Thu, Apr 25, 2019 11:15होमपेज › Aarogya › भगेंद्र आणि आयुर्वेद उपचार

भगेंद्र आणि आयुर्वेद उपचार

Published On: Aug 09 2018 1:38AM | Last Updated: Aug 09 2018 1:38AMप्राथमिक अवस्थेत दुर्लक्षिले जाणारे आणि लज्जा, भीती, संकोच, किळस आदीमुळे उपचार करण्याचे टाळले जाणारे असे काही जे विकार शरीरामध्ये आढळतात. त्यापैकी एक आजार म्हणजेच ‘भगंदर’ किंवा ‘भगेंद्र’.

संडासच्या जागी होणार्‍या विकाराला मूळव्याध समजून प्रत्यक्ष तपासणी न करताच काही जण यावर औषधी उपचार देत असतात. आजार अवघड जागी असल्याने अनेक जणांना त्याची व्यर्थ भीती दाखवून खासगीरीत्या अनेकांवर वेगवेगळे मलम, तेले, लेप, चूर्ण, जागेवर इंजेक्शन, दोरे बांधणे यांचा प्रयोग झालेला पाहायला आढळतो. कोणत्याही शास्त्रीय उपकरणांशिवाय स्वच्छतेशिवाय ऑपरेशन करून घेऊन खासगी पद्धतीविरहित ‘स्वयंघोषित तज्ज्ञांकडून’ हजारो रुपयांना गंडा बसल्याने नंतर लक्षात येणारे अनेक रुग्ण आमच्या पाहण्यात आहेत. अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी असे फसले गेल्यामुळे आणि आजार मात्र तसाच राहिल्यामुळे ‘हा आजार आता कधीच बरा होणार नाही।’ असा गैरसमज अनेक रुग्णांनी करून घेतलेला आढळतो. 

प्राथमिक अवस्थेमध्ये संडासच्या जागेच्या परिसरामध्ये पुळी किंवा फोड उत्पन्‍न होतो. त्याजागी किंचीत सूज असते. थोडेसे दुखते व कालांतराने पुळी मोठी होऊन फोड फुटतो व त्याजागी वरून छिद्र असणारी व आत नलिकेप्रमाणे लांब असणारी जखम होते. यातून द्रवरूपी रक्‍त, पुटामिश्‍चित स्राव होतो. काहीवेळेला मलस्राव, तसेच तीव्र दुर्गंधी येते. आजूबाजूला सूज येऊन वेदना होतात. नीट खाली बसता येत नाही. तात्पुरत्या स्वरूपाच्या वेदनाशामक व जंतुनाशक औषधे घेतली जातात. जखम वरून भरून येते. बरे झाल्यासारखे वाटते; पण हा आनंद फार काळ टिकत नाही. पुन्हा त्याजागी फुगायला लागते. सूज येऊन फुटू लागते व पुन्हा स्राव होऊ लागतो. 

भगंदराची कारणे : सततचा प्रवास, कडक आसनावर बसणे, अस्वच्छता, कृत्रिम संसर्ग, फोड आल्यानंतर प्राथमिक अवस्थेत केलेले दुर्लक्ष, याचबरोबर अतितिखट, आंबट, खारट असे चटणी, लोणची, तळलेले पदार्थ, मांसाहार, दही, दह्याचे पदार्थ, मसालेदार पदार्थ, अतिनियमितपणे जेवण यासारख्या कारणांमुळे, तसेच बद्धकोष्ठता, कुंथून संडास करण्याची सवय, अशक्‍तपणा यासारख्या कारणांनी भगंदर उत्पन्‍न होतो. 

आयुर्वेद उपचार : भगंदरावर आयुर्वेद उपचार करताना तो वात, पित्त किंवा कफ यापैकी कोणाच्या जास्त बिघाडामुळे झाला हे निश्‍चित केले जाते. यानंतर त्यासाठी औषध, क्षारसूत्र, अथवा शस्त्रकर्म आदी गरजेचे आहे का? ते स्पष्ट, निर्भीडपणे सांगितले जाते आणि नंतर पोटातील औषधे, स्थानिक उपचार आणि पथ्यपालन अशा त्रिसूत्रीने उपचार सुरू केले जातात. हे उपचार सुरू असतानाच नियमित वेळी पुनर्तपासणी करून पडलेल्या फरकानुसार औषधांमध्ये योग्य बदल केले जातात. 

औषधे : आयुर्वेदिक औषधांपैकी आवळा, हिरडा, बेहडा, लोध्र, अशोक, ज्येष्ठमध, अनंतमूळ, हरिद्रा, गुग्गुळ, शिलाजित, गंधक, वंग, त्रिवंग, प्रवाळ, कासीय, मज्जूर व भस्मे आणि त्यापासून तयार झालेल्या विविध औषधींचा वापर केला जातो. स्थानिक उपचारांसाठी आजाराच्या अवस्थेनुसार विविध पोटीस, लेप, धूपन, धावन, सिद्ध तेले यांचा उपयोग केला जातो. पोटातील औषधे व स्थानिक उपचार यांचा वापर एकाचवेळी केल्यानंतरच या आजारात फायदा होतो. 

भगंदराचे पथ्य : भगंदर झालेल्या व्यक्‍तीने सूज असताना गरम पाण्याने अथवा पोटीसाने शेकावे, बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची, बाक नेहमी मऊ असावे. हादरे बसणारा प्रवास टाळावा. जागेची नियमित स्वच्छता ठेवावी. भात, भाकरी, फुलका, मूग, दुधी, कारले, शेपू, शेवगा यांची भाजी, ताक, जिरे यांचा नियमित वापर करावा. पोट साफ राहण्याची काळजी घ्यावी. सायंकाळचे जेवण कमी प्रमाणात घ्यावे. उष्णता, बद्धकोष्ठता उत्पन्‍न करणारे सांगितलेले पदार्थ नेहमी टाळावेत. 


डॉ. आनंद ओक