहिजे; पण त्याचबरोबर आपले मूल इतर मुलांपेक्षा वेगळे तर वागत नाहीये ना याचीही काळजी घेतली पाहिजे. मूल आपला अधिकाधिक वेळ आपले मित्र आणि शाळा यात व्यतीत करत असते. त्यामुळे त्याच्या शिक्षकांना त्याच्या आजाराची माहिती देणे इष्ट ठरते. 

ओसीडी कसा ओळखायचा?

- वारंवार हात धुणे किंवा स्नान करणे, आपले सामान स्वच्छ करणे, 

- दरवाजा, नळ वारंवार तपासून ते बंद आहेत की नाही हे पाहणे.

- कोणतीही वस्तू सारखी सारखी तपासून पाहणे, उदा.- कुलूप, गॅस स्विच वगैरे.

- जुनी मासिके, वर्तमानपत्रे, बाटल्या अशा जुन्या वस्तू कारण नसताना सांभाळत बसणे.

- वारंवार लिहिणे, खोडणे, सतत वाचत राहणे.

- फर्निचर वगैरे सारखे व्यवस्थित लावत राहणे.

- आवश्यकतेपेक्षा जास्त प्रार्थना करणे, धार्मिक बाबतीत गुंतून राहणे वगैरे. 

पालकांनी काय करायचे?

मुलाशी चांगला संवाद साधा. एकदम समस्येलाच हात घातलात तर तो तुमच्याशी बोलणार नाही. म्हणून आधी त्याला विश्‍वासात घ्या आणि मग त्याच्याबरोबर राहून, त्याला वेळ देऊन, त्याच्याशी बोलून या समस्येवर मात करणे शक्य होते का ते पाहा. 

अति खोडकर मूल

एखादे मूल खूप खोडकर असते. एका जागी स्थिर बसत नाही. सतत इकडे तिकडे पळत राहते. कुणाचे ऐकत नाही. जर अन्य मुलांत पाठवले, तर त्यांच्या खोड्या काढत राहते. त्याला रागवून, मारूनही काही उपयोग होत नाही. अशा मुलांना अटेंशन डेफिसीट किंवा हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर असते. मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने या आजारावर मात करता येते. 

डॉ. जयदेवी पवार